चिंतन
श्रीराम,
त्रिविध तापांनी माणूस संसारातील दुःखात पोळतो. संत सांगतात - मूल जन्माला येण्यापूर्वी गर्भावस्थेत असताना आणि जन्माला आल्यानंतर त्याला अनेक दुःखे यातना भोगावी लागतात.
ज्याप्रमाणे एखादे वस्त्र म्हटले की त्यात सुताचे आडवे उभे धागे अपरिहार्यपणे असतात. कारण त्याशिवाय वस्त्र बनणारच नाही. त्याचप्रमाणे जन्माला आल्यावर जोपर्यंत देह आहे तोपर्यंत दुःख हे अपरिहार्यपणे असणारच आहे. आपल्या आयुष्यातील कोणतेही दुःख हे त्रिविध तापांच्या वर्गीकरणातच सामावलेले आहे. दुःखाचा समूळ नाश करण्यासाठी "मी म्हणजे देह"! हा विचारच बदलावा लागतो. परमानंदाची प्राप्ती करण्यासाठी मी म्हणजे आत्मा हा विचार दृढ करावा लागतो. कारण आत्मा आणि आनंद एकत्र असतात. नव्हे आत्म्याचे स्वरूपच सच्चिदानंद आहे. म्हणून समर्थ सांगतात - देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी.
मी म्हणजे देह या विचारांचा त्याग म्हणजे जीवनातील सर्व दुःखांचा नाश. आणि मी म्हणजे आत्मा या विचाराचा स्वीकार म्हणजे जीवनात परमानंदाची प्राप्ती होय.. आणि हे फक्त परमार्थाच्या अभ्यासाने, सद्गुरूंच्या कृपेने आणि स्वतःच्या क्रियमाण कर्माने शक्य होऊ शकते.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment