TechRepublic Blogs

Friday, October 31, 2025

तळमळ

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*पू. बाबा : पाच मिनिटे का होईना, इतर सर्व काम आणि विचार बाजूला ठेवून निश्चयाने सर्व लक्ष नामाकडे देता आले पाहिजे, म्हणजे मग नामस्मरणात थोडा हुकमीपणा येईल. तसेच आपल्या आड काय येते हे सावधानतेने पहावे म्हणजे मग ते बाजूला काढण्यासाठी उपाय सुचेल. थोडक्यात 'मला ते पाहिजे' ही तळमळ हवी. आज त्याचा अभाव आहे. ही तळमळ निर्माण होण्यासाठी सत्संगती हाच उपाय आहे. सज्जन तुम्हाला मदत करू शकतात.

 ते तुमचे विकार बाजूला करतील पण तुम्हाला ते सहन झाले पाहिजे. विकार आपल्या अंगभूत झालेले असल्याने ते निघतांना फार त्रास होतो; ती तयारी हळूहळू होईल. पण आज साधनात एक किमान पातळी यावयास हवी. मागे जाऊ नये; पाऊल पुढेच पडले पाहिजे. आता साधनाच्याच मागे लागले पाहिजे. नामाच्या आड येणारे विचार खरें वाटतात म्हणून ते खरें असले तरी मला सुखाचे होणार नाहीत. 

मला नामाशिवाय दुसरे कशानेही सुख मिळणार नाही असे मनापासून वाटू लागले तर मन नामात रंगू लागेल. बहिर्मुखी निश्चय सोपा असतो पण अंतर्मुख व्हावयाचा निश्चय कठीण आहे. अशा निश्चयाच्या आड आपणच येत असतो. वास्तविक जगात आपल्यावाचून काहीच अडत नाही. म्हणून जगाची फारशी पर्वा करण्यात अर्थ नाही. श्रीमहाराज म्हणत की जे नामाच्या आड येते त्याची पर्वा करू नये. आता मनाशी सरळ समोरून युद्ध केले पाहिजे.*


*🍁अध्यात्म संवाद🍁*

Wednesday, October 29, 2025

गुरुभेट

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*तळमळ  लागल्यावर  गुरुभेट  निश्चित  !*


काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते, आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत : एक सद्विचार, दुसरी नामस्मरण, आणि तिसरी सत्संगती. संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हांच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत, पण याहीपेक्षा, आपल्याजवळ राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात, तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता, संतच - अगदी हिमालयातले संत, तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको ! तुम्ही म्हणाल, 'आम्हाला ते करता येत नाही.' पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो, आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला, तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही ? त्याला एखादी विद्या आली नाही, तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही ? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही ? तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का ? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरू प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहात असतो.


आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला, तरी तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो. म्हणून तुम्ही केव्हांही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील-जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही. मात्र, गुरूला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, "तुला एवढा कसला आनंद झाला आहे ?" त्यावर तो म्हणाला, "मला आता आनंदाशिवाय दुसरे काही उरलेच नाही, कारण मला आज गुरू भेटले !" जो असा झाला, त्यालाच खरी गुरूची भेट झाली. तरी, तुम्ही गुरूला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूरी नाही.


*१९७ .   भगवंताची  तळमळ  हा  साधकपणाचा  प्राण  आहे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

हरीपाठ

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                 भाग  - ९.

               तो धनिक जिवंत झालेला पाहून, स्मशानभूमीत असलेले सर्वे लोक आश्चर्याने पाहू लागले. घरच्या लोकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. दुःखी होऊन मनकर्णिका घाटावर आले होते, ते आनंदी होऊन धनिकासह परत जात होते. सगळेजण महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्याकडे धावू लागले. आणि महाराजांनी धावत जाऊन गंगेत उडी घेऊन दिसेनासे झाले. त्यांना प्रसिद्धी नको होती. त्या धनिकाला मात्र आपल्याला वाचवणार्‍याचा शेवटपर्यंत थांगपत्ता कळला नाही आणि भेटही होऊ शकली  नाही.

          एकनाथी भागवतात म्हटलेच आहे,

" जेवढी नामाची शक्ती। तेवढे पाप नाही त्रिजगती।।"

           पाप आणि पापाचा नाश करणाऱ्या नामाची स्पर्धा लागली तर, सर्व पापांचा नाश होऊन नामच शिल्लक राहील. नामामुळे पाप भस्मसात होतील.       हरीपाठात म्हटले आहे..... 

"तृण अग्निमेळे समरस झाले। तैसे नामे केले जपता हरि ।।"

           नामाचा अनुभव स्वतः महाराजांनी घेतला होता. घेत होते. आणि जगाला पटवून देत होते. लोकांना नामाला लावत होते. ते गुरुआज्ञेचे पालन तंतोतंत करीत होते.

             काही दिवसांनी महाराज प्रयागला गेले. तिथे साधूंचा एक जत्था होता. परंतु त्यांचा कोणी महंत नव्हता. महाराजांची साधना, मुखावरील तेज, बोलण्या, सांगण्याची त्यांची पद्धत, ज्ञान वगैरे पाहून, त्यांनी  महाराजांनाच आपला महंत केले. त्यांची अगदी राजासारखी बडदास्त ठेवू लागले. पण महाराजांवर काही परिणाम होत नव्हता. त्यांना तुकोबांची ओळ आठवली.....

" प्रारब्धेचा वाढे मान। प्रारब्धाची जोडी धन।

  वृथा सोस करीसी वाया। भज मना पंढरीराया।।" 

           जे प्रारब्धात आहे ते कधी चुकायचे नाही.

        नंतर तो जत्था व महाराज सगळे मिळून मथुरा वृंदावन करत कलकत्त्याला पोहोचले. 

              मागच्यावेळी महाराज काशीला असताना,  तिथल्या जमीनदाराची आई भेटायला आली. आणि अति दुःखाने म्हणाली, महाराज, मला नातू होण्याचा आशीर्वाद द्यावा. ती म्हणाली, महाराज, मुलाने तीन लग्न केलीत. पण पोटी संतान नाही. महाराजांनी मोठ्या सुनेला व मुलाला घेऊन यायला सांगितले. मुलगा व सून आल्यावर, दोघेही भक्ती भावाने महाराजांच्या पायी पडले. महाराजांनी सुनेच्या ओटीत नारळ घालून म्हणाले, पुढच्या वर्षी मुलगा होईल. हा नारळ मुलाच्या बारशाला फोडून सर्वांनी प्रसाद म्हणून भक्षण करावा.

          तो जमीनदार कलकत्त्याला राहत असे. तो त्या साधूच्या शोधात होताच. त्याला झालेला मुलगा एक वर्षाचा झाला होता. अचानक त्याची व महाराजांची गाठ पडली. म्हणाला, महाराज, आपली काय सेवा करू? महाराज म्हणाले, फक्त रामनाम घ्या. पण त्याच्या मातेला वाटे, महाराजांनी काहीतरी मोठी  मागणी करावी. तिने अतिशय आग्रह धरल्यावर, महाराज म्हणाले, ठीक आहे. आपण हरिहाट भरवू...

              हरिहाट म्हणजे, सर्व पारमार्थिक साधनांचा बाजार असतो. तिथे सर्व प्रकारच्या साधना चालू असतात. प्रवचन, कीर्तन, पूजा, पारायण, योग, ध्यान हे तर असतेच. शिवाय यज्ञ, जप, भजन, पुराणवाचन, पंचग्निसाधन, शास्त्रध्यापन, ब्रह्मकर्म, अनुष्ठान, देवतार्चन, सत्संग, गुरुसेवा, मौनसेवन, वाममार्ग तंत्रक्रिया इत्यादी चालू असते. पंडित लोकांचा योग्य सन्मान केला जातो.

        या सर्वांसाठी फार खर्च येतो. जमीनदार मोठ्या आनंदाने कबूल झाला. मोठा मांडव घातला गेला. सर्व व्यवस्था अगदी चोख ठेवली. हा.. हा .. म्हणता सात दिवस चाललेला हा समारंभ मोठ्या आनंदात, उत्साहात पार पडला. सर्व अगदी समाधान पावले. सहसा हरिहाट कोणी करत नाही.

        हरिहाट सुरू झाला तेव्हा महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यांच्यासाठी मोठे सिंहासन केले होते. त्यावर महाराज एखाद्या राजासारखी शोभून दिसत होते. अन्नदान व नामस्मरण सतत चालू आहे की नाही हे ते जातीने लक्ष घालून पाहत होते.

