*॥श्रीहरिः॥*
देह टाकणार्याला मोक्ष प्राप्त व्हावा, भगवतांची प्राप्ती व्हावी, जीवन उन्नत व्हावे म्हणून त्याने काय करावे, हे भगवंत आता सांगतात.
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः
*तस्मात्सर्वेषु कालेषु*
*मामनुस्मर युध्य च ।*
*मय्यर्पितमनोबुद्धि-*
*-र्मामेवैष्यस्यसंशयम् ॥*
*॥८.७॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.७)
*भावार्थ:- म्हणून तू सर्वकाळी माझं स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर (कर्तव्यतत्पर रहा). संशयरहित होऊन तू मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलीस म्हणजे तू नि:संशय मलाच प्राप्त होशील.*
*इथे भगवंताचे नित्य चिंतन, भगवंताचे नित्य नामस्मरण किती महत्वाचे आहे हे विशद केले आहे.*
हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे.
इथे भगवंत कर्मही करायला सांगत आहेत आणि भक्तीही करायला सांगत आहेत.
*सर्वप्रकारच्या* अंतकाळी माझं स्मरण ठेव! अर्थात विचार करताना, काम करताना, जेवताना, झोपताना, प्रवास करताना,संकल्प करताना, विकल्पाला तोंड देताना, सुखात- दु:खात - अशा सर्वकाळी माझं स्मरण ठेव!
*भगवद्गीतेत* संसार सोडून केवळ भक्तीच प्रतिपाद्य आहे असा समज असणाऱ्यांनी या श्लोकाकडे विशेष लक्ष द्यायला हवं. भगवंतांनी त्यांचं स्मरण ठेवतानाच *'युद्ध कर'* असं म्हटलं आहे. म्हणजेच माझं स्मरण करताना कर्म मुळीच सोडू नकोस, असाच अर्थ होतो. किंबहुना कर्मात माझंच अधिष्ठान (जाणीवपूर्वक स्मरण) ठेव, असं ते सुचवतात.
भगवंत गीतेतून केवळ भक्ती सांगत नाहीत आणि केवळ कर्मही सांगत नाहीत. कर्म करत करत भगवंताचं स्मरण ठेवणं आणि उत्तरोत्तर कर्म करत असतानाच मन आणि बुद्धी त्याला अर्पण करणं (मन-बुद्धी माझी आहे हा अहंभाव सोडणं) हे साधलं पाहिजे. तरच असा पुरुष भगवंताला प्राप्त होऊ शकतो.
*म्हणजे* विहित कर्म केलंच पाहिजे.परंतु प्रत्येक कर्म करताना भगवंताला साक्षी ठेवून ते केलं पाहिजे. मग पुढचा मार्ग भगवंतच दाखवतील.
*एकेका* इयत्तेतूनच माणसानं वर गेलं पाहिजे. मन-बुद्धी भगवंताला अर्पण करायची म्हणजे नेमकं काय करायचं, असा प्रश्न प्रारंभीच उपस्थित करता कामा नये.
प्रथम आपलं विहित कर्म निरलसपणानं,निरपेक्षभावानं पार पाडत जावं. ते करतानाच भगवंताचं चिंतन सुरू करावं. चिंतन करता करता चिंतनाचा आणि भगवंतासाठी केलेल्या निष्काम(कर्माचा) कालावधी वाढवत नेला पाहिजे; आणि मग असं कर्म करता करताच तिन्ही त्रिकाळ त्याचं नाव घेणं (नामस्मरण) साधलं पाहिजे. उघडपणे नाम घेतलं नाही तरी चालेल. मनातच भगवंताच्या नावाची आंदोलनं निर्माण झाली पाहिजेत.नाम श्वासावर स्थापित झालं पाहिजे. नाम घेणं ही केवळ भौतिक क्रिया नाही; तर भगवंताचं जीवाबरोबर चोवीस तास असणं आणि प्रत्येक कर्म त्याच्याच शक्तीमुळे सिद्ध होत आहे, हा भाव वृद्धिंगत करणंही महत्त्वाचं आहे.
असं आत्यंतिक प्रेमानं जर नाम घेणं साधलं तर त्याचं प्रतिबिंब आपल्या कर्मातही निश्चितच उमटेल.
*अंधारात* बॅटरी वीस फुटापर्यंतचाच मार्ग दाखवते. पण वीस फूट चालून गेल्यावर पुढचा वीस फूट मार्गही ती प्रकाशित करायला चुकत नाही. आपण भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे नाम-कर्म करून काही पल्ला गाठला तर पुढचा मार्ग तोच प्रकाशित करील. आपली पावलं मात्र भगवंताच्या मार्गावरूनच पडली पाहिजेत!
लहान बाळ जेव्हा चालायला लागतं तेव्हा ते अडखळत दोन पावलं टाकतं. ते मध्येच पडायला लागलं की आई धावत जाऊन त्याला सावरते. त्याप्रमाणे कशी का होईना, आपण भगवंताच्या दिशेनं दोन पावलं वर सांगितल्याप्रमाणे टाकली पाहिजेत.
आपण अडखळलो तर भगवंत धावत येऊन आपल्याला हात देईल हे निश्चित! संशयरहित होऊन आपण भगवंताला मन-बुद्धी अर्पण करून निश्चिंत झालो तर नि:संदेह त्याला प्राप्त होऊ.
*सारांश:*
*भगवंतानी सांगितल्यानुसार माणसानं प्रथम कर्म केलं पाहिजे. ते करता करता भगवंताचं चिंतन साधलं पाहिजे. चिंतन मनातच केलं पाहिजे.कारण भक्ती ही आंतरिक बाब आहे. बाहात: दाखविण्याची बाब नाही! ते साधलं तर पुढचा मार्ग भगवंतच दाखवील.*
गीताशास्त्र श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*
No comments:
Post a Comment