*॥श्रीहरिः॥*
सकाम व निष्काम भक्ताची उपासना व फल यातील भेद उलगडून सांगताना भगवंत म्हणतात,
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्याय:
*अन्तवत्तु फलं तेषां*
*तद्भवत्यल्पमेधसाम् ।*
*देवान्देवयजो यान्ति*
*मद्भक्ता यान्ति मामपि ॥*
*॥७.२३॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.२३)
*भावार्थ : परंतु; अल्पबुद्धी लोकांना मिळणारं हे फल नाशिवंत असतं. (याप्रमाणे) देवतांची आराधना करणारे देवांना प्राप्त होतात आणि माझे भक्त (उपासक) मला प्राप्त होतात.*
'अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात. पण त्यांना प्राप्त होणारी फळं मर्यादित आणि अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात. पण माझे भक्त मात्र अखेर माझ्याच परमधामाची प्राप्ती करतात.'
*मंदिरात* किंवा *धार्मिक स्थळांमधे* जाऊन श्रद्धेमुळे जर सत्प्रेरणा मिळत असेल तर ती गोष्ट केव्हाही चांगली. क्लबमधे जाऊन पत्ते खेळल्यामुळे अशी प्रेरणा खचितच मिळत नाही. म्हणून सामान्य लोक श्रद्धेमुळे काम करतात त्याचं फळ त्यांना मिळतं.
*परंतु;भगवंत सांगतात की,*
त्यांचं हे फळ टिकऊ नसतं. मोक्षाचं फळ जसं टिकाऊ आणि नित्य असतं तशीसामान्य श्रद्धेची फळं ही टिकाऊ नसतात. ती अनित्य असतात. याचं कारण, जे आराध्य दैवत असतं तेच मुळात अनित्य असतं. साऱ्या देवदेवता या परमेश्वराचंच स्वरूप आहेत. त्या परमेश्वरानंच निर्माण केलेल्या आहेत. मात्र या देवदेवता नित्य नसतात.मनुष्याची त्यांच्यावरची श्रद्धा देखील त्यामुळे नित्य नसते. म्हणून फळंही अनित्यच असतं.
*अनित्याकडून नित्यत्व* कधी मिळू शकत नाही किंवा अपूर्णाकडून मिळालेलं फळ हे कधी पूर्ण असू शकत नाही. मोक्षाकरता किंवा परमप्राप्तीसाठी ते कारणीभूत होऊ शकत नाही. या जन्मातच ते भोगून संपून जातं. शिवाय, या अनित्य भौतिक देवदेवतांच्या उपासनेमुळे अनित्य भौतिक फळंच मिळतात - मोक्षासारखं चिरंतन फल मिळत नाही. जो वासुदेवाची (परमतत्त्वाची) आराधना करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. देवदेवतांची उपासना करणारे देवदेवतांकडे जातात. म्हणजेच स्वर्गलोक, शिवलोक, विष्णुलोक असे लोक त्यांना प्राप्त होतात. तर जे परमात्म्याचं ध्यान करतात त्यांना मोक्षप्राप्ती होऊन त्यांचं जन्म - मरण टळतं. एका अंतिम आनंदसागरात ते डुंबत राहतात.
*भगवान श्रीकृष्ण सकाम भक्तांना अल्पबुद्धी म्हणजे कमी हुशार असं संबोधतात.*
कारण त्यांच्याकडे मिळवण्यासाठी संपूर्ण विशाल असा सागर(तत्त्वज्ञान) आहे, परंतु ते छोट्या छोट्या भौतिक गोष्टींची मागणी करून, त्यातच खूश होतात.
*हे तर असं झालं की,*
एक राजा त्याच्या सेवकावर खूश होऊन त्याला म्हणतो,
'मी तुझ्या सेवेने अत्यंत प्रसन्न झालो आहे. माझ्या खजिन्यातून तुला पाहिजे तितकं धन घे.'
पण त्या सेवकासाठी १०० मुद्रा म्हणजेच सर्वांत मोठी संपत्ती होती, केवळ तिचीच तो कल्पना करू शकत होता. त्यामुळे तो तेवढीच मागणी करतो. राजा मनातल्या मनात हसतो. कारण त्यावेळी त्याला विचार येतो,
'अरे, मी तर या सेवकासाठी संपूर्ण खजिना उघडा करून दिला होता पण हा तर केवळ शंभर मुद्रांमध्येच खूश झाला!'