           आठव्या दिवशी समारंभाची सांगता करताना जमीनदाराने महाराजांची महापूजा केली. त्यांना भरजरी वस्त्रे व चांदीचे ताटात एक हजार रुपये दिले. महाराजांनी चांदीचे ताट जमीनदादाच्या आईला दिले. व रुपये पंडितांना वाटले. त्याकाळी या हरिहाट कार्यक्रमाला २५,०००  च्या वर खर्च आला होता.

           हरीहाट संपल्यावर पाच-सहा दिवस महाराज तिथे राहिले. पण दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली म्हणून, महाराजांनी बरोबरच्या बैराग्यांना अमरकंटकला जाण्याची आज्ञा केली. व एक दिवस कोणालाही न सांगता महाराज निघून गेले.

      फिरत फिरत महाराज सातपुडा पर्वतापाशी आले. नर्मदाच्या काठाकाठाने त्यांचा प्रवास सुरू होता. अंतर्मुख ते होतेच. अशातच वाटेत त्यांना घरून पळून आलेला मुलगा भेटला. तो महाराजांबरोबर राहू लागला....

            क्रमशः

 संकलन लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Tuesday, October 28, 2025

परीक्षा

 अध्यात्म तुमच्या रग्गड परीक्षा घेतं ! 


नापास करीत राहतं पुन्हा पुन्हा तुम्हाला. तोंडावर पाडतं. संकटं धाडतं. जे घडू नये वाटत असतं तेच घडवत राहतं. दूर उभं राहून तुमची गंमत पाहतं. तुमचा विश्वास ढळू देतं. तुम्हाला चुकांच्या जाणिवा झाल्या की टिपं गाळू देतं. अगदी सगळे सगळे पर्याय धुंडाळू देतं. 'एकदा केलेली चूक पुन्हा कधीही सुधारण्याची संधी मिळणे नाही, त्यामुळे पुढेही चुकत राहा, हीच तुझी वाट आता' असं सतत सांगत राहणारे अनुभव, लोक, प्रसंग धाडत राहतं. 


आणि ज्या क्षणी सगळ्या प्रकारचे सगळे झगडे थांबवून 'भगवत् शरणागती' या व्यतिरिक्त तुमच्यापाशी करण्याजोगे निराळे काहीही नाही याची तुम्हाला पूर्ण खात्री पटेल त्या क्षणी तुम्हाला चटकन् कडेवर घेतं पुन्हा. (म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही. किंचित पुसट अंतर आहे. उमगणाऱ्याला नक्की उमगेल.)


रागाने म्हणा किंवा आगाऊपणाने म्हणा, घर सोडून निघून गेलेला पोरगा जगदुनियेच्या उरफाट्या स्वभावाचा अनुभव घेऊन माघारी आला तर दारात उभी माऊली जितक्या मायेनं त्याला पोटाशी घेईल तितक्या सहज तुम्हाला अध्यात्म चटकन् जवळ घेतं.


विश्वासाचं एक डेरेदार झाड. ज्याच्याकडे पाला होता हिरवागार. फळं होती रसरशीत. देखणी फुलं होती. अगदी नक्षीदार खोड होतं. पण त्याची मूळं मातीत घट्ट नव्हती. ते एकदा उन्मळून पडल्यानंतर जेव्हा पुन्हा बीज होऊन रुजतं आणि नव्याने उगवून येतं तेव्हा त्यांची लव्हाळं होतात. आता या विश्वासाला महापूरही संपवू शकत नाहीत.


अगदीच अलीकडे एका व्यक्तीने प्रश्न केला होता की, 

"तू वाचत होतास की विष्णूसहस्रनाम रोज ? काय झालं ? झालं का तुझ्या मनासारखं ?"


सुमारे दीड वर्षापूर्वी अगदी सहज बुद्धिभेद झाला असता माझा या प्रश्नाने. अगदी सहज. पुढच्या चर्चेचीही गरज भासली नसती. पण आता ? आता मेख उमगली आहे.


मुळात विष्णूसहस्रनाम माझ्या मनासारखं व्हावं म्हणून नव्हेंच वाचायचं हे कळायलाच फार वेळ जातो. ज्याच्या मनासारखं सुरू आहे त्याच्यापेक्षा अधिक माझी काळजी कुणालाही नव्हती, नाही आणि नसेल हे लक्षात यायलाच किती तरी पायपीट करावी लागते.


