TechRepublic Blogs

Sunday, October 5, 2025

नामस्मरणाची चावी

 *बँकेचा लॉकर आणि श्रीमहाराजांची कृपा* ------


         मुलीकडे जर्मनीला व नंतर मुलाकडे कॅनडाला जाण्यासाठी विसा काढायचा होता. त्यासाठी पासपोर्ट लागणार म्हणून बँकेच्या लॉकरमधून माझा व विनयाचा पासपोर्ट आणायला गेलो आणि एकदम हा विचार मनात आला.

       येथील एका बँकेत आमचे लॉकर आहे. तिथे गेलो की जरूर त्या सह्या करून आपली चावी लॉकरला लावायची. नंतर बँकेचा मॅनेजर त्याची कॉमन चावी लॉकरला लावणार. मग तो लॉकर उघडून आपल्याला आत ठेवलेला आपला ऐवज मिळणार. मग याचा परमार्थाशी  संबंध काय ?

         परमार्थामधला अमूल्य ऐवज म्हणजे समाधान. पैसा, संपत्ती, विद्वत्ता, सामाजिक पोझिशन वगैरे तात्पुरता आनंद देतील, पण त्यांच्यामुळे समाधान मिळेलच याची खात्री नाही. खरे समाधान भगवंताच्या लॉकरमध्ये आहे. त्याच्या दोन चाव्या. एक आपल्याकडे, ती म्हणजे आपले नामस्मरण. तर दुसरी कॉमन चावी भगवंताकडे, आपल्यासाठी श्रीमहाराजांकडे. ती चावी म्हणजे त्यांची कृपा. दोन्ही चाव्या लागल्या की समाधानाचा ठेवा हाती लागतो.

          आता मी माझी बँक सोडून दुसर्‍या बँकेत किंवा माझ्याच बँकेच्या दुसर्‍या शाखेत गेलो तर मला माझा लॉकर उघडता येईल का ? तसेच ज्यांनी मला मंत्र दिला त्यांना सोडून मी दुसर्‍या गुरूंच्या किंवा साधुपुरूषाच्या नादी लागलो तर माझं काम होईल का ? तसेच माझी योग्य ती चावी, जी मला बँकेने दिली आहे ती न नेता, मी दुसरीच चावी घेऊन गेलो तर माझे लॉकर मला उघडता येईल का ? बँकेचा मॅनेजर माझ्या ओळखीचा असला तरीही लॉकर उघडता येणार नाही. तसेच गुरूने दिलेली नामस्मरणाची चावी न वापरता, गुरूने सांगितलेल्या साधनाऐवजी मी इतर साधनावर विश्वास ठेवला तर समाधानाचे लॉकर कसे उघडता येईल ?

        बँकेच्या मॅनेजरकडे बँकेत लॉकर्सची कॉमन चावी सतत जवळ असते. तुम्ही फक्त तुमची चावी घेऊन बँकेत जाणे आवश्यक असते. तसेच भगवंताची कृपा सतत सर्वांवर वर्षाव करीतच असते, फक्त आपण आपली नामस्मरणाची चावी सतत जवळ बाळगली पाहिजे.

        दोन्ही लॉकर्समध्ये दोन फरक आहेत. बँकेच्या लॉकरसाठी आपली चावी आधी लावावी लागते, मग मॅनेजर त्याची चावी लावून लॉकर उघडून देतो. पण भगवंताच्या लॉकरसाठी भगवंताची चावी सतत लावलेलीच असते, फक्त आपणच आपली चावी लावायची आवश्यकता असते.

           मुख्य फरक म्हणजे, बँकेच्या लॉकरमध्ये आपण जे ठेवले असेल ते व तेवढेच आपल्याला मिळू शकते, पण भगवंताच्या लॉकरमध्ये भगवंताने भरभरून समाधान ठेवले आहे. आपण नामस्मरणाची चावी लावून हवे तेवढे लुटायचे आहे. 


श्रीराम .


    ------  *डॉ. मनोहर वर्टीकर.*

No comments:

Post a Comment