*विचार करा,*
प्रत्यक्षात *ईश्वर* स्वतःच तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहे. आणि त्यावेळी तुम्ही त्याला सांगताय, की
'मला चांगले मार्क्स मिळू दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, मला चांगली मदतनीस मिळू दे, माझा बॉस माझी रजा मंजूर करू दे...'
*अशा वेळी* ईश्वरदेखील किती हसत असेल बरं, याची कल्पना न करणंच चांगलं. आपल्या प्रार्थनांनुसारच ईश्वर आपल्या इच्छा पूर्ण करत असतो. परंतु हे फळ नाशवंत आहे. कारण काही काळानंतर त्या फळांचं मूल्यच शिल्लक राहत नाही.
*हरिया* नावाचा एक शेतकरी होता. तो नेहमी देवकार्यात मग्न असायचा. गावामध्ये सगळे लोक त्याला मोठा भक्त समजायचे. तरीही हरियाला दुःख होतंच.
*त्याचं* एकमेव दुःख म्हणजे त्याला संतती नव्हती. म्हणून त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन ईश्वराने त्याला संतती म्हणून एक मुलगी दिली.आता त्याचं निःसंतान असण्याचं दुःख दूर झालं. पण त्याचबरोबर दुःखाच्या पुढच्या अध्यायालाही सुरुवात झाली. आपल्याला मुलगी आहे पण मुलगा नाही... म्हणून त्याने ईश्वराकडे मुलाची मागणी केली. ईश्वराने तीदेखील पूर्ण केली. पण त्याचा मुलगा अभ्यासात हुशार नव्हता. म्हणून हरिया पुन्हा दुःखी झाला. आता आपल्या या दुःखासह पुन्हा एकदा तो ईश्वराला शरण गेला. आता त्याचं हे दुःखदेखील दूर झालं. पण त्यानंतर काही तो थांबला नाही... कधी मुलांची नोकरी, कधी लग्न, कधी सून, कधी मुलांची मुलं... अशा कित्येक दुःखांची गाऱ्हाणी घेऊन तो ईश्वराला सतत काही ना काही मागतच राहिला... आणि एके दिवशी अशाच एका अपूर्ण इच्छेसह मरण पावला.
*हरिया* आयुष्यभर ईश्वराची भक्ती करत राहिला तरीदेखील तो शेवटपर्यंत दुःखीच राहिला...भक्तीचा परिणाम म्हणून त्याच्या सगळ्या इच्छाही पूर्ण झाल्या. शिवाय त्याच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्याने त्याला जो आनंद मिळाला तोदेखील मावळला.
*(यालाच नाशवंत फळ असं म्हटलं आहे)*
*परंतु* ज्ञानाच्या अभावी नवीन इच्छा निर्माण होतच राहिल्या... अपूर्णता, दुःख आणि अतृप्त इच्छांसमवेतच त्याचा मृत्यू झाला. एका अज्ञानी सकाम भक्ताचं जीवन अशा प्रकारचंच असतं.
*एखाद्या* गाळणीच्या साहाय्यानेच तो ईश्वरीकृपा ग्रहण करतो. कृपा येते आणि जाते... तिचा ते लाभ तो घेऊच शकत नाही. त्याची झोळी रिकामीच राहते, मात्र त्याच्याकडे पाहणाऱ्याला वाटतं,
'अरे तो किती पूजा- पाठ करतोय, कितीतरी पुण्य कर्म करतोय... त्या भक्तीमुळे त्याला नक्कीच मुक्ती मिळणार...'
*परंतु* प्रत्यक्षात आतून तो एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे रिक्त, पोकळच राहतो. पुत्र, संपत्ती, नातवंडं यांसारख्या त्याच्या सगळ्या इच्छा याच जगात राहतात... ज्या इच्छांचा त्याला कोणताही उपयोग नसतो... पण निष्काम भक्ती, ज्ञान यांसारख्या इच्छांचा, ज्यांचा त्याला उपयोग झाला असता, त्या तर दुर्दैवाने त्याने मागितलेल्याच नसतात.
*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*
देवतांचं पूजन करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझ्या भक्तांनी कोणत्याही प्रकारे माझं पूजन केलं तरी, शेवटी ते मलाच प्राप्त होतात. या पंक्तीचा अर्थ सविस्तर समजून घेऊ या.
*निसर्गाचा हा नियम आहे, की*
'ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो तसेच बनतो.'
*एखाद्या देवाची* तुम्ही पूजा करत असाल आणि फोकस इच्छापूर्तीवरच असेल तर हरियाच्या बाबतीत जे घडलं तेच तुमच्या बाबतही घडेल. त्या देवतेमध्ये आपल्याला ईश्वर नाही तर इच्छापूर्तीचं एक साधन मात्र दिसेल. आपलं डिलिंग ईश्वराबरोबर नव्हे तर त्या साधनाबरोबर किंवा निमित्तासोबत होईल. अशा प्रकारे निमित्ताच्या सान्निध्यात जाऊन आपल्याला ईश्वराची भेट तर घडणारच नाही, ईश्वरप्राप्तीही होणार नाही.
*आपण* महान भक्त संत तुकाराम आणि संत मीराबाई यांच्यासंबंधी ऐकलंच असेल. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा केली, विठ्ठलालाच सर्वस्व मानलं, तर संत मीराबाईंनी श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन केलं. परंतु त्यांनी आपल्या आराध्याला इच्छापूर्तीचं साधन नव्हे तर ईश्वर मानूनच पूजलं. ते साधनांचे नव्हे तर ईश्वराचे परम भक्त होते. परिणामी त्यांना ईश्वरप्राप्ती झाली. मूर्तिपूजेचा खरा उद्देश तिथे पूर्ण झाला. परमभक्तासाठी ईश्वर एकच असतो,मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना!
*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*
'माझ्या भक्तांनी मला कसंही भजलं, कोणत्याही रूपात अथवा मूर्ती समजून भजलं, ते जर माझीच भक्ती करत असतील तर ते मलाच प्राप्त
होतील.' कारण तिथे वेगळ्या गोष्टींची किंवा इच्छांची मागणीच नसेल, मागणी केवळ ईश्वराचीच असेल.'
*या* निरनिराळ्या देवतांची भक्ती करता करता उपासकाची बुद्धी स्थिर आणि शुद्ध व्हायला लागते.अखेरीस भक्ताला भगवंताच्या एकमेव विराट- सूक्ष्म, कालतीत आणि नित्य स्वरूपाचं ज्ञान होतं.पुण्याहून एखादी आगगाडी दिल्लीला जाणार असेल तर असा भक्त निदान दिल्लीच्या गाडीत तरी बसतो म्हणजेच जशी समज येईल त्यानुसार या भिन्न देवतांच्या उपासनेतून अंति परमात्म्याच्या उपासनेपर्यंत मनुष्य जाऊन पोचू शकतो. पण तोपर्यंत जी फळं मिळतात ती मात्र अनित्यच असतात. मनुष्यानं या गोष्टी ध्यानात घेऊन फळांमधेच गुंतून पडू नये. तर देवदेवतांच्या पलीकडे असलेल्या त्या अंतिम परमात्म्याचं स्वरूप जाणण्याची इच्छा धरावी.
*'ज्ञानी'* भक्त होण्याची आकांक्षा मनात ठेवून त्या दृष्टीनं परमेश्वराचं विश्वव्यापक *'वासुदेव रूप'* आपण समजून घ्यायला हवं, असा यातून आशय निघतो.
*सारांश:*
*अनित्य देवतांच्या उपासनेतून अनित्य फळच मिळू शकतं. अपूर्णाकडून पूर्णत्व कधी मिळू शकत नाही. आपली कर्म आणि उपासनापद्धती प्रगल्भ बनवली पाहिजे.अंतिम परमात्म स्वरूपाचा शोधघेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो नित्य असल्यामुळे त्याच्याच उपासनेतून मिळणारं फलही नित्यच असतं.*
संपूर्ण भगवद्गीता - सरश्री.
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
No comments:
Post a Comment