TechRepublic Blogs

Tuesday, October 8, 2024

भगवंत

 *॥श्रीहरिः॥* 


भगवंत पुढे म्हणतात, 


'मृत्यूच्या वेळी देहत्याग करताना जो भाव मनात असेल, त्या भावालाच मानव प्राप्त होतो, हे अतिशय महत्वपूर्ण विधान भगवंतांनी केले आहे.'

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः


*यं यं वाऽपि स्मरन्भावं*

*त्यजत्यन्ते कलेवरम् ।*

*तं तमेवैति कौन्तेय* 

*सदा तद्भावभावितः ॥*

*॥८.६॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.६) 


*भावार्थ :- हे कुंतीपुत्र अर्जुना ! आपल्या देहाचा त्याग करीत असताना, मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निःसंदेह प्राप्ती करतो.* 


भगवान श्रीकृष्ण पुन्हा आपलं म्हणणं स्पष्ट करताना सांगतात, की 


'मृत्युसमयी माझं चिंतन करून जो देहाचा त्याग करतो, तो माझ्या दिव्य स्वभावाला प्राप्त होतो. अंतःकाळी मनुष्य ज्या भावनेने प्रेरित होतो, त्यालाच तो प्राप्त होतो. मग तो भाव पशुत्वाचा असो किंवा देवत्वाचा.'


*"तुम्ही जसा विचार कराल, तसेच बनाल."*

मनुष्याला प्रत्येक क्षणी येणारे विचार हे त्याच्या पूर्वसंस्कारांमुळेच येत असतात. साहजिकच, जो संपूर्ण आयुष्य मायेच्या आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवून,सत्यामध्ये स्थापित होण्याचा प्रयत्न करतो, त्याचे आध्यात्मिक संस्कार दृढ होतात. मनन आणि संस्कार यांच्या सातत्याच्या प्रभावामुळे मृत्यूच्या वेळीदेखील त्याची वृत्ती, ओढ सहजपणे आपल्या लक्ष्याकडेच आकृष्ट होते. परिणामी मृत्यूनंतर तर त्याची यात्रा आपल्या ठरावीक लक्ष्याच्या दिशेनेच अग्रेसर होते. 

*त्यामुळे* 

कदापि असा विचार करू नका, की 

'सध्या तरी आपण मायेचाच आनंद लुटू या, मग अंतःकाळी ईश्वराचं स्मरण करता येईल.' 


*कारण* 

आपली पुढची यात्रा ठरवण्याची संधी ही अंतिम समयी आपल्याला मिळत नाही. याचाच अर्थ, संपूर्ण जीवनात ज्या वृत्तींची आपल्याला सवय झाली आहे, त्याच वृत्ती अंतिम क्षणी मनात उफाळून येतात.

आपल्या मृत्यूचं वर्ष, दिवस अथवा वेळ कुणाला तरी ठाऊक असते का? 


*नाही ना!* 

अखंड सुरू असणारा श्वासोच्छ्वास केव्हा थांबेल, हे कोणीही जाणत नाही. त्यामुळे आता विचार बदलण्याची वेळ आली आहे, 

पण हे मनुष्याला कळणार कसं? 

*जसं,*

शाळेमध्ये कित्येकदा सरप्राइज टेस्ट घेतली जाते. त्यावेळी नियमितपणे अभ्यास करणारी मुलं परीक्षेत किमान लिहू तरी शकतात. परंतु

परीक्षेच्या एक दिवस अगोदर पुस्तक उघडून अभ्यासाची, वाचण्याची सवय असणाऱ्या मुलांना काही आठवण्याची शक्यता तरी कशी असेल ?


*जसं,* 

एक मनुष्य आयुष्यभर फक्त भांडणतंटाच करत राहतो.शत्रुत्वाच्या अग्नीतच जळत राहतो. कुणाचा बदला कसा घ्यायचा, याचेच विचार मनात सतत बाळगतो. तेव्हा मृत्यूच्या वेळीदेखील त्याचे हेच भाव कायम राहतील. परिणामी त्याचं पुढील आयुष्यही याच भावनेमुळे प्रभावित होईल. मग या जीवनामधूनच पुढील जन्म तयार होतो. प्रत्येक दृश्य हे पुढच्या दृश्याची तयारी असते. त्यामुळे आपण किती सावध, सतर्क राहायला हवं! 


*थोडक्यात,* 

आयुष्यभर भगवंताच स्मरण-चिंतन केलं पाहिजे. तरच अंतकाली परमेश्वराचं नाव आठवेल! आयुष्यभर परमेश्वराचं नाव घेण्याची सवय नसेल तर मृत्यूसमयी तरी ते कसं आठवणार?


