🌈🛕⛱️🏆
शहरातल्या ताई,
पाणी जपून वापरा बाई.
तुमच्या बंगल्यात आहेत
जागोजागी नळ
पिण्यासाठी, धुण्यासाठी
अंगणात सडा टाकण्यासाठीही
न्हाणी घरातल्या नळांचीही
काय सांगावी हौस
कधी गरम कधी गार
कधी चक्क पाऊस
एकेका नळाची
एक एक नवलाई..
पण ताई पाणी
जपून वापरा बाई
शहरात तुमचं बरं आहे
बटन दाबलं की पाणी आहे
कधी बोरचं,
कधी मुन्शीपाल्टीचं
सगळं आबादानी आहे
कालचं भरलेलं सरत नाही
म्हणून आजचं भांडं भरत नाही
कधी कधी म्हणे पाणी
ठेवायला भांडं सुद्धा उरत नाही
फुलझाडांच्या अंगाखांद्यावर
पाणी खेळत राहतं
फरशी धुवा, गाड्या धुवा
घर भिजून जातं
मोटर बंद करायची ही
कुणास नसते घाई..
पण तरी ही, ताई,
पाणी जपून वापरा बाई
हंडाभर पाण्यासाठी
गाव तिकडं जागतंय
तासभर झिरा उपसल्यावर
पिण्यापुरतं भागतंय
उन्हातान्हात अनवाणीच
पाणी हुडकतात पाय
कडेवरती तान्हं घेऊन
धावते कुणाची माय...
वाटी वाटी पाणी उपसून
हंडा भरत नाही,
शहरातल्या ताई,
*पाणी जपून वापरा बाई.*
राजेश्वर शेळके
🍁🌈🛕⛱️🍁
No comments:
Post a Comment