TechRepublic Blogs

Friday, October 25, 2024

भक्ति

 *भक्ति म्हणजे काय ?*


*ईश्वरावर अकृत्रिम प्रेम करणे, मन आणि बुद्धी त्याच्या प्रेमाने भरुन जाणे याचे नांव भक्ती.* *माणसाच्या अंगी सर्वोत्तम ईश्वराचे दर्शन घेण्याचे सुप्त* *सामर्थ्य आहे. तो बाह्य दृष्याच्या आधीन झाल्याने त्याचा आनंद विषयात फसला आहे. बहुसंख्य* *मानव अशा अवस्थेतच मरुन जातात.* *प्रपंचावरील प्रेम कमी कमी करत ईश्वरावरील प्रेम वाढवत राहाण्यास भक्तीमार्ग नामभक्ती उपयोगी पडते..*


*भक्तीमध्ये बाहेर धांवणारे मन परतवून मन भगवंताच्या सन्मुख करावयाचे असते. देह म्हणजे मीच आहे ही भावना मानवी जीवनाच्या दुःखास कारण आहे.* *परमार्थात देहाची आसक्ती नाहीशी करण्याचा मुख्य प्रयत्न असतो.* *मनुष्य जन्म मिळणे कठीण. केवळ याच योनीत परमेश्वराचे ज्ञान करुन घेता येते.* *भक्तीने ते साध्य तर होतेच पण तो परमेश्वरही भक्ताचा* *दास बनतो म्हणून देवही भक्ती सुख भोगण्यासाठी मानव जन्म मिळावा अशी इच्छा करतात. मनुष्य देहाचा उपयोग भगवंतासाठी करावा. त्यातच जीवनाचे सार्थक मानावे.*


   *पापपुण्य सम समान झाले की नरदेह प्राप्त होतो. अशी संधी माणसानें फुकट घालवू नये. स्वर्गात जायचे की नरकांत ते याच जन्मात ठरवायचे आहे. मनुष्य पैसा आणि वासना यांच्य मागे लागून आयुष्य वाया घालवतो  म्हणून गुरूंना दुःख होते. आणि ते मानवांना सावध करतात.  सावध होणे म्हणजे भक्तीमार्गाला लागणे ! 

राम नाम तोंडी येणे पहिले भाग्य, आणि भगवंताशी एकरुप झालेले भक्त भेटणे हे त्याहून मोठे भाग्य !सत्संगाने साधक सद्रूप बनतो. सत्संग हा निर्विषय, उत्तम व निरतिशय सुख देणारा आहे. इंद्रियाशिवाय स्वानंद कसा भोगावा, तसेच विषयाशिवाय परमानंद कसा मिळवावा याचे ज्ञान केवळ संतांपासून मिळते.

 दीपाची संगत घडली की कापराचे कापूरपण नाहीसे होते, त्याचप्रमाणे संतांची संगत मिळाली की देहात्मबुद्धीची निवृत्ती होते. म्हणून भक्तीमार्गात सत्संगतीचे भाग्य सर्वात थोर आहे. भक्तिमार्गात भजन किर्तन, नामस्मरण यासच महत्व आहे.*


   *भक्तीला, नामस्मरणाला स्थळ, काळ, वेळ, वय, ज्ञान कशाचीही आवश्यकता नाही. आहे त्या परिस्थितीत भक्तीच्या जोरावर, नामस्मरणाच्या  जोरावर साधक परमेश्वराशी अनुसंधान ठेवू शकतो.

 संकलन आनंद पाटील*

No comments:

Post a Comment