देव बाटलीत कोंडलेला जादूगार नाहीये हे जितक्या लवकर उमगेल तितकं अधिक सुखकर होतं जगणं. आपल्या इच्छा आपण प्रकट कराव्या आणि त्याने त्या बिनबोभाट पूर्ण कराव्या याच्या इतकं दुसरं दुर्दैव नाही तुम्हाला सांगतो. राजाने 'बोल तुला काय देऊ' विचारावं आणि घोडेस्वाराने तो राजा आहे हे ठाऊक नसल्यानं त्याच्याकडे चिमुटभर तंबाखू मागावा इतकी आपली इच्छा, आकांक्षा, मनोरथ याविषयीची बुद्धी खुजी असते.


हे सगळं तुम्हाला पाठीत दणके घालून समजावत राहतं अध्यात्म. कळत नाही, वळत नाही तोवर गुडघे फुटतील, पाय ठेचकाळतील अशा वाटेवर चालवीत राहतं. ईर्षा, राग, प्रचंड मोठे मानसिक आघात या सगळ्यांनी पोळून काढतं. आणि मग विचारतं की आता बोल बाळा, काय शिकलास ?

तुमचं उत्तर कालच्या तुमच्या धड्यानंतरही तेच असेल तर तुम्हाला तोच धडा पुन्हा देतं. देत राहतं. उत्तर बदललं, पुढच्या धड्याचा बोध कळेल इतपत तयारी झाली की पुढचा प्रवास सुरू. अर्थात् हा प्रवास, ज्याचा त्याचा अगदीच निरनिराळा असतो. माझा हा असा आहे. पण एक गोष्ट अगदी सगळीकडे सारखी दिसते की...


🌸 *अध्यात्म तुमच्या रग्गड परीक्षा घेतं* 🌸

Monday, October 27, 2025

आयुष्य

 *भज गोविन्दं...*

The Essence of Vedanta

(श्री आद्यशंकराचार्यकृत) 



*यावद्वित्तोपार्जनसक्त:*

*स्तावन्निजपरिवारो रक्तः ।*

*पश्चाज्जीवति जर्जरदेहे*

*वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ॥*

*॥३॥*


भज गोविन्दं... भज गोविन्दं... 

गोविन्दं भज मूढमते... 



“अरे ! जोपर्यंत तू धन कमावतो आहेस, तोपर्यंतच तुझ्या कुटुंबातील लोक तुझ्यावर प्रेम करतील; तुझ्या पुढेमागे धावतील. पण म्हातारपणाने देह जर्जर झाल्यावर मात्र तुला कोणीही विचारणार नाही."


卐卐卐


*-----------------------------*


माणसाचं *आयुष्य* कमळाच्या पानावरच्या थरथरणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगुर, अस्थिर तर आहेच पण अनेक व्याधी समस्यांनीही ग्रासलेले आहे. मात्र मनुष्य भयापोटी ह्या वास्तवाकडे जाणून बुजून काणाडोळा करतो.

 ते विसरण्यासाठी तो अहंकाराचा एक भ्रामक बुडबुडा तयार करून त्यात आपले शारीरिक सौंदर्य, पैसा अडका, मानमरातब, कुटुंब, मित्रपरिवार, यांच्या आधाराने राहणे पसंत करतो. स्वतःची समजूत काढत राहतो, की आज माझ्याकडे जे काही आहे ते कायम माझेच असणार आहे. पण खरे तर कुटुंबाचे, मित्रांचे, प्रेम, मान कुठपर्यंत? 


माणूस जोवर कमावता आहे, हिंडता फिरता आहे, त्याचा काही तरी उपयोग आहे, तोपर्यंतच. 


*म्हातारपणी* जर गाठीला पैसा नसेल,हातपाय चालेनासे झाले, अंथरुणाला खिळला, तर घरादाराला त्याचे ओझेच व्हायला लागते. समाजात मान नाही, घरात कोणी विचारत नाही, अशी त्याची केविलवाणी अवस्था होते.



*'माझे कुटुंब म्हणजेच माझे जग'* आणि *'माझ्या घराच्या चार भिंती म्हणजेच माझा स्वर्ग'* यालाच 'जीवन ऐसे नाव ' अशाप्रकारे जगणाऱ्या समस्त मनुष्यजातीला आचार्य येथे जीवनातील वास्तविक कटुसत्याची जाणीव करून देत आहेत.



