TechRepublic Blogs

Saturday, October 4, 2025

नामस्मरणाचे अन्न

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*नामस्मरणाच्या जोराने कल्पना मारावी.*


*कल्पना आल्या तरी तिकडे दुर्लक्ष करून नामस्मरण करीत राहावे, नेम करीत राहावे म्हणजे थोड्या वेळाने नामाचा जोर वाढतो व कल्पनांचा कमी होतो; मग नामाच्या वाढलेल्या जोराने कल्पना मारता येतात. प्रथमच कल्पना मारण्याचा प्रयत्न केल्यास ते जमत नाही हे तत्त्व भीम व बकासुराच्या गोष्टीचा दृष्टांत देऊन श्रीबाबा मोठ्या मौजेने सांगत असत.

 ते म्हणत, "बकासुरासाठी पाठविलेल्या अन्नाच्या गाड्यावर बसून, त्याचा बळी म्हणून ब्राह्मणपुत्राऐवजी भीम गेला. व गाड्यातील अन्न आपणच खाऊ लागला. बकासुर तेथे आल्यावर, भीमाला अन्न खाताना पाहून, संतापला व त्याला मारु लागला. परंतु भीमाने माराकडे दुर्लक्ष केले व अन्न खाऊन संपविण्याचा सपाटा चालविला. सर्व अन्न खाऊन झाल्यावर, त्या अन्नाने त्याच्या अंगात खूप बळ आले, व त्याने बकासुराला मारून टाकले. तसे साधकाने भीम होऊन नामस्मरणाचे अन्न खावे. त्यावेळी कल्पनेच्या बकासुराने त्रास दिला तरी तिकडे दुर्लक्ष करावे. मग नामस्मरणाचे अन्न खाऊन बळ वाढल्यावर कल्पनेच्या बकासुराला सहज मारता येते."*


*_पुस्तक संदर्भ:- श्री अंबुराव महाराज यांच्या आठवणी_*

No comments:

Post a Comment