*श्री श्रीधर स्वामींनी एका साधकास लिहिलेलं पत्र*
*चि. लक्ष्मीनारायणास आशीर्वाद !*
*बाळ, आपल्या मुलाविषयी विचार करून निराश होऊ नकोस. सुकले पान गळून पडले तर झाड त्यावर दुःख करीत बसते का ? तसेच ज्यांचे आयुष्य संपले त्यांच्यासाठी, त्यांच्याविषयी कुणीच दुःख करू नये. नदीच्या प्रवाहात वाहत जाणारे लाकडाचे तुकडे इकडून तिकडून आलेल्या पाण्याच्या प्रभावाने वाहत, पाहता पाहता दूर होतात.
तसेच ऋणानुबंधाने काहीजण एकत्र येतात, तर काही जण ऋणानुबंध संपला की दूर होतात. समुद्रात उठणाऱ्या लाटा, फेस काही वेळ राहून तेथेच लीन होऊन जातात. सर्वांचे देह हे काही काळ राहून आपली वेळ संपताच विलन होऊन जातात.प्रत्येकाचा देह हा कधी ना कधी नष्ट होणारच. संसाराचा मोह असेपर्यंत, जुने कपडे काढून फेकून नवे वस्त्र धारण केल्यासारखा, हा* *जीव एक देह सोडून दुसरा देह धारण* *करतो. मागच्या जन्मीच्या कर्मफलरूप देह धारण करून,* *त्या कर्माप्रमाणे जगून आयुष्य संपताच हा देह सोडून जाताना*
*दुःख देऊन जाणेही त्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसारच. तुझा मुलगा काही दिवस इथे राहून तुला दुःख देऊन जाण्यासाठीच जन्मला होता. याचा अर्थ असा, की त्याच्या कर्मानुसार हे घडले. मग आता दुःख कशाचे करायचे ?* *नष्ट पावणारा देह आपल्या धर्मानुसार नष्ट झाला; मग आता कोणत्या देहासाठी दुःख करायचे ? शोक करायचा ? निराश का व्हायचे ?*
*जन्म मिळतो ते दुसऱ्याचा उद्धार करायला, एका जीवाच्या* *जन्ममृत्यूचा आनंद किंवा व्यथा व्यक्त करायला नव्हे. नदी सागराला जाऊन मिळते तसेच परमात्म्यापासून दुरावल्याचे अज्ञान झिडकारून, गुरूने दाखविलेला आत्मरूप मार्ग अनुसरून,
त्याची मान्यता मिळवून या भवदुःखातून मोकळे होणे यातच जन्मसाफल्य आहे. घरी आलेला पाहुणा परत आपल्या घरी जातो, तसेच आयुष्य संपता देह पडून जातो व तो आत्मा आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच परमात्म्याच्या स्वरूपात लीन होण्यासाठी निघून जातो.
देह हा सदैव विनाशीच आहे आणि आत्मा अविनाशी, आनंदस्वरूप आहे, हे ज्या ज्ञानी गुरुभक्ताने जाणले आहे, तो कुणाच्याही जन्म-मरणाचा शोक करीत नाही; तेव्हा तू का एवढा शोक करतोस ? फुटके मडके जसे आपण टाकून देतो, तसेच शव जाळून टाकतो. यात शोक करण्यासारखे काही नाही.
तू माझी सेवा केली आहेस म्हणून तुला मोक्षमार्ग दाखवून यातून तुला मुक्त करावे, असे मला वाटते, हे साहजिकच आहे. तुझ्या मुलालाही मोक्ष द्यावा, हे माझे कर्तव्य आहे. प्राण गेला, देहही जाळून टाकला, त्याला मुक्ती मिळाली, मग आता शोक* *करण्यास कारण काय राहिले ? संकलन आनंद पाटील*
No comments:
Post a Comment