*'घर'* उभे रहावे म्हणून प्रत्येक मनुष्य आयुष्यभर काबाडकष्ट करत राहतो.द्रव्य कमावित राहतो. पत्नी, मुले-मुली यांच्यासाठीच जगत राहतो. आणि पाहता पाहता आयुष्याची संध्याकाळ समोर येऊन उभी राहते. वार्धक्याने देहाची,मनाची आणि पर्यायाने द्रव्यसंचयाची 'दमछाक' झालेली असते. मग हाच कुटुंबाचा कर्ता-करविता 'म्हातारा' होऊन घरातील अडथळा बनून राहतो.


जीवनातील हे विदारक सत्य आहे. यामध्ये कुटुंबाचाही दोष नाही. हा निसर्गक्रम आहे. जीवनातील ही वास्तव परिस्थिती आहे. याचं वास्तवतेचे नेमके वर्णन संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या मार्मिक अभंगातून केले आहे. समस्त पुरुषजातीला सावधान करताना संत तुकाराम महाराज म्हणतात,


धनवंतालागी ।

सर्व मान्यता आहे जगीं ॥

माता पिता बंधुजन ।

सर्व मानिती वचन ॥


ज्याच्याजवळ पैसा आहे, तो जगद्मान्य असतो. आई-वडील, बहीण-भाऊ सगळे त्याचे ऐकतात. त्याचा धंदा जोपर्यंत जोरात चालतो, तोपर्यंत बहीण त्याला दादा म्हणते, पत्नी त्याला मान देते, त्याच्या आज्ञेत राहते.तुकाराम महाराज म्हणतात, पैशापायी घडणारे हे भाग्यबंधन नाशवंत आहे; हे जाणून घ्या.



या वास्तव परिस्थितीवरही मात करता येते, ह्याचे प्रत्यंतर *'छांदोग्य'* उपनिषदात आहे -



'न अस्य जरया एतद् जीर्यति न वधेन अस्य हन्यत एतद् सत्यं ब्रह्मपुरं अस्मिन् कामाः समाहिता एष आत्मा'॥


‘शरीर वृद्ध झाले तरी हृदयाकाशांतील ब्रह्म वृद्ध होत नाही. शरीराच्या वधाने त्याला मरण येत नाही. हृदयाकाश हे खरे ब्रह्मपुर आहे. याच्यामध्ये सर्व कामना स्थिर होतात. हाच आत्मा आहे.'


तात्पर्य - आत्म्याचे ज्ञान हेच मायावी संसारातून तरून जाण्याचा सोपा उपाय आहे. आणि या आत्मज्ञानाची गुरुकिल्ली म्हणजे, 

*'भज गोविन्दम् ।’*



_यावद्वित्तोपार्जनसक्त:_

_स्तावन्निजपरिवारो रक्तः ।_

_पश्चाज्जीवति जर्जरदेहे_

_वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ॥_


_भज गोविन्दं... भज गोविन्दं..._

_गोविन्दं भज मूढमते..._


_卐卐卐_


*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

Sunday, October 26, 2025

एकादशी व चातुर्मास

 *॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥* 


*॥ जय हरी विठ्ठल॥*


*देवशयनी एकादशी व चातुर्मास* - *( बुधवार दि. १७ जुलै २०२४ ते बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०२४ )*


येत्या बुधवारी - १७ जुलै २०२४ रोजी *देवशयनी एकादशी* आहे. हिला *आषाढी* एकादशी वा *पद्मनाभा* एकादशी असे सुद्धा संबोधतात. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी, आपण मोठ्या एकादशी म्हणून जवळपास सर्वच जण उपवास करतो. पंढरपूरची वारी / यात्रा ह्याच दिवशी असते.


आषाढ शुद्ध एकादशी अथवा आषाढ पौर्णिमा पासून कार्तिकी एकादशी अथवा कार्तिकी पौर्णिमे पर्यंत होणाऱ्या चार मासाच्या काळास *"चातुर्मास"* असे म्हणतात. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस *'देवशयनी एकादशी'* म्हटले आहे. कारण त्या दिवशी श्री विष्णू भगवान  योगनिद्रेत जातात, अशी समजूत आहे.

