श्रीगोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले प्रापंचिक माणसाने घरात असलेले सर्वांच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, परंतु प्रसंग आला असतां सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरे.
थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. मीपणातून जे देणे होते ते देणे नव्हेच. आपण देतो तेव्हा आपल्याजवळ किती आहे त्याचा विचार करून सांभाळूनच देतो. स्वभावतःच आपण फार हिशोबी आहोत. आपण दृश्य खरे मानतो.
त्यामुळे आपले देणेही दृश्यातले आहे. देहाने देतो तेव्हढेच खरे वाटते. श्रीगुरूंना जे द्यायचे ते अदृश्यातले आहे. ते कसे द्यायचे ते माहीत नाही कारण ते खरे वाटत नाही. काकडी खाल्ली की काकडीची ढेकर यायचीच, तसे सकाळी उठल्यापासून दृश्य आत भरत राहिलो की जे दृश्यापालिकडचे आहे त्याला जागाच राहात नाही.
त्यांना आपला मीपणा पाहिजे आहे पण तो कोण देतो. आपली फार विचित्र स्थिती आहे. विजेचे काम करणारे , लाकडी फळीवर उभे राहून काम करतात, त्यामुळे त्यांना विजेचा धक्का वाहत नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंकडून शक्तीचा प्रवाह येतो आहे पण आपण तो आत शिरू देत नाही . आपण दृश्याच्या फळीचा आधार सोडत नाही. सद्गुरूंकडून शक्ती एकसारखी वाहते आहे.
तुम्ही कितीही घ्या त्यात कमी होणार नाही. आई ज्ञानाच्या राशी आणून ओतत होती असे रामकृष्ण परमहंस म्हणाले.
No comments:
Post a Comment