TechRepublic Blogs

Wednesday, October 22, 2025

आनंदाचा डबा

 "आनंदाचा डबा"

खरच आनंद चमचा भर मिळूं शकतो ?? मला पडलेला प्रश्न आणि त्याच उत्तर ही मला थोडे दिवसातच मिळालं. त्याच अस झालं माझी मैत्रिण होती राणी नावाची दिसायला छान. खूप हुषार !!प्रत्येक गोष्ट जीव तोडून करणार. तिच्यावर काम सोपवल की सगळी जण निश्चिंत असायची. तिच्या बँकेमधली. मग तीला वाटे जे काम करत ना त्याच्याच गळी सगळ पडत. त्या मुळे आजकाल ती कंप्लेंट बॉक्स झाली होती. एकदिवस सकाळीं आम्ही मैत्रिणी एकीच्या घरी अशीच सुट्टी होती म्हणून गेलो होतो. ती मैत्रीण पोळ्या करत होती.  राणी ने लगेचच तिच्या कंप्लेंट करण चालु केल. माझ्याकडे येताना कसे रिक्षा वाल्या कडे सुटे पैसे नव्हते. कशी सकाळीं ऊठुन वादा वादी सुरू झाली. एक काम धड होईल तर शपथ.!! सगळी कडे नेहेमी मलाच लक्ष द्याव लागत. घरी काय किंवा दारी काय ?? बँकेत  सुद्धा माझ्यावरच सगळी जबाबदारी.!! कंटाळा आलाय सगळ्याचाच . राणी वैतागून बोलली...

प्रिया म्हणाली तुझ्या बाबतीतच असं कसं होतं गं??? एकही घटना तुझ्या बाबतीत चांगली नाही घडत. ?? तू म्हणतेस तुझ्यावर बँक जबाबदारी टाकते पण तुला एकटीलाच तर प्रमोशन मिळालं ना ?? आणि अग खरच सकाळीं सकाळीं नसतील रिक्षा वाल्या कडे सुटे पैसे ?? त्याच्या दृष्टीने ही विचार कर ना .चल आज तुझ्या बाबतीत मी चांगली घटना घडवते. असं म्हणून तिने तव्यावरची गरम गरम पोळी काढली त्याच्यावर साजूक तूप टाकलं आणि तिला म्हणाली घे. तव्यावरून थेट ताटात येणारी पोळी आणि त्यावर घरच साजूक तूप म्हणजे परमानंद असतो. असं बोलून  ताटामध्ये तव्यावरची पोळी काढून वाढली. पोळीवर चमच्याने तूप सोडताना म्हणाली हा घे तुझ्यासाठी चमचाभर आनंद!!!! 

मायेने आपलं असं कोणी खायला वाढणं म्हणजे एखाद्या संसारी बाईसाठी खरंच खूप मोठ्या आनंदाची गोष्ट असते, राणीच्या मनात आलं....

प्रियाच्या घरून निघाल्यापासून राणीच विचार चक्र चालू झालं. तिला पटलं की ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे सारखं कुरकुर करणं. आणि तिच्या डोक्यात 'चमचाभर आनंद' सहज उच्चारलेले शब्द  घोळायला लागले. तिने मनातल्या मनात एक निर्णय घेऊन टाकला. रात्रीचे जेवण सुरू होतं. आई आज तू चक्क भात नाही खातेस. राणीचं भातावरच प्रेम सगळ्यांना माहिती होतं? राणीच्या नवऱ्याने तिला विचारलं खरंच की ??आई तुला कमी पडतोय का भात? माझ्यातला घे .असं तिचा मुलगा तिला म्हणाला. आणि स्वतःच्या ताटातला तीला द्यायला लागला.तुम्ही सारखी माझ्या भात खाण्यावर  चिडवताना ???म्हणून मी आज भातावर कंट्रोल करणार आहे. असं राणीने खोटं सांगितलं. जेवणाची आवर आवर झाल्यावर राणीने एक रिकामा डबा काढला. सकाळी प्रिया कडे  गरमागरम तूप पोळी खायला मिळाली त्याचा हा चमचाभर आनंद .असं म्हणून एक लहानसा चमचा भरून तांदूळ तीने त्या डब्यात घातले. आणि हा चमचाभर आनंद आपल्या मुलाने स्वतःच्या ताटातला भात आपल्याला द्यायची तयारी दाखवली त्याचा. आज दोन चमचे तरी डब्यात आनंद जमा झाला आहे. मनातून खुश होत राणी म्हणाली. त्या डब्याला तिने नाव दिलं 'आनंदाचा डबा.' जेवताना दोन-तीन दिवस राणीला जरा कठीणच गेलं, भाताशिवाय .कारण वाटीभर तांदूळ जमा झाल्याशिवाय भात खायचाच नाही असं तीने ठाम निर्णय घेतला होता. आणि त्यामुळे दिवसभरात आपल्या दृष्टीने काय चांगलं घडलं हे शोधायचा नादच लागला तिला. आज भाजी घेऊन घरी पोहोचते ना पोहोचते तोच लाईट गेले. राणीची चिडचिड व्हायला लागली. 