कार्तिकी एकादशीस श्री विष्णू भगवान योगनिद्रेतून उठतात; म्हणून तिला *'प्रबोधिनी'* (बोधिनी देवोत्थानी) एकादशी असे म्हणतात. वस्तुतः दक्षिणायन हे सहा मासांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण प्रबोधिनी एकादशी पर्यंत ४ मास पुरे होतात. याचा अर्थ असा की, एक तृतियांश रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. नवसृष्टिनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्री विष्णू निष्क्रिय असतो, म्हणून चातुर्मासास विष्णूशयन म्हटले जाते. ह्या काळात सृष्टीचे संचालन श्री महादेव करतात. 


श्री विष्णूंच्या ह्या निद्राकाळात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असूरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे. आपण सर्व ह्या देवशयनी एकादशी पासून ते प्रबोधिनी एकादशी पर्यंत जास्तीत जास्त *श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण* करण्याचे व्रत करू या. ४ च्या पटीत रोज आवर्तने करुन कार्तिकी एकादशी पर्यंत जास्तीत जास्त श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करावे


🌹 *आषाढी एकादशी* 🌹


*देवशयनी एकादशी कथा*


युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा.'

श्रीकृष्ण म्हणाले, 'हे पृथ्वीचे पालन करणार्‍या राजा, जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली, तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो.'

नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?'

ब्रह्मदेव म्हणाले, 'कलियुग आवडणार्‍या मुनीश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. ह्रषीकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे.

आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो.

पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधीव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली.

एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले.

तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, 'राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला 'नारा' असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते.

'हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.'

राजा म्हणाला, 'प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचारामुळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.'

राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणार्‍या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिराऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय, असे वाटत होते.

त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला.

त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगाविषयी कुशल विचारले.

राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले.

मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, 'मुनि श्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायांपाशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा.

अंगिरा ऋषी म्हणाला, 'राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मणधर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे. असे असता, राजा, तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. करु नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाहीत. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल.'

राजा म्हणाला, 'तपश्चर्या करणार्‍या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा.

ऋषी म्हणाला, 'राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.'मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले.

राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. ह्रुषीकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले.

याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो.

॥याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

Saturday, October 25, 2025

नामाचा पाठ

 जाणीव नेणीव भगवंती नाहीं ।

हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥

नारायणहरी उच्चार नामाचा ।

तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥

तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।

तें जीव जंतूंसी केंवि कळे ।

ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥३॥

अर्थ:-

हा हुशार हा अनाडी हे भगवंत जाणत नाही.तो फक्त कोण सतत नामजप करते तेच पाहतो.व त्याला मोक्ष देतो.ज्याने नारायण हरि ही नामे जपली त्याला कळीकाळाची फिकिर करण्याचे कारण नाही. जो सतत नाम घेतो तो प्रमाणभूत होतो. ज्या हरिचे वर्णन वेदांना करता आले नाही ते जीवजंतुना कसे समजणार? सतत नारायण नामाचा पाठ केला तर सर्वत्र वैकुंठ निर्माण झाले आहे असे दिसते. असे माऊली सांगतात.



Friday, October 24, 2025

वियोग

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*वियोगाचे दु:ख सुनेसारखे असावे*


       *श्रीमहाराज नेहमी म्हणत की जो माझा झाला त्याने दु:खीकष्टी असू नये नेहमी आनंदात व समाधानात असावे. त्यावर एकदा एका बाईने म्हटले की , " प्रपंचातले हानीचे आणि वियोगाचे काही प्रसंग इतके दारूण असतात की तेव्हा दु:ख केल्याशिवाय राहवतच नाही. मग काय करावे? " त्यावर श्रीमहाराज म्हणाले, " माय , एखादी खाष्ट बाई मेली म्हणजे तिची मुलगीही रडते आणि सूनही रडते. यापुढे आता आपल्याला माहेर कायमचे अंतरले ही धार मुलीच्या रडण्याला असते, तर आता आपल्याला स्वतंत्रपणा लाभेल या जाणिवेची झालर सुनेच्या रडण्याला रहाते. प्रपंचातील नातीगोती , सुखदुःखे , संयोग - वियोग हे पूर्वकर्मानुसार येणारे असून अटळ आहेत आणि तितकेच तात्पुरते आहेत ही जाणीव ज्याला आहे तो त्याचे दु:ख बेतास बातच मानील. ही जाणीव नामस्मरणाने येते आणि दृढ होत जाते; म्हणून सर्वांनी मनापासून नाम घेत जावे. "*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

Wednesday, October 22, 2025

आनंदाचा डबा

 "आनंदाचा डबा"

खरच आनंद चमचा भर मिळूं शकतो ?? मला पडलेला प्रश्न आणि त्याच उत्तर ही मला थोडे दिवसातच मिळालं. त्याच अस झालं माझी मैत्रिण होती राणी नावाची दिसायला छान. खूप हुषार !!प्रत्येक गोष्ट जीव तोडून करणार. तिच्यावर काम सोपवल की सगळी जण निश्चिंत असायची. तिच्या बँकेमधली. मग तीला वाटे जे काम करत ना त्याच्याच गळी सगळ पडत. त्या मुळे आजकाल ती कंप्लेंट बॉक्स झाली होती. एकदिवस सकाळीं आम्ही मैत्रिणी एकीच्या घरी अशीच सुट्टी होती म्हणून गेलो होतो. ती मैत्रीण पोळ्या करत होती.  राणी ने लगेचच तिच्या कंप्लेंट करण चालु केल. माझ्याकडे येताना कसे रिक्षा वाल्या कडे सुटे पैसे नव्हते. कशी सकाळीं ऊठुन वादा वादी सुरू झाली. एक काम धड होईल तर शपथ.!! सगळी कडे नेहेमी मलाच लक्ष द्याव लागत. घरी काय किंवा दारी काय ?? बँकेत  सुद्धा माझ्यावरच सगळी जबाबदारी.!! कंटाळा आलाय सगळ्याचाच . राणी वैतागून बोलली...

प्रिया म्हणाली तुझ्या बाबतीतच असं कसं होतं गं??? एकही घटना तुझ्या बाबतीत चांगली नाही घडत. ?? तू म्हणतेस तुझ्यावर बँक जबाबदारी टाकते पण तुला एकटीलाच तर प्रमोशन मिळालं ना ?? आणि अग खरच सकाळीं सकाळीं नसतील रिक्षा वाल्या कडे सुटे पैसे ?? त्याच्या दृष्टीने ही विचार कर ना .चल आज तुझ्या बाबतीत मी चांगली घटना घडवते. असं म्हणून तिने तव्यावरची गरम गरम पोळी काढली त्याच्यावर साजूक तूप टाकलं आणि तिला म्हणाली घे. तव्यावरून थेट ताटात येणारी पोळी आणि त्यावर घरच साजूक तूप म्हणजे परमानंद असतो. असं बोलून  ताटामध्ये तव्यावरची पोळी काढून वाढली. पोळीवर चमच्याने तूप सोडताना म्हणाली हा घे तुझ्यासाठी चमचाभर आनंद!!!! 

मायेने आपलं असं कोणी खायला वाढणं म्हणजे एखाद्या संसारी बाईसाठी खरंच खूप मोठ्या आनंदाची गोष्ट असते, राणीच्या मनात आलं....

प्रियाच्या घरून निघाल्यापासून राणीच विचार चक्र चालू झालं. तिला पटलं की ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे सारखं कुरकुर करणं. आणि तिच्या डोक्यात 'चमचाभर आनंद' सहज उच्चारलेले शब्द  घोळायला लागले. तिने मनातल्या मनात एक निर्णय घेऊन टाकला. रात्रीचे जेवण सुरू होतं. आई आज तू चक्क भात नाही खातेस. राणीचं भातावरच प्रेम सगळ्यांना माहिती होतं? राणीच्या नवऱ्याने तिला विचारलं खरंच की ??आई तुला कमी पडतोय का भात? माझ्यातला घे .असं तिचा मुलगा तिला म्हणाला. आणि स्वतःच्या ताटातला तीला द्यायला लागला.तुम्ही सारखी माझ्या भात खाण्यावर  चिडवताना ???म्हणून मी आज भातावर कंट्रोल करणार आहे. असं राणीने खोटं सांगितलं. जेवणाची आवर आवर झाल्यावर राणीने एक रिकामा डबा काढला. सकाळी प्रिया कडे  गरमागरम तूप पोळी खायला मिळाली त्याचा हा चमचाभर आनंद .असं म्हणून एक लहानसा चमचा भरून तांदूळ तीने त्या डब्यात घातले. आणि हा चमचाभर आनंद आपल्या मुलाने स्वतःच्या ताटातला भात आपल्याला द्यायची तयारी दाखवली त्याचा. आज दोन चमचे तरी डब्यात आनंद जमा झाला आहे. मनातून खुश होत राणी म्हणाली. त्या डब्याला तिने नाव दिलं 'आनंदाचा डबा.' जेवताना दोन-तीन दिवस राणीला जरा कठीणच गेलं, भाताशिवाय .कारण वाटीभर तांदूळ जमा झाल्याशिवाय भात खायचाच नाही असं तीने ठाम निर्णय घेतला होता. आणि त्यामुळे दिवसभरात आपल्या दृष्टीने काय चांगलं घडलं हे शोधायचा नादच लागला तिला. आज भाजी घेऊन घरी पोहोचते ना पोहोचते तोच लाईट गेले. राणीची चिडचिड व्हायला लागली. 

