!!! गोंदवलेकर महाराज !!!
भाग - ९.
तो धनिक जिवंत झालेला पाहून, स्मशानभूमीत असलेले सर्वे लोक आश्चर्याने पाहू लागले. घरच्या लोकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. दुःखी होऊन मनकर्णिका घाटावर आले होते, ते आनंदी होऊन धनिकासह परत जात होते. सगळेजण महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्याकडे धावू लागले. आणि महाराजांनी धावत जाऊन गंगेत उडी घेऊन दिसेनासे झाले. त्यांना प्रसिद्धी नको होती. त्या धनिकाला मात्र आपल्याला वाचवणार्याचा शेवटपर्यंत थांगपत्ता कळला नाही आणि भेटही होऊ शकली नाही.
एकनाथी भागवतात म्हटलेच आहे,
" जेवढी नामाची शक्ती। तेवढे पाप नाही त्रिजगती।।"
पाप आणि पापाचा नाश करणाऱ्या नामाची स्पर्धा लागली तर, सर्व पापांचा नाश होऊन नामच शिल्लक राहील. नामामुळे पाप भस्मसात होतील. हरीपाठात म्हटले आहे.....
"तृण अग्निमेळे समरस झाले। तैसे नामे केले जपता हरि ।।"
नामाचा अनुभव स्वतः महाराजांनी घेतला होता. घेत होते. आणि जगाला पटवून देत होते. लोकांना नामाला लावत होते. ते गुरुआज्ञेचे पालन तंतोतंत करीत होते.
काही दिवसांनी महाराज प्रयागला गेले. तिथे साधूंचा एक जत्था होता. परंतु त्यांचा कोणी महंत नव्हता. महाराजांची साधना, मुखावरील तेज, बोलण्या, सांगण्याची त्यांची पद्धत, ज्ञान वगैरे पाहून, त्यांनी महाराजांनाच आपला महंत केले. त्यांची अगदी राजासारखी बडदास्त ठेवू लागले. पण महाराजांवर काही परिणाम होत नव्हता. त्यांना तुकोबांची ओळ आठवली.....
" प्रारब्धेचा वाढे मान। प्रारब्धाची जोडी धन।
वृथा सोस करीसी वाया। भज मना पंढरीराया।।"
जे प्रारब्धात आहे ते कधी चुकायचे नाही.
नंतर तो जत्था व महाराज सगळे मिळून मथुरा वृंदावन करत कलकत्त्याला पोहोचले.
मागच्यावेळी महाराज काशीला असताना, तिथल्या जमीनदाराची आई भेटायला आली. आणि अति दुःखाने म्हणाली, महाराज, मला नातू होण्याचा आशीर्वाद द्यावा. ती म्हणाली, महाराज, मुलाने तीन लग्न केलीत. पण पोटी संतान नाही. महाराजांनी मोठ्या सुनेला व मुलाला घेऊन यायला सांगितले. मुलगा व सून आल्यावर, दोघेही भक्ती भावाने महाराजांच्या पायी पडले. महाराजांनी सुनेच्या ओटीत नारळ घालून म्हणाले, पुढच्या वर्षी मुलगा होईल. हा नारळ मुलाच्या बारशाला फोडून सर्वांनी प्रसाद म्हणून भक्षण करावा.
तो जमीनदार कलकत्त्याला राहत असे. तो त्या साधूच्या शोधात होताच. त्याला झालेला मुलगा एक वर्षाचा झाला होता. अचानक त्याची व महाराजांची गाठ पडली. म्हणाला, महाराज, आपली काय सेवा करू? महाराज म्हणाले, फक्त रामनाम घ्या. पण त्याच्या मातेला वाटे, महाराजांनी काहीतरी मोठी मागणी करावी. तिने अतिशय आग्रह धरल्यावर, महाराज म्हणाले, ठीक आहे. आपण हरिहाट भरवू...
हरिहाट म्हणजे, सर्व पारमार्थिक साधनांचा बाजार असतो. तिथे सर्व प्रकारच्या साधना चालू असतात. प्रवचन, कीर्तन, पूजा, पारायण, योग, ध्यान हे तर असतेच. शिवाय यज्ञ, जप, भजन, पुराणवाचन, पंचग्निसाधन, शास्त्रध्यापन, ब्रह्मकर्म, अनुष्ठान, देवतार्चन, सत्संग, गुरुसेवा, मौनसेवन, वाममार्ग तंत्रक्रिया इत्यादी चालू असते. पंडित लोकांचा योग्य सन्मान केला जातो.
या सर्वांसाठी फार खर्च येतो. जमीनदार मोठ्या आनंदाने कबूल झाला. मोठा मांडव घातला गेला. सर्व व्यवस्था अगदी चोख ठेवली. हा.. हा .. म्हणता सात दिवस चाललेला हा समारंभ मोठ्या आनंदात, उत्साहात पार पडला. सर्व अगदी समाधान पावले. सहसा हरिहाट कोणी करत नाही.
हरिहाट सुरू झाला तेव्हा महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यांच्यासाठी मोठे सिंहासन केले होते. त्यावर महाराज एखाद्या राजासारखी शोभून दिसत होते. अन्नदान व नामस्मरण सतत चालू आहे की नाही हे ते जातीने लक्ष घालून पाहत होते.
आठव्या दिवशी समारंभाची सांगता करताना जमीनदाराने महाराजांची महापूजा केली. त्यांना भरजरी वस्त्रे व चांदीचे ताटात एक हजार रुपये दिले. महाराजांनी चांदीचे ताट जमीनदादाच्या आईला दिले. व रुपये पंडितांना वाटले. त्याकाळी या हरिहाट कार्यक्रमाला २५,००० च्या वर खर्च आला होता.
हरीहाट संपल्यावर पाच-सहा दिवस महाराज तिथे राहिले. पण दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली म्हणून, महाराजांनी बरोबरच्या बैराग्यांना अमरकंटकला जाण्याची आज्ञा केली. व एक दिवस कोणालाही न सांगता महाराज निघून गेले.
फिरत फिरत महाराज सातपुडा पर्वतापाशी आले. नर्मदाच्या काठाकाठाने त्यांचा प्रवास सुरू होता. अंतर्मुख ते होतेच. अशातच वाटेत त्यांना घरून पळून आलेला मुलगा भेटला. तो महाराजांबरोबर राहू लागला....
क्रमशः
संकलन लेखन,
मिनाक्षी देशमुख.
No comments:
Post a Comment