*नामस्मरणाचे प्रकार*
एकदा गरुडाच्या मनात आले की, मी भगवंताचे वाहन अर्थात मी जवळचा, माझ्याशिवाय भगवंत कुठे जात सुद्धा नाहीत. श्रीकृष्णाला माता रुक्मिणीनंतर मीच प्रिय. तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्त्व देतात ? अगदी त्याचा रथ सुद्धा चालवला.
एक दिवशी या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे आले, तर अर्जुन झोपला होता आणि द्रौपदी त्याच्या डोक्याला तेल मालिश करत होती. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले तरी अर्जुन उठला नाही हे पाहुन गरुडाला आणखी राग आला. पण श्रीकृष्ण हसत हसत त्याच्या डोक्याशी जाऊन बसले आणि द्रौपद्रीला बाजूला करून स्वत: त्याच्या केसाला तेल लाऊ लागले.
आता मात्र कहर झाला या विचाराने गरुड निघणार तेव्हढ्यात श्रीकृष्णाने त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले. रागानेच गरुड बसला. त्या शांततेत त्याला "श्रीकृष्ण कृष्ण जय जय, श्रीकृष्ण कृष्ण जय जय" असा मंद आवाज ऐकू येऊ लागला. जप कुठून येतोय हे पाहता गरुडाच्या लक्षात आले, की आपण जे अर्जुनाचे केस हातात घेतलेत त्यातूनच, नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातुन नामस्मरण होत आहे आणि अर्जुनाची महती गरुडाला कळुन चुकली.
आजच्या युगात सुद्धा संत तुकाराम, संत चोखामेळा आणि श्री ब्रम्हाचैतन्य गोंदवलेकर महाराज अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांचा परावाणीने जप होत असे. मंत्रजप हा चार वाणीने होतो.
१) वैखरी वाणी - आरती नंतर सामुदायिक जप मोठ्याने करतो तो.
२) मध्यमा - ओठ आणि जीभ याद्वारे मंत्र पुटपुटणे.
३) पश्यन्ति - जीभ ओठ न हलवता मंत्र जप करणे.
४) परा - अत्यंत उच्चपातळी वर हा जप शरीरातील रोमारोमातून, हृदयातून हा जप आपोआप होत असतो. जसे की, मृत्युनंतरही चोखामेळाच्या अस्थि जप करत होत्या.
*सतत नामस्मरण करा*
ll ओम नमः शिवाय ll
No comments:
Post a Comment