चिंतन
श्रीराम,
परमार्थाचा अभ्यास करताना काळ आणि वेळेचे गणित मांडावे लागते. आपले आयुष्य किती शिल्लक राहिले ते माहित नाही. त्यात, सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्याचे आपले ध्येय आहे. मग या ध्येयपूर्ती साठी, त्याच्या अभ्यासाला लागणारा वेळ ह्याचे गणित मांडायचे म्हणजे काळ आणि वेळेचे गणित मांडणे.
गणिताचा अभ्यास आपल्याला आनंद देत नाही पण प्रत्येक समस्येला उत्तर असतेच ही शिकवण देतो. परमार्थाचा अभ्यास पुस्तकी नसून कृतीचा आहे. मग छोटी छोटी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मनाचा दृढ निश्चय करावा लागतो. कारण हे मनच आहे, ज्याच्यात क्षणाक्षणाला विकल्प येत रहातात आणि विकल्पाने ध्येय कोसो दूर जाते.
अनेक शंकाकुशंकांनी भरलेले मन डळमळीत होत रहाते. सतत कोण काय म्हणेल अशा भीतीने भरलेले मन कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नसते. म्हणून मनातील शंकाकुशंका दूर करण्यासाठी त्यामध्ये असलेली अनामिक भीती घालवण्यासाठी योग्य मार्ग म्हणजे ईश्वर आणि संतांवर श्रद्धा ठेवणे.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment