TechRepublic Blogs

Friday, July 12, 2024

श्रीमंत माणसं

 *फक्त धन दौलत असली म्हणजे कोणी श्रीमंत होत नसतो,तर ज्याच्याकडे  मनाची श्रीमंती आहे तोच खरा श्रीमंत*

***********************************

ऑफिस मधुन निघाल्यावर का कोणास ठाऊक पण आज द्राक्ष खायची जाम इच्छा झाली,म्हणून घरी न जाता कार सरळ फ्रुटमार्केटच्या दिशेने वळवली.

फ्रुटमार्केटमध्ये गोड द्राक्ष कुठे मिळतील याचा शोध घेऊ लागलो.

असंख्य ठेले, लोटगाड्यांवरचे द्राक्ष चाखुन मी ते नाकारत होतो. जरा भटकंती झाल्यावर

थोड्या अंतरावरच गर्दी पासुन दूर एका झाडाच्या खाली एक म्हातारी टोपलंभर द्राक्ष घेऊन विकायला बसली होती.

या म्हातारीकडे तरी वेगळे काय असणार? मी स्वतःशीच बोललो..

"पण तरीही चाखुन बघायला काय हरकत आहे?" मी स्वतःलाच समजवत म्हातारीकडे जायला निघालो.

म्हातारीकडे बऱ्याच वेळापासुन कदाचित कोणी गि-हाईक आलेल नसाव कारण मी जवळ जाताच म्हातारीला आनंद झाला...

"आज्जी कशी दिलीत द्राक्षं..?" "या सायेब घ्या की द्राक्षं. लई ग्वाड हायेत. जशी साखरच हाय... खाऊन तरी बघा की" म्हातारी माझ्या हातावर द्राक्ष ठेवत म्हणाली.

मी द्राक्ष तोंडात टाकून चाखु लागलो....

अरेच्चा द्राक्ष खरचं खुप गोड आहेत की...

पुर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्ष नव्हती.

"आज्जी.. द्राक्षं खरचं खुप गोड आहेत गं.... पुर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्षं कुठेही नाहीत. पण तुझ्याकडे कशी गं..." गि-हाईक खुष झालेला पाहुन म्हातारीला ही आनंद झाला....

"आरं लेका ही वेलावरची पिकलेली द्राक्षं हायत. मार्केटला सगळी व्यापारी कार्पीट (म्हातारीला कार्बाईट म्हणायचे होते) टाकुन द्राक्षं पिकवित्यात, पण माझ्या मनाला ते आजवर पटलं न्हाई...दोन पैकं कमी मिळालं तर चालतय पण कुणाच्या जीवाशी खेळणं बरं न्हाई. आख्ख्या हयातीत कधीबी बेईमानीनं धंदा नाय केला."

म्हातारीच्या वयावरुन आणि चेहऱ्यावरुन ती खरं तेच बोलतेय हे मी ओळखलं.

"हं.. बरं काय किलो दिलीत?"

"किलोला दिडशे रुपये."

"बापरे... आजी भाव जास्त आहे की गं.... शंभर रु. किलो दे. दोन किलो घेतो."

"न्हाय रं लेका. किलोला शंभर रुपये न्हाय परवडत."

"बरं ठिक आहे... एकशे वीस रु. किलो दे." मी पुन्हा भाव करत बोललो.

"लेका आरं एकशे ईस रूपये तर माझी खरेदी हाय. किलोला एकशे तीस देते बघ. आता भाव नगं करू. एकतर आज कायबी माल ईकला न्हाई रं." म्हातारी केविलवाण्या स्वरात बोलली.

"बरं दोन किलो दे." दिडशे रूपये किलोची द्राक्षं मी एकशे तीस रूपयांत घेतली याचा मला अभिमान वाटत होता. दोन किलो मागे मी चाळीस रूपये वाचवले होते. मी मनातल्या मनात माझ्यावर खुष झालो.

म्हातारीने दोन किलो द्राक्षं बांधली वरतून अजुन एक लळ टाकली.

मी वॉलेट मधून पाचशे रुपयांच्या बंडल मधून एक नोट काढत म्हातारीला दिली. बंडल पुन्हा वॉलेट मधे ठेवून वॉलेट जीन्सच्या मागच्या पॉकेट मध्ये ठेवले.

म्हातारीने पाचशेची नोट घेऊन मांडी खाली ठेवली.

आणि कमरेला बांधलेल्या फाटक्या बटव्यातुन थरथरत्या हाताने तीनशे चाळीस रुपये काढून मला परत केले.

मी पैसे मोजले. तीनशे चाळीस!!! अरे व्वा म्हातारीने चुकुन मला शंभर रुपये जास्त दिले होते.

शंभर रुपयांचा फायदा. मला मनातूनच आनंद झाला.

म्हातारीच्या लक्षात यायच्या आत इथून निघायला हवे.

मी ते पैसे तसेच शर्टच्या वरच्या खिशात कोंबले.. आणि माघारी फिरुन कारच्या दिशेने निघालो.

सात-आठ पाऊले चालतो न चालतो तोच म्हातारीचा आवाज आला.

"आरं ल्येका.. थांब.."

मी न ऐकल्यासारखं केलं..

"आरे... ल्येका... जरा थांब तर. ईकडं ये.." म्हातारी पुन्हा जीवाच्या आकांताने ओरडली.

आता मला थांबून म्हातारीकडे जाणं भाग होतं.

"हिशोब म्हातारीच्या लक्षात आला वाटतं.." मी स्वतःशीच बोलत म्हातारीकडे गेलो.

म्हातारी जर शंभर रूपये जास्त दिल्याबद्दल बोलली तर काय सारवासारव करायची हे मी क्षणातच ठरवून ठेवले होते.

"काय झालं आजी... का हाक मारलीस... काही हिशोब चुकला का...?" मी जरा अपराध्यासारखा बोललो.

"न्हाई रे ल्येका. आरं हे तुझं पैशाचं पाकिट इथं खाली पडलं व्हतं बघं. तु जायला निघाला आनं.. माझं लक्षं गेलं बघ. हे घे बाबा तुझं पाकिट..." म्हातारी वॉलेटवरची धुळ तिच्या पदराने स्वच्छ करत आणि ते कपाळावर लावत मला वॉलेट परत देत बोलली.

आता मात्र मी स्तब्ध झालो.

मी लगेच जीन्सचा मागचा खिसा हाताने चाचपडला... खिसा रिकामा होता.

म्हातारीला पाचशेची नोट दिल्यावर वॉलेट पुन्हा खिशात ठेवतांना ते खिशात न ठेवता चुकुन खाली पडले होते.

"ओह.. माय गॉड.." माझ्या तोंडुन आपसुकच शब्द निघाले.

मी जाणुन बुजून म्हातारीचे जास्त घेतलेले शंभर रुपये आणि तीने प्रामाणिकपणे मला परत केलेले माझे हजारो रुपये. 

म्हातारीच्या प्रामाणिकपणाने मी माझ्याच नजरेत पडलो.

मला वाटलं होतं की म्हातारीने शंभर रुपये जास्त दिले हे तिच्या लक्षात आले म्हणून तिने मला परत बोलवलं... पण.... पण तिने तर माझे पैशाने भरलेले वॉलेट मला परत द्यायला बोलवलं होतं.

*म्हातारीचे शंभर रुपये जास्त घेऊन मला जितका आनंद झाला होता... त्यापेक्षा जास्त हजारो रुपये भरलेले वॉलेट मला परत करुन म्हातारीला झाला होता.*

मी अक्षरक्षः गप्पगार झालो. मला माझीच लाज वाटत होती.

वॉलेट मध्ये कमीतकमी पंधरा वीस हजार रुपये तरी नक्कीच असतील.

पण इतक्या पैशांचा म्हातारीला किंचितही मोह झाला नव्हता,

आणि माझी त्या गरीब म्हातारीच्या फक्त शंभर रुपयांवर लाळ गळली होती. 

"घे लेका तुझं पाकिट. आरं नीट ठेवत जा बाबा पैकं. तुम्ही श्रीमंत माणसं. तुमच्यासाठी लई मोठ्ठी रक्कम नसल ही.. तरी पण...

मी गप्पगारच झालो.

"तुम्ही श्रीमंत माणसं..." म्हातारीचे ते वाक्य ऐकुन पुन्हा अपराध्यासारखं झालं.

आता... आता... म्हातारीने मला जास्त दिलेले ते शंभर रुपये.. मला हजारो कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यासारखे वाटत होते..

म्हातारीला परत करुन टाकतो ते शंभर रुपये...

माझा हात वरच्या खिशात गेला...

पण... पण काय सांगु म्हातारीला.... शंभर रुपये जास्त दिले म्हणून... मी माझ्याच नजरेत पडलो... मला माझीच किळस येत होती...

"आज्जी, हे ठेव तुला काही रुपये... तु इतक्या प्रामाणिकपणाने मला माझे पैसे परत केलेस ना..."

मी पाचशेच्या दोन नोटा म्हातारीला देत बोललो...

"ऐ बाबा. नगं नगं. मला नको तुझा पैका. हा तुझा पैका हाय. या पैक्यावर माझा कायबी अधिकार नाही बघ.

पैसाच सगळं काही नसतं रं पोरा ईमान नावाची पण काही चीज असते की.."

म्हातारी नकळत मला खुप मोठी शिकवण देऊन गेली होती. मी नि:शब्दच झालो होतो.


"म्हातारीच्या प्रामाणिकपणामुळे पैसाच खुप काही असतो हा भ्रम आणि पैशाचा माज क्षणात गळून पडला.”


"तुम्ही श्रीमंत माणसं..." म्हातारीचे ते शब्द सतत कानात घुमत होते...


पण खरोखर श्रीमंत कोण होतं?? नोटांनी टम्म भरलेले वॉलेट असलेला पण नीतीमत्ता नसलेला मी की, फाटका बटवा असलेली पण नीतीमत्तेत तुडुंब प्रामाणिकपणा भरलेली ती...?

No comments:

Post a Comment