*श्रीराम समर्थ*
*भक्तपणाची सीमा*
देहाच्या व मनाच्या प्रतेक हालचालीमधें भगवंताची संगत न सुटणे यामधें भक्तपणाची सीमा गांठली जातें. आपल्या जीवनांत फक्त एक भगवंतच कर्ता आहे अशा संपूर्ण श्रद्धेनें भक्त जीवनांत वावरतो. अशा भक्ताच्या प्रापंचिक इच्छा नामषेश होतात. कारण जें घडलें तें, जें घडणार तें आणि जें घडत आहे तें भगवंताच्या इच्छेनें घडतें असें त्याला मनापासून वाटतें. अशा भक्ताच्या अंतरी जे उमटतें त्याचें प्रतिबिंब भगवंतामधें पडतें. भक्त जी भावना करतो भगवंत तिचा स्वीकार करतो. आपल्या बरोबर भगवंत आहे ही भावना ठेवणाऱ्या भक्ता बरोबर राहिल्याशिवाय भगवंताला चैन पडत नाही. भक्त म्हणतो 'भगवंता! तूं माझा स्वामी आहेस. तूं जें करशील तें योग्यच करशील. त्यावर मी विचार करणार नाही. मी तुझा आहे येवढें मी जाणतो. तू जेथें नेशील तेथें मी आनंदानें जाईन. हे जग काय आहे? मी येथें कां आलो ? ते तू पहा. तू मला वापरशील तसे वागणे, तू मला ठेवशील तसें राहणें हेंच माझें परम भाग्य आहे. तुझे सानिध्य हेंच ध्येय, तुझे प्रेम हाच माझा मोक्ष, तुझे नामस्मरण हीच माझी साधना आणि तुझ्या हजेरीत मरण हेंच माझें मागणे आहे.' भक्त म्हणजे अशी भगवंताला वाहिलेली, भगवंताच्या अनुसंधानांत मुरलेली, भगवंताच्या स्मरणांत धुंद झालेली, भगवंतानें व्यापलेली, वासना मेलेली, अहंकार किंवा कर्तेपण जळलेली व भूतमात्रांशी विनम्र झालेली व्यक्ति होय. स्वतःमधें आपण नसून भगवंतच आहे हा साक्षात् अनुभव येणें ही भक्तीची सीमा आहे. अशा भक्ताच्या अंतःकरणांत निरंतर अनिवार भगवत्-स्फूर्ति चमकते. तो देहानें माणूस दिसला तरी आंतमधें भगवत्स्वरूप म्हणजेच ज्ञानस्वरूप असतो.
ही दिव्य अवस्था भगवंताच्या अनुसंधानानें प्राप्त होते. गुरूनें दिलेल्या नामाच्या अजपाजपानें भगवंताच्या दर्शनास रोखणारे सारे प्रतिबंध वितळून जातात. भक्त भगवंतापाशीं समरस होतो. भक्त आणि भगवंत यांचे भक्ताच्या हृदयांत मधुर मीलन होतें. पण एक होऊनही दोघे दोनपणानें दिसतात. दिसायला दोन दिसूनही दोघे एकच असतात. भक्त ज्ञानाचा सागर होतो पण त्याच बरोबर भक्तीचें मंदिर - चालतेंबोलतें मंदिर - बनतो. ही ज्ञानोत्तर भक्ति भक्तांच्या जीवानातील मोठें रम्य असे गूढ आहे. या अवस्थेत नामाचें रूपांतर अनाहत नादांत होतें. त्या नादाच्या धुंदीमधें भक्त सतत भगवंताचा आस्वाद घेतो.
---------प्रा के वि बेलसरे
*********
संदर्भः भगवंताचें अनुसंधान साधनेचा प्राण हे त्यांचेच पुस्तक पान ५९-६०-६१
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment