🙏🌹🌹🌹🙏केळीच्या झाडात देवाची वस्ती असते असे मानतात. केळीच्या झाडाला "रंभा "असेही म्हणतात. केळीच्या झाडाला लक्ष्मीचे प्रतीक मानतात. म्हणून लग्न मुंज अगर अन्य शुभप्रसंगी दारात दोन बाजूला लेकुरवाळ्या केळीची रोपे उभी करून तोरण तयार करतात.
सत्यनारायण पूजेचे वेळी सुद्धा चौरंगाला चार बाजूला केळीचे खांब लावण्याची ची पद्धत आहे. केळे हे ऐश्वर्य संपन्न फळ आहे. विपुल पीक देणारे, व्यापारात भरपूर पैसा देणारे असे हे झाड आहे.
शुभ प्रसंगी जेवणासाठी केळीचे पान शुभ मानले जाते. शुभ प्रसंगी मांडताना पानाचे पुढचे टोक कापतात.व श्राद्ध पक्षा वेळी सुद्धा केळीचे पान वापरतात, पण त्याचे पुढचे टोक कापायचे नसते. केळीचे पान म्हणजे राजवैभवाचे पान समजले जाते.
पानाचे तुक तुकीत हिरवे अंग! या त्याच्या ऐश्वर्या मुळे पूजेत आणि दर्जेदार पंक्तीत केळीच्या पानाला अग्रस्थान लाभलं आहे..हिरव्या पानाच्या पदरा आड लपलेली केळीची बाळं जणू आईच्या कुशीत मोठी होतात. एका घडात व एक मेकांना चिकटून भावंड आईच्या पोटाशी कवटाळून झोपलेली असतात.
जणूकाही एका रांगेत बसण्याची आईने त्यांना सवय लावलेली दिसून येते. हळवी, लाजरी, गरीब, भाबडी, शिस्तप्रिय, लेकुरवाळी केळी गोरगरिबांचा पासून श्रीमंतां पर्यंत सर्वांना ती हवी हवीशी वाटणारी जणू ती लक्ष्मीच आहे. कारण लक्ष्मी सर्वांना हवी हवीशी वाटते. लक्ष्मीचे वैभव केळीला प्राप्त झाले आहे.
लक्ष्मी जशी पिवळ्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली असते त्याच प्रमाणे पिवळाधमक रंग केळी लक्ष्मीने परिधान केला आहे. कष्ट करा, लक्ष्मी मिळवा हाच संदेश ते आपणाला देत आहे. एकदा श्रीकृष्ण विदुराच्या घरी गेला. विदुर पत्नी स्नान करीत होती. श्रीकृष्ण आलेला पाहिल्यावर ती ओल्या वस्त्राने बाहेर आली. तिने कृष्णाला पाहिले. लगेच कृष्णाला देण्यासाठी केळ्याची साल काढून देणार होती.
सोलता सोलता केळे खाली पडले व साल हातात राहिली व हे तिला कळलेच नाही, आणि कृष्णाने सुद्धा ती साल अमृतापेक्षा गोड मानून खाल्ली. केळे कृष्णाला प्रिय झाले. म्हणून केळ्याचा नैवेद्य, देवापुढे केळी ठेवण्याची ची प्रथा सुरु झाली. आणि म्हणूनच सत्यनारायणाच्या प्रसादात केळे घालण्याची प्रथा सुरु झाली आणि अशाप्रकारे केळ्याला व केळ्याच्या झाडाला पवित्र पणाचा मान मिळाला.
🌹🌹🙏🙏
No comments:
Post a Comment