पण नंतर तिच्याच लक्षात आलं की लिफ्ट मध्ये असताना लाईट गेले असते तर?? दोन दिवसापूर्वीच बिल्डिंगचा जनरेटर खराब झालाय तो अजूनही दुरुस्त झाला नाहीये .किंवा आधीच लाईट गेले असते तर,?? हातातल्या भाजीच्या पिशव्या घेऊन सहा मजले चढून यावं लागलं असतं. बरं झालं!! घरी आल्यावर लाईट गेले. लगेच एक चमचा आनंद डब्यात जमा  केला.

आज बँकेत जास्तीचं काम असल्यामुळे तिला घरी यायला उशीर झाला. तर तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी चहा रेडी ठेवला होता. एक चमचा आनंद लगेच डब्यात जमा झाला.

रात्री आयत्यावेळी मुलीने शाळेतल्या सायन्स प्रोजेक्ट बद्दल सांगितलं. नवरा ऑफिसच्या कॉल वर होता . त्याची काहीच मदत झाली नाही. पण दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर मुलीचा चेहरा किती फुलला होता !!!अख्ख्या वर्गासमोर तिच्या प्रोजेक्टच कौतुक केलं होतं बाईंनी .तिने खुशीने मारलेली मिठी आणि 'आई !!तू किती ग्रेट आहेस ' अशी कॉम्प्लिमेंट देऊन घेतलेला पापा हा अमूल्य आहे. एक चमचा आनंद जमा. 

अशा एकेक गोष्टींनी आनंदाचा डबा भरत चालला होता. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काय चांगलं घडलंय हे शोधायचा नादच लागला राणीला. दिवसेंदिवस ती जास्त आनंदी आणि प्रसन्न दिसायला लागली. तिच्या स्वभावातला हा बदल सगळ्यांना जाणवत होता .तिचा सहवास आताबँकेत असलेल्या  मैत्रिणी, सहकारी , नवरा, मुलगी, मुलगा, शेजारीपाजारी असा सगळ्यांना हवा हवासा  वाटायला लागला...

आज बरेच दिवसांनी प्रिया राणीच्या घरी आली तर राणी  भांडी घासत होती, आणि चक्क गाणं गुणगुणत होती. प्रिया म्हणाली काय !आज बाईने दांडी मारली वाटतं.? मग काय तर .पण बरं झालं एका अर्थी! बाई भांडी घासते तेव्हा काही काही भांड्यांवर पावडरचा पांढरेपणा तसाच राहतो.  एरवी बँकेमुळे या गोष्टी चालून घ्याव्या 

 लागतात. आज कसं सुट्टी. छान पैकी मनासारखी चकचकीत करते भांडी. आणि चेहऱ्यावर हसू खेळवत म्हणाली. प्रिया म्हणाली ,बाईने दांडी मारली आणि तू चक्क चिडचिड न करता हसून बोलतेस ??

प्रियाला आश्चर्य वाटल्या वाचून राहिलं नाही. एव्हाना राणीची भांडी घासून झाली होती. कुकर मधला मस्त सुगंध दरवळणारा गरमागरम पुलाव तिने एका डिशमध्ये काढला. हा आनंदाचा पुलाव !!पहिल्यांदाच चाखायचा मान तुझा! त्याचं काय आहे ना, आयुष्य मला चमचा चमचा आनंद देत होतं, पण डबाभर आनंद एकदम मिळायला हवा. या हट्टापायी या चमचाभर आनंदाकडे दुर्लक्ष करत बसले. 

पण आता मात्र माझा आनंदाचा डबा भरला आहे. आणि तोच आनंद मी आज वाटत आहे .प्रियाला कळेच ना अशी काय बोलत आहे? काय भांडी घासून घासून मेंदूत पण चमचे  ,डबे, घुसले की काय,?? मला नीट सांग...... मग त्या दिवशी प्रियाच्या घरून निघाल्यापासून इथपर्यंतची सगळी कथा राणीने तिला सांगितली .असं होय!! तर, मी सांगितलेल्या या गोष्टीने तुझा कायापालट झाला... .मग मला आता याचा काय मोबदला देणार?? देणार तर!!! तुझ्या घरून सुरुवात झालेल्या चमच्याभर आनंदाचा मोबदला मी माझ्याकडचा डबाभर आनंद देऊन करणार आहे. असं म्हणून राणीने एक मोठा डबा भरून पुलाव स्वानंदी कडे सोपवला. हा माझा आनंद मी तुझ्याबरोबर आणि तुझ्या घरच्यांबरोबर शेअर करणारं .आणि यापुढेही करत राहणार..... अस म्हणून तीने तो डबा तीच्या हातात दिला. आणि एकमेकींना टाळी देत 

 दोघीजणी  हसायला लागल्या खऱ्या.

सौ. माधुरी बर्वे. ( तारापूर).

No comments:

Post a Comment