🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
*🔸त्याची रखुमाई..!🔸*
*एकादशी स्पेशल...!*
*थकून भागून घरी यायला त्याला रात्रीचे २ वाजले. रस्त्यात दिव्यांची सोबत करत तो घरी आला, बिचारी ती वाट बघून बघून थकून गेली, आणि सोफ्यावर बसल्या बसल्या तिला कधी झोप लागली हे तिला कळाल ही नाही.*
*ह्याने बेल वाजवली दार १० मिनिटं झाली कुणी उघडलंच नाही, ह्याला भीती वाटू लागली. दारावर त्या भीतीपोटी ह्याने जोरात धक्का दिला.. तिला त्या आवाजाने जाग आली, तिने दार उघडलं. आधीच कर्तव्याची बोजी पाठीवर घेऊन फिरणारा तो वैतागला होता.*
*दार उघडल्या उघडल्या तो तिच्यावर खेकसलाच "कळत नाही का? तुला माझ्या कष्टांची किंमतच नाहीये.." वगरे वगरे.. ती ही वाट बघून बघून वैतागली होती, ती ही चालू झाली आणि जे नेहमी होत तेच झालं.. कर्तव्याच्या बोज्याने आपल्या हातानेच पोट भरलं आणि प्रेमाने जोरात दार आपटत प्रेम झोपी गेलं.*
*विचार करत करत काहीवेळाने कर्तव्य ही झोपी गेलं, सकाळी ५ वाजता फोन वाजला म्हणून त्याला जाग आली. समोरून एक चड्डी दोस्त होता.. अरे येतोस ना, जायचंय आपल्याला माउलींना सासवड पर्यंत सोडायला.*
*राग एक खूप मोठी गोष्ट सोबत घेऊन फिरत असतो.. त्याचं नाव अहंकार. तोच सोबत घेऊन त्याने मित्राला चार शिव्या दिल्या आणि फोन ठेऊन दिला, पण तो राहिला चड्डी दोस्त त्याने परत फोन करून ह्याला ४ शिव्या दिल्या आणि आवर १५ मिनिटात आलो... असं म्हणून फोन ठेवून दिला. जास्त वाद आता ह्याला ही नको होता, म्हणून त्याने आवरायला सुरवात केली.*
*प्रेमाला कर्तव्याची चाहूल लागली, आणि प्रेम ही झोपेतून उठलं काहीच प्रश्न न करता प्रेमाने चहा ठेवला. चहा वगरे घेऊन आपल्या चड्डी मित्रासोबत कर्तव्य कर्तव्यांची परतफेड करायला बाहेर पडलं. जाताना प्रेमाला काळजी घे, येतो संध्याकाळी सांगून..*
*कोण म्हणतं फक्त व्यसनांनीच नशा येते, भान हरपते? कधी तुम्ही वारीतल्या भक्तिरसात नाहून तर बघा, तुम्हाला कुठल्याच नशेची गरज पडणार नाही. त्याचं ही तेच झालं... टाळ, मृदुग, पखवाज ह्यात पठया इतका नाहून गेला, की आयुष्यातली सगळी दुःखं कुठल्या कुठे पळून गेली. असंख्य लोक आपआपली दुःखं माऊलींच्या चरणी अगदी निर्धास्त टाकून नाचत होती. जणू काही सगळे चातक पक्षी आहेत आणि माऊली त्यांचं पाणी.*
*बरेच अंतर संपल्यावर ह्याच्या लक्षात आलं आपण चुकलोय आणि कुठल्याश्या दिंडी सोबत चालतोय.. मागं पुढं मित्र बघतोय तर तो ही नाही. फोन लावायचा म्हणलं, तर तो ही बंद.*
*शेवटी तो तेही विसरून गेला, आणि माऊली चला पुढं, चला पुढं च्या नादात चालत राहिला. चालत चालत पालखी दिवे घाटाच्या खाली विसाव्याला थांबली. हा त्या दिंडीतून बाहेर पडणार तेवढ्यात मागून आवाज आला.. "माऊली टाळ वाजवायला सोबत अन जेवायला नाय व्हय? चला थोडं थोडं भाकर पोटाला खाऊन घेऊ.."*
*त्यांच्या साध्या वाक्यातलं प्रेम त्याला चटकन जाणवलं. तो नाही म्हणूच शकत नव्हता. जेवणं वाढली गेली. सगळे मनभर जेवले. हा हात धुवायला गेला आणि ह्याला काहीतरी वेगळंच दिसलं....*
*एक आजोबा पाठमोरे साडीला मिऱ्या घालताना दिसले, त्याला आश्चर्य वाटलं.. त्याने पटकन हात धुतले आणि त्याने त्या आजोबांना आवाज दिला.. माऊली...*
*आजोबा वळाले, त्यानंतर त्याला जे काही दिसलं... त्यावर त्याचा विश्वास बसला नाही, ते आजोबा त्यांच्या रखुमाईला साडी नेसवत होते. तो काही बोलायच्या आतच आजोबा त्याला म्हणाले वय झालं रे लेका आता तीचं.. आणि एक बाजू बी आधु पडली. अरे, ते तुम्ही काय पॅरॅलीसिस का काय म्हणता... ते झालंय. वारीला यायचं म्हणाली, नाही म्हणू शकलो नाही.*
*आयुष्यभर झटली बघ माझ्यासाठी. पांडुरंगाने तिची सेवा करण्याचं भाग्य ह्याच जन्मी माथी दिलंय, तेच काय ते सुख बघ.*
*त्याच्या मनातल्या मेघांनी अश्रूंना वाट रीती करून दिली होती. मन आतून सांगत होत की, बाबारे हाच तो विठ्ठल आणि हिच ती रखुमाई.*
*तो काहीच बोलला नाही. तो आजोबां जवळ गेला आणि त्याने त्यांना कडकडून मिठी मारली. डोळे पुसत इतकंच म्हणाला..., चला माऊली निघतो. माझी रखुमाई घरी वाट बघत असेल.*
*त्याची वारी आता जगाच्या उलट चालू झाली होती, त्याच्या पंढरपूराकडं...! जिथं त्याची रखुमाई त्याची आतुरतेन वाट बघत होती...*
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
No comments:
Post a Comment