TechRepublic Blogs

Sunday, July 7, 2024

आयुष्यातला रस..

 _*आयुष्यातला रस....*_


_*रामकृष्ण परमहंस* यांना खाण्याचा फार शौक होता.त्यांच्या पत्नींना,शारदामाता यांना याचं फार आश्चर्य  वाटायचं.हा एवढा संन्यस्त माणूस,विरक्तीला पोहोचलेला पण खाण्याची इतकी आवड कशी?

बाहेर कशावरही चर्चा सुरू असली तरी हे जेवणाची वेळ होत आल्यावर मध्येच उठून आत यायचे आणि काय शिजतंय,कुठवर आलंय,आज बेत काय,हे पाहून जायचे.बाहेर ब्रह्म-जिज्ञासा सुरू असायची.त्यातल्या गहन प्रश्नातून अचानक ते बाहेर यायचे आणि थेट स्वयंपाकघराकडे पळायचे.हे पाहून त्यांच्या शिष्यांना,चाहत्यांनाही आश्चर्य वाटायचं.

असा कसा हा संन्यासी संन्याशाने कोणत्याही भौतिक गोष्टीत इतकी आस्था कशी ठेवावी असा विचार त्यांच्या मनात येत असे.एकदा शारदामाता धीर करून त्यांना म्हणाल्याच;"हे तुमचं तंत्र काही मला समजत नाही आणि आवडतही नाही.तुमच्यासारख्या सर्व संसारीक मोहपाशांवर तुळशीपत्र ठेवलेल्या माणसाला पानात जे पडेल ते खाण्याची सवय हवी.

तुमच्या मात्र जिभेला चोचलेच फार सतत तुमचं खाण्याकडे लक्ष असतं.तुमच्यासारख्या अधिकारी पुरुषाला हे शोभंत का? "रामकृष्ण म्हणाले;"अगं वेडे!माझी सगळ्या जगण्यावरचीच वासना केव्हाच उडून गेली आहे.फक्त खाण्याची आवड हा एकमात्र धागा मी जाणते पणाने धरुन ठेवलाय.तो जर मी सोडला तर माझा आत्मा या देहात कशाला राहील?माझ्या या देहाकडून काही कामं व्हायची आहेत.त्यासाठी मला तो टिकवायचाय त्यासाठी आयुष्यातला रस टिकवायचाय.

मी तो रस रसनेतून टिकवलाय एवढंच ज्या दिवशी मी तुझ्या हातचं सुग्रास भोजन नाकारेन त्या दिवसानंतर तीन दिवसांत माझा कारभार आटोपणार हे समजून जा. "आणि तसंच झाल एकदा आजारी असलेल्या परमहंसांसाठी शारदामाता जेवण घेऊन गेल्या.

ते नेहमीप्रमाण स्वयंपाकघरात आले नाहीत तेव्हाच त्यांच्या मनात पाल चुकचुकली होती.त्यांनी बिछान्यात आडव्या पडलेल्या परमहंसांपुढे ताट ठेवलं.त्यांनी त्या अन्नाकडे शांतपणे पाहिलं आणि निरीच्छपणे त्यांनी त्याकडे पाठ वळवली.*शारदामातेला काय तो संकेत समजला आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले....*_

No comments:

Post a Comment