॥ॐ श्री परमात्मने नमः॥
श्रीमद्भगवद्गीता अध्याय नववा
*"राजविद्याराजगुह्ययोग"*
श्लोक संख्या :- ३४
वक्ते :- भगवान श्रीकृष्ण (३४ श्लोक)
*-----------------------------*
*आत्मसाक्षात्कारानंतर काय?*
एकदा एक आत्मसाक्षात्कारी संत धान्याचं पोतं खांद्यावर घेऊन बाहेर निघाले होते. तेव्हा रस्त्याने जाणार्या एका मनुष्याने त्यांना थांबवून विचारलं,
*‘आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यावर काय होतं ते सांगू शकाल का?’*
संतांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसतच आपल्या खांद्यावरचं ओझं खाली ठेवलं. याचाच अर्थ, त्यांनी काहीही न बोलता उत्तर दिलं. हे पाहून तो मनुष्य विचारमग्न झाला. मग त्याने विचारलं,
आत्मसाक्षात्कार झाल्यावर लोक काय करतात? आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर लोक कसे जगतात?
हे प्रश्न ऐकून संतानी पुन्हा पोतं खांद्यावर टाकलं आणि मार्गक्रमण करू लागले.
*अर्थातच* आत्मसाक्षात्कार होण्यापूर्वीही मनुष्य ओझं वाहत असतो आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यानंतरही तो ओझ वाहतो परंतु दोन्हीत मूलभूत फरक असतो.आधी मनुष्य पोत्याच्या वजनाला ओझं समजतो.
*मात्र* आत्मसाक्षात्कारानंतर ओझ्याचं रूपांतर *ज्ञानात* होतं आणि ते आनंदाला कारणीभूत ठरतं. म्हणूनच तुम्हालादेखील भारवाहक नव्हे तर ज्ञानोपासक व्हायचं आहे. ज्यांना ओझी वाहायला आवडतं, ते लोभी बनतात, रोगी बनतात. मात्र जे ज्ञानाचे उपासक असतात ते साधक बनतात, योगी बनतात. अनुभूती (समज) नसेल तर मनुष्याला ज्ञानाचंही ओझं वाटतं, तसंच दुःखासोबत सुखाचंही ओझं वाटतं.
नवव्या अध्यायात तुमच्यासमोर *"परम गोपनीय ज्ञान योगी"* होण्याचं रहस्य उलगडलं जात आहे. यात तुम्ही वाचत असलेले शब्द महत्त्वाचे नसून त्याद्वारे मिळणारा बोध महत्त्वाचा आहे. मात्र हे ‘परम गोपनीय ज्ञान’ नेमकं काय आहे?
*ज्ञान आणि विज्ञान* यांच्या संयोगाने जे तयार होतं ते *तत्त्वज्ञान!*
या तत्त्वज्ञानाची अनुभूती झाल्यावरच परम गोपनीय (परमगुह्य) ज्ञानाचं रहस्य उलगडतं. तत्त्वज्ञान हे असं ज्ञान आहे, जे जाणलं नाही तर सर्वकाही जाणूनही काहीच न जाणल्यासारखं आहे.
जसं,तुमचा उजवा हात ज्ञानाचं प्रतीक आहे आणि डावा हात विज्ञानाचं.मात्र जेव्हा हे दोन्ही हात एकत्र येतात तेव्हा जे प्रकटतं ते तत्त्वज्ञान! अर्थातच यांचा परस्परांशी योग्य सहयोग होणं आवश्यक आहे. योग्य सहयोग असला तर हात परस्परांपासून कितीही दूर गेले तरीही सहयोग कायम टिकून राहतो.
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीशी तुमचे हृदयापासून सूर जुळलेले असतील तर ती व्यक्ती तुमच्यापासून कितीही लांब असली तरी जवळच असते. मात्र एखाद्या व्यक्तीशी हृदय (मन) जुळलेलं नसेलतर ती जवळअसूनही तिच्याविषयी आपुलकी वाटत नाही.
जर विज्ञान म्हणालं, ‘मी महान’ आणि ज्ञान म्हणालं, ‘मी महान’ तर त्यांचा सहयोग होऊ शकत नाही. यासाठी अंतरंगात ज्ञान-विज्ञान यांचा ताळमेळ साधून गोपनीय ज्ञान प्रकटण्याची संधी तुम्ही द्यायला हवी.
मानवाच्या जीवनात घडणार्या सर्व घटना त्याच्या संकल्पावर आधारित असतात. मात्र त्याच्या अंतर्यामी असलेलं चैतन्य यापासून विलग असतं. माणसाच्या वर्तमानातील कर्मांवर त्याची पुढील कर्मं अवलंबून असतात आणि अशा प्रकारे जीवनचक्र सुरू राहतं, हे गोपनीय ज्ञानात दडलेलं रहस्य आहे. या परमचैतन्याची अनुभूती म्हणजेच आत्मबोध होय.
*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*
दुष्ट आणि दुराचारी मनुष्यदेखील संकल्प शक्तीच्या आधारे आत्मबोध प्राप्त करू शकतो. खरंतर त्याला साधूच म्हणावं लागेल.वाल्या कोळीचे वाल्मिकींमध्ये झालेलं रूपांतर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. आत्मबोध अवस्था प्राप्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या असामान्य समर्पण योगाचा उल्लेख या अध्यायात आलेला आहे.
हा असा योग आहे, ज्यात कर्मच नव्हे तर कर्म करणारासुद्धा समर्पित होतो. त्यानंतरच जी अवस्था प्रकट होते ती आत्मबोधाची!एखादा मनुष्य समर्पण करतो तेव्हा तो सुरुवातीला स्वतःचं कर्मफळ, शंका, वृत्ती, सुख, दुःख इत्यादी बाह्य गोष्टी समर्पित करतो. परंतु असामान्य समर्पण योग
‘तू स्वतःही समर्पित हो’ असं शिकवतो.
*समजा,एखाद्याला सांगितलं,*
की ‘तुझ्याकडे जे जे आहे ते सर्व समर्पित कर’
तर सुरुवातीला तो त्याच्या आसपास असलेल्या वस्तू समर्पित करेल. मग हळूहळू खिशातल्या वस्तू काढून ठेवेल. परंतु तेव्हा त्याच्या लक्षात येत नाही, की वस्तू काढणारा कर्तासुद्धा (अहंकारसुद्धा) समर्पित व्हायला हवा. हाच असामान्य समर्पण योग आहे, जो प्रस्तुत अध्यायामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे.
सुरुवातीला मनुष्याचं मन यासाठी तयार होत नाही. तेव्हा त्याला सांगितलं जातं,
‘आधी ज्या सवयी आणि विचार समर्पित करणं सहज शक्य आहे त्यांच्या समर्पणाने सुरुवात तरी कर.’ मग हळूहळू त्याच्यातील कर्ताभाव आणि तुलनात्मक मनही समर्पित होतं आणि मग जे प्रकटतं ते गोपनीय ज्ञान!
*-----------------------------*
संदर्भ ग्रंथ :-
संपूर्ण भगवद्गीता - सरश्री
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*
No comments:
Post a Comment