आयुष्यभर केवळ पैशाचाच विचार केल्यावर देवाचं नाव अखेरीस तरी कुठून आठवणार? 


*उलट* अखेरीस मनच थाऱ्यावर नसतं. त्यामुळे जो भाव जोपासलेला असतो तोच भाव त्याक्षणी प्रगट होतो आणि माणूस आयुष्यभर त्याच भावाला जोडला जाऊन नवीन देह धारण करतो. जन्म-मृत्यूचं रहाटगाडगं असंच सुरू रहातं. पूर्वजन्मीचे संस्कार मग कार्यरत होतात. 


*पण* 

'जो ज्ञानी असतो तो जीवनभर शास्त्रशुद्ध रीतीनं कर्म करून अंतकाली देवाचं नाव घेऊन देह सोडतो आणि त्याला जाऊन मिळतो.' 


अंतकाळी परमेश्वराचं नाव घेऊन देहत्याग करणं हे एक रूपक आहे. एखादी ज्ञानी व्यक्ती जर कोमात गेली आणि तिला देहभानच उरलं नसेल तर ती देह सोडताना परमेश्वराचं नाव तरी कसं घेणार? 


मग ज्ञानी असूनही केवळ देह सोडताना नाव घेतलं नाही म्हणून ती परमेश्वरापर्यंत जाणार नाही? असं कसं शक्य आहे? 


*म्हणजेच*

 या श्लोकातून भगवंतांना वेगळंच काही सांगायचं आहे. त्यासाठी या श्लोकातला गूढ अर्थ जाणून घ्यायला हवा. देह सोडतानाच्या अवस्थेत व्यक्तीच्या इंद्रियांनी नाव घेण्याचं काहीच कारण नाही. तिच्या अर्धजाणीवयुक्त मनात त्याच्या कर्मांचा ताळेबंद सुरक्षित असतो.


आयुष्यभर त्या व्यक्तीनं समजपूर्वक भगवंताचं कार्य केलं असेल आणि निष्काम कर्मयोग करून भगवंतांचं नाव घेतलं असेल तर अशी ज्ञानी व्यक्ती अंतर्बाह्य शुद्ध झालेली असते. तिचा श्वास शुद्ध बनलेला असतो. भगवंताचं नाम त्या व्यक्तीच्या रोमारोमांत अगदी अर्धजाणीवयुक्त मनात भिनलेलं असतं.अर्जुनाच्या रंध्रारंध्रांतून, केसाकेसांतून कृष्णनाम ऐकू यायचं इतकं ते भिनलेलं होतं. अखेर शुद्धत्वच भगवंतापर्यंत पोचू शकतं. 


देह सोडताना जे जीवाबरोबर जाणार असतं तिथे भगवद्नाम आणि भगवद्कार्याचा ताळेबंद जोडलेला असतो (Attached file!). त्यावरूनच जीवाचा प्रवास परमेश्वरापर्यंत होणार किंवा नाही हे ठरतं. 


आयुष्यभर कुकर्मं करावीत आणि देह सोडताना परमेश्वराचं नाव घ्यावं, की पोचला परमेश्वरापर्यंत! इतकं का हे सोपं आहे? 


अशा पद्धतीनं या श्लोकासंदर्भात जे इतरत्र विचार सांगितले गेले ते पटणारे नाहीत.


*त्यामुळे* समजून-उमजून आणि निष्काम कर्म करूनच परमेश्वर विषयीचं चिंतन आपल्या रोमारोमांत भिनवलं पाहिजे. तर मग देह सोडताना केवळ तोंडानं त्याचं नाव घेण्याचं कारणच उरणार नाही. स्वतः परमात्मा आपलं आनंदानं स्वागत करील!


*सारांश:* 

*किडा सतत भ्रमराचं चिंतन करीत असतो. त्यामुळे एक दिवस तो स्वतःच भ्रमर बनून जातो! तद्वत् परमेश्वराचं अहोरात्र चिंतन आणि त्याला साधर्म्य असणारं निष्काम कर्म केलं पाहिजे. श्वासासह स्वत:ला शुद्ध केलं पाहिजे. म्हणजेच माणूस अखेरीस त्याच्याशी एकरूप होऊन जाईल. शुद्धत्वच परमशुद्धत्वाला मिळू शकतं!*


गीताशास्त्र श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता - सरश्री. 


*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*

No comments:

Post a Comment