!!! गोंदवलेकर महाराज !!!
भाग - ६.
तुकामाईंनी गणूंची सर्व प्रकारे परीक्षा घेतली व त्यांच्या कसोटीत गणू पुर्णपणे उतरल्यावर, त्यांनी गणूला पोटाशी धरले. अश्रूंचा वाहू लागला. म्हणाले, बाळ, तुला मी खूप त्रास दिला. असं म्हणून त्यांच्या सर्वांगावर हात फिरू लागले. गणूचे दुःख दूर झाले.
काही दिवसांनी रामनवमी आली. त्या दिवशी त्यांनी गणूला दुपारी बारा वाजता अशोक वृक्षाखाली बसून अनुग्रह दिला. मंत्र दिला.. "श्रीराम जय राम जय जय राम।" आणि त्यांचे नामकरण केले "ब्रह्मचैतन्य!"
ब्रह्मचैतन्यांना राम मंदिर बांधण्याची आज्ञा केली. काही दिवस तिथे राहिल्यावर तुकामाई म्हणाले, बाळा, आता बारा वर्षे देशाटन कर. साधना सोडू नकोस. स्वतःच्या गावी जा. गणूला ही आज्ञा फार अवघड वाटली. पण गुरु आज्ञा पाळणे भाग होते.
तुकामाई गणूला घेऊन उमरखेडला आणून आपल्या गुरूंच्या पायावर घातले. गणूला निरोप देण्यासाठी स्वतः वेशीपर्यंत आले. गुरूंना सोडून जाणे गणूंना फारच अवघड वाटत होते. पायात मणाणणाच्या बेड्या पडल्यासारखे वाटत होते. पाय जड झाले. पण गुरु अज्ञानुसार त्यांना जाणे भाग होते. मागे वळून वळून पाहत गणू गुरुमूर्ती हृदयात साठवून घेत पुढे पुढे चालू लागले. आणि गणूचे ते " गणू महाराज " झाले.
गुरुआज्ञेनुसार गणू महाराज आपल्या मातृभूमीला आले. मारुतीच्या मंदिरात चार वैराग्यांसह बसले होते. एका हातात रुद्राक्षाची माळ, दुसऱ्या हातात कुबडी, लहान वयाचा कौपीन परिधान केलेला तेजःपुंज साधू पाहून, गावातील लोक त्यांच्या दर्शनाला येत होते. ते सर्व लोक ओळखीचे होते. पण त्यांना स्वतःचा परिचय लोकांना द्यायचं नव्हता.
कोणी साधु महाराज मारुतीच्या मंदिरात आल्याची बातमी गावभर पसरली. तशी गीतामाय व रावजीनाही कळली. गीतामायने विचार केला, जर हे महाराज खरच सामर्थ्यशाली असतील तर, आपला बारा वर्षापासून बेपत्ता झालेल्या मुलाचा पत्ता सांगू शकतील. म्हणून गीतामाय आणि रावजी महाराजांच्या दर्शनाला आली.
आपल्या आई-वडिलांना समोर पाहिले. त्यांना महाराजांनी मनोमन साष्टांग नमस्कार घातला. आईला पाहिले मात्र महाराजांचे डोळे भरून आले. वाटले असेच उठून आपल्या आईला कडकडून भेटावे. पण मर्यादा आडवी आली. त्यांना प्रगट व्हायचे नव्हते. गुरुइज्ञेचेचे उल्लंघन होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःला मोठ्या प्रयासाने आवरले.
गीतामाय त्यांच्या पुढे येऊन हात जोडून म्हणाली, महाराज! माझा मुलगा बाराव्या वर्षी गुरु शोधार्थ बाहेर पडला. त्याला अध्यात्माचे वेड आहे. तुमचा सगळीकडे संचार आहे. माझा बाळ कुठे पाहिला का हो? ऐकून महाराजांच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाले, आपण रामनाम घ्यावे. एक वर्षांनी तो परत येईल. गीतामाई मोठ्या समाधानाने दुःखी मनाला दिलासा मिळाल्याने जणू आपला बाळच भेटला या आनंदात महाराजांचे आई वडील परत फिरले.
आणि महाराजांच्या डोळ्यांसमोर चलचित्र प्रमाणे गतस्मृती सरकू लागल्या. आपण कसे वयाच्या बाराव्या वर्षी कोणालाही न सांगता अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडलो? सांगली, मिरज, अक्कलकोट, हुमणाबाद, कलकत्ता, नाशिक सगळीकडे जाऊन शेवटी येहेळगावला तुकामाईच्या मठात आलो. तुकामाईकडे नऊ महिने राहून त्यांची मनापासून सेवा केली.
त्यांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी दिलेल्या अनुग्रहाने कृतकृत्य झालो.नंतर तुकामाइने त्यांचे गुरु चिन्मया नंदाकडे नेले. आजेगुरूंना नमस्कार करताना त्यांच्या समाधीवरचा हार कसा आपल्या गळ्यात पडला? तुकामाईने अत्यानंदाने कसे पोटाशी धरत साश्रू नयनाने कुरवाळतत म्हणाले, बाळा, तुला मी फार त्रास दिला का रे?
आता तू उत्तरेकडे भ्रमण कर. देश पालथा घाल. बाळा, ब्रह्मज्ञान झाले तरी ते मुरले पाहिजे. जा.. गणूंना पाठवताना त्यांच्या विरहाने तुकामाईनांही अवघड वाटत होते. गणूंना पाय पुढे टाकवत नव्हते. पण गुरुआज्ञेचे पालन करणे तेवढेच महत्वाचे होते. मोठ्या कष्टाने आपण तिथून निघालो.
क्षणभर आपण कुठे आहोत याचे भान महाराज विसरले होते. ते अगदी गुरूचिंतनात गढून गेले होते. लोक दर्शनाला येतच होते. गावचे पाटीलही आले. त्यांना या साधूबद्दल संशय आला. हा आपला गुणू तर नसेल? म्हणून त्यांनी महाराजांच्या कानाकडे पाहिले. आणि त्यांना महाराजांचा फाटका कान दिसला. त्यांना त्यांच्या फाटक्या कानाची खूण पटली. उद्या सकाळी गीतामाईला सांगू. असे म्हणून ते घरी निघून गेले. फाटक्या खाण्याचे रहस्य असे होते की...
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
No comments:
Post a Comment