TechRepublic Blogs

Wednesday, October 22, 2025

शुभभाषण

 *॥श्रीहरिः॥*


नवव्या अध्यायाची सुरवात करताना श्रीभगवंत म्हणतात, 


*-----------------------------*


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता नवमोध्यायः


*इदं तु ते गुहातमं* 

*प्रवक्ष्याम्यनसूयवे ।*

*ज्ञानं विज्ञानसहितं* 

*यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥*

*॥९.१॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय नववा राजविद्याराजगुहायोग ९.१)


*भावार्थ:- श्री भगवान म्हणाले,* 

*तू असूयारहित असल्यामुळे अत्यंत गुह्य असं हे (ब्रह्म)ज्ञान प्रपंचज्ञानासह तुला आता सांगतो. हे जाणल्यानं तू दुःखप्रद अशा संसारापासून मुक्त होशील.* 


*-----------------------------*


समाधीच्या मार्गानं *अक्षरब्रह्माचं* ज्ञान होणं ही गोष्ट सर्वसामान्य जनांना अशक्यप्राय अशी आहे. त्यामुळे या लोकांची समस्या ध्यानात घेऊन सर्व लोकांना परमेश्वराचं ज्ञान सुलभ होईल असा राजमार्ग भगवान आता दाखवतात.


यालाच *'भक्तिमार्ग'* असंही म्हणतात. हा राजमार्ग ज्ञानविज्ञानाचाच एक भाग आहे. म्हणूनच भगवंत सांगतात, 


'हे गुह्यातलं गुह्य ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो. हे ज्ञान झालं म्हणजे तू पापातून मुक्त होशील. तू मत्सररहित असल्यामुळे मी हे ज्ञान तुला सांगत आहे.'


या ठिकाणी *'अनसूयवे'* हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हे गुह्यज्ञान जाणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जो असूयारहित आहे त्यालाच हा अधिकार आहे. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं ही सोपी गोष्ट असते; परंतु दसऱ्याच्या सुखानं सुखी होणं, त्याच्या सुखात आनंदानं सहभागी होणं ही गोष्ट महाकठीण असते.


एका गरीब ब्राह्मणाला, त्याचं दारिद्र्य पाहून वनदेवता एक अक्षयपात्र देते. ते अक्षयपात्र घेऊन तो ब्राह्मण घरी येतो. त्या पात्राकडे तो पंचपक्वान्नं मागतो. त्याबरोबर त्या पात्रामध्ये पंचपक्वान्न उपस्थित होतात. ब्राह्मण कुटुंबीय आनंदानं त्याचा आस्वाद घेतात. हे दृश्य शेजारचा माणूस बघतो. त्याच्या मनात असूया निर्माण होते. त्या ब्राह्मण कुटुंबाला भोजन - सुख मिळालेलं त्या शेजाऱ्याला बघवत नाही. रात्री सारी निजानीज झाल्यावर तो शेजारी त्या पात्रांची अदलाबदल करतो. या गोष्टीचा अंत अखेर सुखदच होतो. ब्राह्मणाला त्याचं पात्र वनदेवता परत मिळवून देते. तात्पर्य असं की, कित्येकांना अशाच तऱ्हेनं शेजाऱ्याचं सुख बघवत नाही. म्हणून आपल्याला जर ही राजविद्या आत्मसात करून घ्यायची असेल तर दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हायला शिकलं पाहिजे.



*महाभारतात* अर्जुनच्या जन्मापूर्वी व्यास महर्षी पांडुराजाला भेटायला हिमालयात येतात. ते कुंती आणि पांडुराजाला एक व्रत देतात. त्या व्रताचं नाव *'शुभव्रत.'* 

एक वर्ष शुभच बोलायचं,शुभभाषण करायचं, परनिंदा करायची नाही; तसा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. त्याप्रमाणे ते दोघं त्या व्रताचं पालन करतात. 


बुद्धी-मनाला अशी सवय लागली की ती तशीच रहाते. बरोबर एका वर्षानं कुंतीला उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर अत्यंत शालीन अशा पुत्राची प्राप्ती झाली. तोच *अर्जुन!* 


परनिंदा तर सोडाच; तो स्वत: विषयीही कधी बोलायचा नाही. किंबहुना त्याच्याविषयी कुणी गौरवानं बोलायला लागलं तर तो सभेतून उठून निघून जायचा. असं असूयारहित जीवन जगता आलं तर अशुभाचा नाश होतो. मग हे गुह्य ज्ञान प्राप्त झालं की दु:ख नाहीसं होतं. 


आपण एकाकी आहोत, सारं काही

आपल्यालाच करावं लागतं आणि या जगातून आपल्याला एकट्यालाच जायचं आहे, अशासारख्या साऱ्या अशुभ कल्पनांतून मनुष्याला मुक्ती मिळते. मृत्यूची भीती नाहीशी होते. म्हणजे कुणी मरणारच नाही, असा मात्र याचा अर्थ होत नाही. तर मृत्यू अशुभ न वाटता शुभ वाटू लागतो. मृत्यू म्हणजे या जीवनरूपी खेळातला प्राणच आहे, अशातऱ्हेची व्यापक दृष्टी येते.



सद्गती प्राप्त न झालेला मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरतच राहतो. ज्याप्रमाणे भगवान बुद्धांच्या उपदेशातील पहिलं आर्यसत्य आहे - *‘दुःख.’* 


अर्थात जेव्हा शरीराला इजा होते, तेव्हा तुम्हाला दुःख होतं. तसंच कुणाशी वादविवाद झाला तर मानसिक त्रासामुळेही आपल्याला दुःख होतं. शरीर आणि मन स्वस्थ असलं तरीही वाढत्या वयाबरोबर भविष्याच्या काळजीने मनुष्य दुःखी होतो. अशा अवस्थेत नवव्या अध्यायात दुःखमुक्तीसाठी श्रीकृष्ण अर्जुनाला परम गोपनीय ज्ञान देत आहेत. 


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* 

‘हे ज्ञान प्राप्त करून तो सुख- दुःखाच्या सांसारिक चक्रातून मुक्त होईल.येथे सांसारिक मुक्तीचा अर्थ पृथ्वीवरील जीवनाच्या समाप्तीशी निगडित नाही. तर ज्या दृष्टिकोनातून पाहिल्याने त्याला जीवनात दुःख जाणवतं, ती त्याची अहंकारयुक्त दृष्टीच नाहीशी होईल.' 


या ज्ञानामुळे त्याला अशी समज, अशी विचारधारणा आणि अशी दृष्टी मिळेल, जेथून पाहिल्यावर त्याला सर्वदूर, जळीस्थळी परमेश्वरच दिसेल.मग त्यानंतर केवळ आनंदच उरेल..


*सारांश:*

*दुसऱ्याच्या सुखानं सुखी होण्याची कला अवगत झाली, जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण झाला, तरच हे गुह्यज्ञान प्राप्त होतं आणि दुःखातून मुक्ती मिळते.शुभव्रत घेणं त्यासाठी आवश्यक आहे.*



संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

No comments:

Post a Comment