*॥श्रीहरिः॥*
श्रीभगवंताच्या विविध अशा पंधरा अंशविभूति ८ ते ११ श्लोकात सांगून झाल्या.. पुढे सांगताना श्रीभगवंत म्हणतात,
*-----------------------------*
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः
*ये चैव सात्त्विका भावा*
*राजसास्तामसाश्च ये ।*
*मत्त एवेति तान्विद्धि*
*न त्वहं तेषु ते मयि ॥*
*॥७.१२॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१२)
*भावार्थ :- सात्त्विक, राजसिक किंवा तामसिक, हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मीच हे सर्व करत आहे. परंतु तरीदेखील मी स्वतंत्र आहे. प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत.*
जे जे सात्त्विक, राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ (भाव) आहेत, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असं जाण. मी त्यांच्या आश्रयानं नाही; परंतु; ते मात्र माझ्या आश्रयानं आहेत.
*-----------------------------*
*प्रस्तुत* श्लोकामध्ये मनुष्याच्या तीन प्रकृतींचा म्हणजेच सत्, रज आणि तम यांचा उल्लेख केला आहे. सर्वप्रथम यांच्याविषयी समजून घेऊया.
*मनुष्यामध्ये तीन मूळ गुण आहेत-*
सत्त्व, रज आणि तम.
हे तीन गुणच मनुष्याला कर्म करण्यासाठी प्रेरित करतात. परंतु तीनही गुणांचे भाव वेगवेगळे असतात.
*तमोगुणी* शरीराला आराम करायला आवडतो. सुस्ती, ग्लानी, अतिनिद्रा,आळस,कामचुकारपणा, बेपर्वाई, राग ही तमोगुणाची लक्षणं आहेत.
*रजोगुणी* स्वभावाचा मनुष्य अविरतपणे कामामागे सतत धावत असतो. मात्र धावताना थोडं थांबून तो असा विचारही करत नाही, की तो जे करतोय ते कशासाठी? या कामाचं, या जीवनाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? त्याच्या आजूबाजूला काय घडतंय किंवा त्याच्या आतमध्ये नकळत कोणत्या गोष्टी प्रवेश करत आहेत, हे त्याला जाणवतच नाही. एक काम पूर्ण होतं न होतं तेच पुढचं काम कोणतं करायचं, केवळ याचेच विचार त्याच्या मनात सुरू असतात.
*सत्त्वगुण* हा तम आणि रज यांच्यापेक्षा उत्कृष्ट मानला जातो. कारण या गुणांनी युक्त असणारं शरीर चांगली कार्यं करतं.
अशा गुणांनी युक्त असणारे लोक समाजसेवा करतात, गरिबांमध्ये अन्न, वस्तू इत्यादींचं वाटप करतात,भंडारा, लंगर यांचं आयोजन करतात, धर्मशाळा बांधणं,दान देणं यांसारखी कार्यं करतात. यामुळे अशा प्रकारच्या लोकांना समाजामध्ये प्रतिष्ठा, मानसन्मान मिळतो. परंतु या मानसन्मानामुळे त्यांचा अहंकार देखील वाढू शकतो.
*मनुष्याच्या/प्राण्यांच्या* कर्मामुळे जे सात्त्विक, राजस आणि तामस भाव उत्पन्न होतात ते सर्व माझ्या- पासूनच निर्माण होतात. त्या सर्वांचं मूळ कारण पर-अपर प्रकृतीच्या द्वारे मीच आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगतात.
(१४व्या अध्यायात या त्रिगुणांच्या वैशिष्ट्यांविषयी भगवंतांनी अधिक विवेचन केलं आहे.)
*सात्त्विकादी* सर्व पदार्थ जरी परमेश्वरापासून निर्माण झालेले असले तरी संसारी लोक परमेश्वरा- ऐवजी या त्रिगुणांमध्येच अधीन झालेले असतात.परमेश्वरापासूनच निर्माण झालेल्या पदार्थांमध्ये परमेश्वर मात्र अधीन होत नाही. उलट ते पदार्थ त्याच्या अधीन होतात. कारण तोच एक सत्य आहे.ते पदार्थ कल्पित आहेत.त्यामुळे त्या पदार्थांच्या गुणदोषांचा परमेश्वरावर परिणाम होत नाही.
*ते* त्रिगुणात्मक पदार्थ परमेश्वराच्या अधीन झालेले असतात. परंतु परमेश्वर त्यांच्यामध्ये नसतो. म्हणजे भूतसृष्टीतील जे जे वाईट आहे ते चांगल्याबरोबर त्याच्यात सामावलेलं असतं. कारण परमेश्वरच त्यांच्या उत्पत्तीचं आदीकरण असतो.असं असूनही त्यांच्या बऱ्यावाईटात परमेश्वर भागीदार नसतो किंवा सहभागी नसतो. परमेश्वर दोन्ही बाजूंनी बोलतो असं इथे वाटण्याचा संभव आहे. पण त्याच्या बोलण्यातला गहन अर्थ ध्यानात घ्यायला हवा.
*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*
या तीन गुणांमुळे निर्माण होणारे भाव हे वास्तविक माझ्यामधूनच उत्पन्न होतात. प्रत्येक गुण, प्रत्येक भावना यांचा स्रोत मीच आहे. परंतु तरी- देखील मी त्यांच्यापलीकडे आहे, म्हणजे वेगळा आहे. अर्थात, त्यांच्याशी आसक्त, लिप्त नाही. प्रत्येक भाव, गुण, विचार... सगळ्यांचा स्रोत चैतन्यच आहे. तरीदेखील चैतन्य त्यांच्याशी बद्ध नाही किंवा त्यांच्याशी आसक्तही नाही.
*उदाहरण घ्यायचं झालं तर सागराचं घेता येईल.*
*सागरापासून* शंख-शिंपल्यांची निर्मिती होत असते. पण त्या शंख-शिंपल्यात सागर सामावलेला नसतो.
*अग्नीपासूनच* धूमाची निर्मिती होते. परंतु त्या धूमात (धुरात) अग्नी नसतो.
*समुद्रमंथनातूनच* हलाहल विष निर्माण झालं. पण त्या हलाहलात समुद्र सामावलेला नसतो. *आकाशातून* उल्कापात होतो. परंतु त्या उल्केत अनंत आकाशाचं दर्शन कधी घडत नाही.
*अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर,*
कॅमेरामुळे फोटो निघतो; पण फोटोत कॅमेरा नसतो!
*त्याप्रमाणे त्रिगुणात्मक प्रकृतीच्या चांगल्या-वाईटात परमेश्वर नसतो.*
परमेश्वरापासून निर्माण झाल्यावर जो तो प्राणी आपापल्या सत्त्व-रज-तम आदी भावगुणांनुसार कर्म करीत असतो; आणि आपल्या कर्मानुसार आपलं अनेक जन्मांचं भविष्य ठरवीत असतो.
*आपल्यापासूनच निर्माण झालेल्या या यंत्रणेत परमेश्वर हस्तक्षेप मात्र करीत नाही.*
*सारांश:*
*सात्त्विक-राजस-तामस हे त्रिगुणात्मक पदार्थ परमेश्वरा- पासूनच निर्माण झाले असले तरी त्या पदार्थांच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये परमेश्वर नसतो. ते त्रिगुण मात्र परमेश्वरामध्ये सामावलेले असतात.*
*-----------------------------*
गीताशास्त्र - श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
संपूर्ण भगवद्गीता - सरश्री.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
No comments:
Post a Comment