चिंतन
श्रीराम,
समर्थांनी दासबोधात त्रिविध तापांची विस्तृत माहिती दिली आहे. भागवत ग्रंथातील पहिलाच श्लोक, सच्चिदानंद रुपाय | विश्वोत्पत्यादिहेतवे| तापत्रय विनाशाय |श्रीकृष्णाय वयं नमः ||
म्हणजे या सृष्टीची किंवा जगताची उत्पत्ती, स्थिती, आणि लय ज्याच्या इच्छेवर आहे आणि तीन तापांचे नाश करण्याचे सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे अशा सच्चिदानंद स्वरूप असलेल्या श्रीकृष्णाला नमस्कार करुया. या श्लोकात श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष स्वरूप (सच्चिदानंद) त्याचे सामर्थ्य (विश्वाची निर्मिती, स्थिती, आणि लय इ.) आणि त्याचा स्वभाव हे सांगितले आहे.
अशा सच्चिदानंद स्वरूप असलेल्या ईश्वराला अनन्यभावे शरण गेल्यावर आपल्या तिन्ही तापांची निवृत्ती होते. म्हणजे त्रिविध ताप नाहीसे होत नाहीत तर मी' म्हणजे देह' अशा देहबुद्धीने जी जी दुःखे आपण भोगत असतो ती दुःखे 'मी म्हणजे आत्मा' अशा आत्मबुद्धीने भोगली जात नाहीत.
भक्तीमार्गावरून प्रवास करताना या टप्प्याला पोहोचण्याचे आपले ध्येय असले पाहिजे. देहाशिवाय आपले अस्तित्व आहे ह्याची जाणीव सद्गुरू करून देतात. मात्र जेव्हा त्याचा अनुभव घेण्याचे क्रियमाण कर्म जीवाला म्हणजे आपल्याला करावे लागते त्याला साधना म्हणतात.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment