॥ श्रीगुरु:शरणम् ॥
चिंचेच्या पानावर देऊळ रचिले ।
आधी कळसू मग पाया रे ।।
देव पुजू गेले तव देऊळ उडाले ।
खेळिया सद्गुरुराया रे ।। १ ।।
पाषाणाची सांगड मृगजळ डोही ।
वांझेचा पुत्र पोहला रे ।।
दुहीतोंडी हरणी पाणी पिण्या आली ।
मुखाविण पाणी प्याली रे ।। २ ।।
आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले ।
पांगळ्याने पाठलाग केला रे ।।
एकाजनार्दनी एकपणे विनवी ।
हरिच्या नामे तरलो रे ।। ३ ।।
— संत एकनाथ
▪️अर्थ :-
चिंचेच्या पानाइतके छोटेसे असे, आईचे "उदर". त्या उदरात "देऊळ" म्हणजे "नरदेह". त्याची रचना परमेश्वर करतो. हा नरदेह चिंचेच्या पानावर, म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना, आधी डोके तयार होते. प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते व मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात. म्हणून आधी "कळस" म्हणजे "मस्तक" आणि मग "पाया" म्हणजे इतर सर्व "अवयव", अशी या तुमच्या आमच्या नरदेहरुपी देवळाची रचना आईच्या उदरात, म्हणजेच चिंचेच्या पानावर होते, असे एकनाथ महाराज सांगतात.
पुढे ते म्हणतात की, बालपण खेळण्यात व तरुणपण कामात निघून जाते. या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे, हे कळून तो पाहायला जाईपर्यंत, देऊळ उडून जायची, म्हणजे नरदेहात राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते. म्हणून तत्पूर्वीच, हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडला आहे, त्या सद्गुरुला देऊळ उडण्याआधी म्हणजे नरदेह हातून निसटून जाण्याआधीच, शरण जावे.
दोन "पाषाण" एकत्र करून बांधलेली सांगड, म्हणजे दोन जड देहांचे मिलन. अर्थात लग्न ! ते देहाशी देहाचे लावले जाते. तो देह जड असल्याने त्याला पाषाण, असे म्हटलेले आहे. आणि या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर "मृगजळ" म्हणजे "संसार", खऱ्या अर्थाने सुरू होतो. मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते, त्याप्रमाणेच संसारही प्रत्यक्षात नसून भासत असतो.
या संसाररूपी मृगजळात, म्हणजे खोट्या कल्पित संसारात "अहंकार"रुपी "वांझेचा पोर" पोहून जातो. म्हणजेच संसारात, सर्व काही मी केले म्हणूनच झाले, माझ्याशिवाय इथले पानही हलत नाही, हा जो मनुष्य अहंकार बाळगतो, त्याला नाथ महाराज "वांझेचा पोर" म्हणतात. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. हा अहंकार खोटा आहे, म्हणूनच त्याला "वांझेचा पोर" असे म्हटले आहे. आणि तो अहंकार आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो आहे, असे आपल्याला भासते.
पुढे ते म्हणतात, या मृगजळाच्या डोहात, "दोन तोंडांची हरणी" म्हणजे "वासना" पाणी प्यायला आली. जरी शरीराकडून प्रत्यक्षात, वाईट कृती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही, तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते, आणि म्हणूनच "मुखाविण पाणी प्याली रे". प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल, तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला, शरीराने भजनात रमत असतानाही, मनाने विषयांची गोडी चाखवतेच.
"आंधळ्याने पाहिले". आंधळे असते ते आमचे "ज्ञान". कारण ते आपल्यात सुप्तावस्थेत आहे. सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस, दिव्य होऊ शकत नाही. म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू लागतो, म्हणजे ज्ञानही डोळस बनते, जर सद्गुरुला शरण गेलो तर. बहिऱ्याने ऐकिले. बहिरा म्हणजे ज्याला कान नाहीत तो.
याबाबतीत, पुराण काळातील महादेवांनी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट उदाहरणादाखल घेता येईल. त्यांनी जेव्हा गुह्य ज्ञान पार्वतीला एकांतात बसून सांगितले, तेव्हा ते सांगत असताना, त्यांना सतत हुंकार ऐकू येत होता. ज्ञान देऊन झाल्यावर, त्यांनी डोळे उघडून पाहिले तर, पार्वती झोपली होती. मग इतका वेळ हुंकार कोण देत होते, याचा शोध केल्यावर एका मासळीच्या पोटातील "गर्भा"ने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले व त्या मासळीचे पोट फाडल्यावर "मच्छिंद्रनाथां"चा जन्म झाला. म्हणून आदिनाथ हे मच्छिंद्रनाथांचे "गुरु" म्हणून ओळखले जातात. आता, मासळीचे शरीर पाहिल्यास, त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते. तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे. मग तरीही, मासळीच्या पोटातील गर्भाने ते गुहय ज्ञान ऐकून हुंकार द्यावा, याचाच अर्थ.. आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून, सर्वांगाचे कान करून एकचित्ताने ते ज्ञान ऐकणे, इथे अभिप्रेत असावे, असे वाटते.
म्हणून "बहिऱ्याने ऐकिले" याचाच अर्थ.. बाकी सगळीकडचे चित्त काढून, सर्वांगाचे कान करून, गुरूंनी दिलेला मंत्र, गुह्य ज्ञान ऐकणे.. हा अर्थ नाथांना अभिप्रेत असावा, असे वाटते. शिष्य कितीही बहिरा असला, म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला, तरी सांगणारा गुरु जर ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रीय मिळाला, तर बहिराही ऐकू शकतो. म्हणजे त्याच्याकडूनही उत्तम श्रवण घडते.
"पांगळ्याने पाठलाग केला रे". इथे पांगळे आहे ते आमचे "मन". कारण मनाला पाय हा अवयव नाही. पण तरीही ते, आमच्या पायांपेक्षा कितीतरी जलद गतीने, कुठेही, केव्हाही जाऊ शकते. म्हणून पांगळे म्हणजे "मन" ते या गुरुवचनाचा पाठलाग करू लागते.
आणि म्हणूनच "संत एकनाथ महाराज" म्हणतात की,
¶¶ जनार्दन स्वामींच्या कृपेने, जी अनुभूती मला मिळाली, त्यावरून मी सांगतो की, जरी तुमच्याजवळ अहंकार असेल, वासना असेल, ज्ञान आहे पण ते सदोष आहे किंवा आंधळे आहे, दिव्य ज्ञान नाही, गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही, मन सैरावैरा विषयांकडे धावत आहे... अशा सर्व परिस्थितीतही जर गुरूंनी दिलेले "नाम" जवळ बाळगले, तर तुम्ही नक्की तरून जाल. गुरुकडून हरिनाम मला मिळाले, त्या हरिनामामुळेच मी तरून गेलो. म्हणून मी एकपणाने तुम्हाला विनवित आहे की, एकचिताने सर्वांनी नाम घ्या. आणि देऊळ उडण्याआधीच, त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या."
•||👣|| जय दत्त ||👣||•
No comments:
Post a Comment