TechRepublic Blogs

Monday, October 27, 2025

आयुष्य

 *भज गोविन्दं...*

The Essence of Vedanta

(श्री आद्यशंकराचार्यकृत) 



*यावद्वित्तोपार्जनसक्त:*

*स्तावन्निजपरिवारो रक्तः ।*

*पश्चाज्जीवति जर्जरदेहे*

*वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ॥*

*॥३॥*


भज गोविन्दं... भज गोविन्दं... 

गोविन्दं भज मूढमते... 



“अरे ! जोपर्यंत तू धन कमावतो आहेस, तोपर्यंतच तुझ्या कुटुंबातील लोक तुझ्यावर प्रेम करतील; तुझ्या पुढेमागे धावतील. पण म्हातारपणाने देह जर्जर झाल्यावर मात्र तुला कोणीही विचारणार नाही."


卐卐卐


*-----------------------------*


माणसाचं *आयुष्य* कमळाच्या पानावरच्या थरथरणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगुर, अस्थिर तर आहेच पण अनेक व्याधी समस्यांनीही ग्रासलेले आहे. मात्र मनुष्य भयापोटी ह्या वास्तवाकडे जाणून बुजून काणाडोळा करतो.

 ते विसरण्यासाठी तो अहंकाराचा एक भ्रामक बुडबुडा तयार करून त्यात आपले शारीरिक सौंदर्य, पैसा अडका, मानमरातब, कुटुंब, मित्रपरिवार, यांच्या आधाराने राहणे पसंत करतो. स्वतःची समजूत काढत राहतो, की आज माझ्याकडे जे काही आहे ते कायम माझेच असणार आहे. पण खरे तर कुटुंबाचे, मित्रांचे, प्रेम, मान कुठपर्यंत? 


माणूस जोवर कमावता आहे, हिंडता फिरता आहे, त्याचा काही तरी उपयोग आहे, तोपर्यंतच. 


*म्हातारपणी* जर गाठीला पैसा नसेल,हातपाय चालेनासे झाले, अंथरुणाला खिळला, तर घरादाराला त्याचे ओझेच व्हायला लागते. समाजात मान नाही, घरात कोणी विचारत नाही, अशी त्याची केविलवाणी अवस्था होते.



*'माझे कुटुंब म्हणजेच माझे जग'* आणि *'माझ्या घराच्या चार भिंती म्हणजेच माझा स्वर्ग'* यालाच 'जीवन ऐसे नाव ' अशाप्रकारे जगणाऱ्या समस्त मनुष्यजातीला आचार्य येथे जीवनातील वास्तविक कटुसत्याची जाणीव करून देत आहेत.



*'घर'* उभे रहावे म्हणून प्रत्येक मनुष्य आयुष्यभर काबाडकष्ट करत राहतो.द्रव्य कमावित राहतो. पत्नी, मुले-मुली यांच्यासाठीच जगत राहतो. आणि पाहता पाहता आयुष्याची संध्याकाळ समोर येऊन उभी राहते. वार्धक्याने देहाची,मनाची आणि पर्यायाने द्रव्यसंचयाची 'दमछाक' झालेली असते. मग हाच कुटुंबाचा कर्ता-करविता 'म्हातारा' होऊन घरातील अडथळा बनून राहतो.


जीवनातील हे विदारक सत्य आहे. यामध्ये कुटुंबाचाही दोष नाही. हा निसर्गक्रम आहे. जीवनातील ही वास्तव परिस्थिती आहे. याचं वास्तवतेचे नेमके वर्णन संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या मार्मिक अभंगातून केले आहे. समस्त पुरुषजातीला सावधान करताना संत तुकाराम महाराज म्हणतात,


धनवंतालागी ।

सर्व मान्यता आहे जगीं ॥

माता पिता बंधुजन ।

सर्व मानिती वचन ॥


ज्याच्याजवळ पैसा आहे, तो जगद्मान्य असतो. आई-वडील, बहीण-भाऊ सगळे त्याचे ऐकतात. त्याचा धंदा जोपर्यंत जोरात चालतो, तोपर्यंत बहीण त्याला दादा म्हणते, पत्नी त्याला मान देते, त्याच्या आज्ञेत राहते.तुकाराम महाराज म्हणतात, पैशापायी घडणारे हे भाग्यबंधन नाशवंत आहे; हे जाणून घ्या.



या वास्तव परिस्थितीवरही मात करता येते, ह्याचे प्रत्यंतर *'छांदोग्य'* उपनिषदात आहे -



'न अस्य जरया एतद् जीर्यति न वधेन अस्य हन्यत एतद् सत्यं ब्रह्मपुरं अस्मिन् कामाः समाहिता एष आत्मा'॥


‘शरीर वृद्ध झाले तरी हृदयाकाशांतील ब्रह्म वृद्ध होत नाही. शरीराच्या वधाने त्याला मरण येत नाही. हृदयाकाश हे खरे ब्रह्मपुर आहे. याच्यामध्ये सर्व कामना स्थिर होतात. हाच आत्मा आहे.'


तात्पर्य - आत्म्याचे ज्ञान हेच मायावी संसारातून तरून जाण्याचा सोपा उपाय आहे. आणि या आत्मज्ञानाची गुरुकिल्ली म्हणजे, 

*'भज गोविन्दम् ।’*



_यावद्वित्तोपार्जनसक्त:_

_स्तावन्निजपरिवारो रक्तः ।_

_पश्चाज्जीवति जर्जरदेहे_

_वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ॥_


_भज गोविन्दं... भज गोविन्दं..._

_गोविन्दं भज मूढमते..._


_卐卐卐_


*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

No comments:

Post a Comment