पू.श्री.गुरुदेव रानडे कधी कधी सहसजपणे एखादे वाक्य उच्चारीत. "सहज बोलणे हित उपदेश | करुनी सायास शिकविती ||" अशा पद्धतीचे बोलणे असे. जरी ते सहज असले तरी त्याचा साधकांवर परिणाम होत असे. अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असत. एकदा श्री.वामन ना. कुलकर्णी , गुरुदेवांचे शिष्य परमार्थ बैठकीत त्यांच्या समोर बसले होते. ते कसल्यातरी विचारात होते त्यामुळे त्यांचे नेमात जपात लक्ष नव्हते.
अन्यथा त्यांच्या समोर बसल्यास नेमात लक्ष जात असे. गुरुदेव त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले ' काय महाराज ?' त्यांना काय बोलावे ते कळेना. ते हात जोडून त्यांना म्हणाले "ठिक आहे." श्री.गुरुदेवांना सगळीकडे महाराजच दिसत असत. ते सतत सद्गुरूंच्या अनुसंधानात असत. त्यामुळे त्यांनी त्यांना महाराज म्हटले असावेत असे वाटले. एक दिवस परमार्थ बैठकीच्या वेळी काही साधक मंडळी त्यांची वाट बघत बसली होती.
समोर श्री.भाऊसाहेब महाराज उमदिकरांचा फोटो होता. तेवढ्यात श्री.गुरुदेव आले येऊन बसले व श्री.महाराजांच्या फोटोकडे हात दाखवून म्हणाले "कोणाला काय हवे असेल ते मागा. प्रत्यक्ष श्री.महाराज आले आहेत."
त्यांचा बोलण्याचा आवेश व आत्मविश्वास एवढा जबरदस्त होता की कोणाला काही मागण्याचे सुचले नाही. त्यादिवशी गुरुदेव महाराजमय झाले होते.
No comments:
Post a Comment