🌿🌹🌿 ll श्रीराम समर्थ ll 🌿🌹🌿
श्रीमहाराज इंदूर मध्ये होते. तेव्हा इंदूर च्या इनामदारांच्या विनंतीला मान देऊन ते त्यांच्या बागेत राहण्यास गेले. त्यांची पत्नी जिजीबाई विलक्षण बाई होती; सर्व तिला वचकून राहत. तिने नवऱ्याला अशा बैराग्याला घरी आणल्याबद्दल दटावले आणि महाराजांची परीक्षा करण्याचा बेत केला.
महाराज आल्यावर एक दोन दिवसांनी तिने महाराजांसाठी तिखटाचे सहा गोळे केले आणि ते लाडू म्हणून नेले. महाराजांनी हसत तिच्याकडून मागून एक एक गोळा घेतला व ते सर्व गोळे लाडवा प्रमाणेच खाऊन टाकले. अजून मागू लागले! तिचे कपट लक्षात येऊनही हा महात्मा काहीही बोलला नाही! कपटी माणसाचे मन अत्यंत हीन पातळीला जाऊ शकते. तिने दुसऱ्या दिवशी महाराजांच्या पुढ्यात भाजलेले निखारे परातीत घालून ठेवले. आता हे देखील जेव्हा महाराजांनी सहज खाऊन टाकले तेव्हा मात्र ती घाबरली. निखारे पचवणारा सिद्ध पुरुष आता आपल्याला सोडणार नाही असे तिला वाटले.
त्यावेळी अकारण करुणाकर महाराजांच्या विशाल हृदयाची तिला काय कल्पना! तिने महाराजांचे पाय धरले. तर महाराज म्हणतात- "बाळ, कोण मनुष्य कसा आहे, आपल्याला कळत नाही. म्हणून अशा रीतीने कुणाची परीक्षा करू नये. संतांची परीक्षा निराळ्या पद्धतीने करावयाची असते. तरी पण झाले गेले विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करण्यास आरंभ कर. राम तुझे कल्याण करील हे निश्चित समज!"
*🙏🏻 ॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥ 🙏🏻*
No comments:
Post a Comment