अध्यात्म तुमच्या रग्गड परीक्षा घेतं !
नापास करीत राहतं पुन्हा पुन्हा तुम्हाला. तोंडावर पाडतं. संकटं धाडतं. जे घडू नये वाटत असतं तेच घडवत राहतं. दूर उभं राहून तुमची गंमत पाहतं. तुमचा विश्वास ढळू देतं. तुम्हाला चुकांच्या जाणिवा झाल्या की टिपं गाळू देतं. अगदी सगळे सगळे पर्याय धुंडाळू देतं. 'एकदा केलेली चूक पुन्हा कधीही सुधारण्याची संधी मिळणे नाही, त्यामुळे पुढेही चुकत राहा, हीच तुझी वाट आता' असं सतत सांगत राहणारे अनुभव, लोक, प्रसंग धाडत राहतं.
आणि ज्या क्षणी सगळ्या प्रकारचे सगळे झगडे थांबवून 'भगवत् शरणागती' या व्यतिरिक्त तुमच्यापाशी करण्याजोगे निराळे काहीही नाही याची तुम्हाला पूर्ण खात्री पटेल त्या क्षणी तुम्हाला चटकन् कडेवर घेतं पुन्हा. (म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही. किंचित पुसट अंतर आहे. उमगणाऱ्याला नक्की उमगेल.)
रागाने म्हणा किंवा आगाऊपणाने म्हणा, घर सोडून निघून गेलेला पोरगा जगदुनियेच्या उरफाट्या स्वभावाचा अनुभव घेऊन माघारी आला तर दारात उभी माऊली जितक्या मायेनं त्याला पोटाशी घेईल तितक्या सहज तुम्हाला अध्यात्म चटकन् जवळ घेतं.
विश्वासाचं एक डेरेदार झाड. ज्याच्याकडे पाला होता हिरवागार. फळं होती रसरशीत. देखणी फुलं होती. अगदी नक्षीदार खोड होतं. पण त्याची मूळं मातीत घट्ट नव्हती. ते एकदा उन्मळून पडल्यानंतर जेव्हा पुन्हा बीज होऊन रुजतं आणि नव्याने उगवून येतं तेव्हा त्यांची लव्हाळं होतात. आता या विश्वासाला महापूरही संपवू शकत नाहीत.
अगदीच अलीकडे एका व्यक्तीने प्रश्न केला होता की,
"तू वाचत होतास की विष्णूसहस्रनाम रोज ? काय झालं ? झालं का तुझ्या मनासारखं ?"
सुमारे दीड वर्षापूर्वी अगदी सहज बुद्धिभेद झाला असता माझा या प्रश्नाने. अगदी सहज. पुढच्या चर्चेचीही गरज भासली नसती. पण आता ? आता मेख उमगली आहे.
मुळात विष्णूसहस्रनाम माझ्या मनासारखं व्हावं म्हणून नव्हेंच वाचायचं हे कळायलाच फार वेळ जातो. ज्याच्या मनासारखं सुरू आहे त्याच्यापेक्षा अधिक माझी काळजी कुणालाही नव्हती, नाही आणि नसेल हे लक्षात यायलाच किती तरी पायपीट करावी लागते.
देव बाटलीत कोंडलेला जादूगार नाहीये हे जितक्या लवकर उमगेल तितकं अधिक सुखकर होतं जगणं. आपल्या इच्छा आपण प्रकट कराव्या आणि त्याने त्या बिनबोभाट पूर्ण कराव्या याच्या इतकं दुसरं दुर्दैव नाही तुम्हाला सांगतो. राजाने 'बोल तुला काय देऊ' विचारावं आणि घोडेस्वाराने तो राजा आहे हे ठाऊक नसल्यानं त्याच्याकडे चिमुटभर तंबाखू मागावा इतकी आपली इच्छा, आकांक्षा, मनोरथ याविषयीची बुद्धी खुजी असते.
हे सगळं तुम्हाला पाठीत दणके घालून समजावत राहतं अध्यात्म. कळत नाही, वळत नाही तोवर गुडघे फुटतील, पाय ठेचकाळतील अशा वाटेवर चालवीत राहतं. ईर्षा, राग, प्रचंड मोठे मानसिक आघात या सगळ्यांनी पोळून काढतं. आणि मग विचारतं की आता बोल बाळा, काय शिकलास ?
तुमचं उत्तर कालच्या तुमच्या धड्यानंतरही तेच असेल तर तुम्हाला तोच धडा पुन्हा देतं. देत राहतं. उत्तर बदललं, पुढच्या धड्याचा बोध कळेल इतपत तयारी झाली की पुढचा प्रवास सुरू. अर्थात् हा प्रवास, ज्याचा त्याचा अगदीच निरनिराळा असतो. माझा हा असा आहे. पण एक गोष्ट अगदी सगळीकडे सारखी दिसते की...
🌸 *अध्यात्म तुमच्या रग्गड परीक्षा घेतं* 🌸
No comments:
Post a Comment