*॥श्रीहरिः॥*
ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ आणि दुर्लभ कसा ते भगवंत सांगतात,
*-----------------------------*
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः
*बहूनां जन्मनामन्ते*
*ज्ञानवान्मां प्रपद्यते ।*
*वासुदेव: सर्वमिति*
*स महात्मा सुदुर्लभ:॥*
*॥७.१९॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१९)
*भावार्थ:- पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मी तत्त्वज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी सर्व काही वासुदेवच आहे अशा प्रकारे मला भजत असतो तो महात्मा अति दुर्लभ आहे.*
*-----------------------------*
*'वासुदेवः सर्वम्' -*
खऱ्या ज्ञानी व आत्मसाक्षात्कारी महात्म्याचे वर्णन भगवंत करतात. या श्लोकातील 'वासुदेवःसर्वमिति' हा भाग महत्त्वाचा आहे.वासुदेव शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे,
'सर्वाणि भूतानि वसन्ति यस्मिन् स वसुः, सर्वाणि भूतानि ससत्तास्फुरणेन द्योतयति प्रकाशयति य सः देवः, वसुश्वासौ देवश्च वसुदेवः, वसुदेवः एव वासुदेवः सर्वात्मा परं ब्रह्म ।'
"ब्रह्मदेवापासून सर्व भूतमात्रात वसणारा जो, त्याला वसु म्हणतात, सर्व भूतमात्रांना आपल्या सामर्थ्याने तो चैतन्य प्रदान करतो, प्रकाश देतो. म्हणून त्याला देव म्हणतात; वसु व देव यांचा मिळून वसुदेव असा द्वंद्व समास झाला. वसुदेव (विष्णु) हाच वासुदेव (कृष्ण) होय."
विष्णुपुराणही म्हणते,
'भूतेषु वसते सोऽन्तर्व-
-सन्त्यत्र च तानि यत् ।
धाता विधाता जगतां
वासुदेवस्ततः प्रभुः ।।'
(वि. पु. ६-५-८२)
"अर्थात् जो सर्व भूतांच्या ठायी निवास करतो आणि सर्व भूतसमूह ज्याच्यात निवास करतात, जो सर्वांचा धाता (पालनकर्ता) आणि जगताचा विधाता (कर्मफलदाता) आहे त्या प्रभूला (जगत्पतीला) वासुदेव असे म्हणतात."
हे सर्व जग वासुदेवच आहे,असा जो प्रत्यक्ष अनुभव असा घेतो, तो खरा ज्ञानी महात्मा. तो सुदुर्लभ म्हणजे अत्यंत दुर्लभ आहे. ही अनंत जन्मांची तपश्चर्या असते. मग एखादाच शुक, एखादाच ज्ञानेश्वर जगाला दिसतो.
*परमेश्वर* सर्व भूतांच्या ठायी वास करून असतो. म्हणून त्याला वासुदेव म्हणतात. महाभारताच्या शांतिपर्वात ही 'वासुदेवा'ची आध्यात्मिक व्याख्या सांगितलेली आहे. अशा सर्वव्यापक परमेश्वराची अनन्य दैवत म्हणून जो भक्त एकनिष्ठेनं भक्ती करतो तो भक्त अनेक जन्मानंतर मला येऊन मिळतो असं भगवंत सांगतात.
*असा* महान भक्त होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे.आत्यंतिक श्रेष्ठ भक्त होणं ही सहज साध्य गोष्ट नक्कीच नाही. अनेकजन्मांच्या अथक परिश्रमानंतर, निष्ठापूर्वक भक्तीनंतर ही स्थिती एखाद्याच ज्ञानी भक्ताला प्राप्त होते. अनेक जन्मांमध्ये हा ज्ञानी भक्त निराशी: म्हणजे फलाशारहित कर्म करता करता या पदापर्यंत येऊन पोचतो.
*'पी हळद आणि हो गोरी,'* इतकी सहज वाटणारी ही गोष्ट नाही. जे काही आहे ते वासुदेवमय आहे, अर्थात परमात्मा-स्वरूप आहे, ही जाणीवयुक्त समज प्राप्त झाल्यावरच ज्ञानवानाला परमेश्वराची प्राप्ती होते. तो महात्मा बनतो.
*केवळ* दानधर्म करणं, स्वत:चं नाव व्हावं म्हणून मंदिरं बांधणं किंवा धार्मिक स्थळांना देणगी देणं, पाणपोया घालणं, आध्यात्मिक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध पावणं, द्वेषमूलक राजकारण-समाजकारण करणं अशा लौकिक गोष्टींमधून परमेश्वराला अभिप्रेत असणारं 'महात्मा'पद ठरत नसतं. अशा कार्यांमुळे स्वर्गप्राप्तीही होण्याची शक्यता नसते; मग मोक्षप्राप्तीची गोष्ट तर दूरच! कारण शुद्ध - वासनाशून्य अवस्थाच परमात्म्यापर्यंत जाऊ शकते.
आपल्या अन्नावर कुणाची वासना गेली तर ते अन्न आपल्या घशाखाली उतरत नाही. मग या भौतिक नावलौकिकाच्या वासना कर्मात राहिल्या तर परमात्मा त्या जीवाचा स्वीकार करील का?
*एकदा* एक उद्योगपती निवर्तल्यानंतर स्वर्गाच्या द्वारापाशी जातो. द्वारपाल त्याला अडवतो. तेव्हा तो म्हणतो,
'अहो, मी पृथ्वीवर खूप महान कार्य केलं आहे. मोठमोठाली मंदिरं बांधली आहेत. मला स्वर्गात प्रवेश मिळणारच!'
द्वारपाल चित्रगुप्तांकडून निश्चिती करून घेतो आणि उद्योगपती महाशयांना सांगतो,
'आपल्याला स्वर्गात जागा नाही. कारण आपण जी मंदिरं बांधलीत ती प्रसिद्धीच्या हेतूनं आणि स्वत:चं नाव व्हावं म्हणून बांधलीत. आपला हेतू
शुद्ध नव्हता. आपला 'अहं' मुळीच सुटला नव्हता! अशांना इथे स्थान नाही.'
परमेश्वस्वरूप जाणण्याची क्रिया इतकी सरळसोपी नाही. अनेक जन्मांच्या निदिध्यासातून ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानप्राप्तीनंतर अंतिमतः त्या तत्त्वाशी एकरूपता होते.
*सारांश:*
*जेव्हा कार्यामागचा हेतू शुद्ध असतो, कार्य निष्काम बुद्धीनं, ईश्वर निष्ठेनं आणि ज्ञानपूर्वक केलं जातं तेव्हाच मनुष्य महात्मा बनतो. असा एकनिष्ठ भक्त होण्यासाठी अनेक जन्म साधना करावी लागते. ज्ञानोत्तर निष्काम कर्म करावं लागतं. तरच केव्हा ना केव्हा तरी सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता असते.*
*-----------------------------*
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
श्रीगीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
No comments:
Post a Comment