पण नंतर तिच्याच लक्षात आलं की लिफ्ट मध्ये असताना लाईट गेले असते तर?? दोन दिवसापूर्वीच बिल्डिंगचा जनरेटर खराब झालाय तो अजूनही दुरुस्त झाला नाहीये .किंवा आधीच लाईट गेले असते तर,?? हातातल्या भाजीच्या पिशव्या घेऊन सहा मजले चढून यावं लागलं असतं. बरं झालं!! घरी आल्यावर लाईट गेले. लगेच एक चमचा आनंद डब्यात जमा  केला.

आज बँकेत जास्तीचं काम असल्यामुळे तिला घरी यायला उशीर झाला. तर तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी चहा रेडी ठेवला होता. एक चमचा आनंद लगेच डब्यात जमा झाला.

रात्री आयत्यावेळी मुलीने शाळेतल्या सायन्स प्रोजेक्ट बद्दल सांगितलं. नवरा ऑफिसच्या कॉल वर होता . त्याची काहीच मदत झाली नाही. पण दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर मुलीचा चेहरा किती फुलला होता !!!अख्ख्या वर्गासमोर तिच्या प्रोजेक्टच कौतुक केलं होतं बाईंनी .तिने खुशीने मारलेली मिठी आणि 'आई !!तू किती ग्रेट आहेस ' अशी कॉम्प्लिमेंट देऊन घेतलेला पापा हा अमूल्य आहे. एक चमचा आनंद जमा. 

अशा एकेक गोष्टींनी आनंदाचा डबा भरत चालला होता. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काय चांगलं घडलंय हे शोधायचा नादच लागला राणीला. दिवसेंदिवस ती जास्त आनंदी आणि प्रसन्न दिसायला लागली. तिच्या स्वभावातला हा बदल सगळ्यांना जाणवत होता .तिचा सहवास आताबँकेत असलेल्या  मैत्रिणी, सहकारी , नवरा, मुलगी, मुलगा, शेजारीपाजारी असा सगळ्यांना हवा हवासा  वाटायला लागला...

आज बरेच दिवसांनी प्रिया राणीच्या घरी आली तर राणी  भांडी घासत होती, आणि चक्क गाणं गुणगुणत होती. प्रिया म्हणाली काय !आज बाईने दांडी मारली वाटतं.? मग काय तर .पण बरं झालं एका अर्थी! बाई भांडी घासते तेव्हा काही काही भांड्यांवर पावडरचा पांढरेपणा तसाच राहतो.  एरवी बँकेमुळे या गोष्टी चालून घ्याव्या 

 लागतात. आज कसं सुट्टी. छान पैकी मनासारखी चकचकीत करते भांडी. आणि चेहऱ्यावर हसू खेळवत म्हणाली. प्रिया म्हणाली ,बाईने दांडी मारली आणि तू चक्क चिडचिड न करता हसून बोलतेस ??

प्रियाला आश्चर्य वाटल्या वाचून राहिलं नाही. एव्हाना राणीची भांडी घासून झाली होती. कुकर मधला मस्त सुगंध दरवळणारा गरमागरम पुलाव तिने एका डिशमध्ये काढला. हा आनंदाचा पुलाव !!पहिल्यांदाच चाखायचा मान तुझा! त्याचं काय आहे ना, आयुष्य मला चमचा चमचा आनंद देत होतं, पण डबाभर आनंद एकदम मिळायला हवा. या हट्टापायी या चमचाभर आनंदाकडे दुर्लक्ष करत बसले. 

पण आता मात्र माझा आनंदाचा डबा भरला आहे. आणि तोच आनंद मी आज वाटत आहे .प्रियाला कळेच ना अशी काय बोलत आहे? काय भांडी घासून घासून मेंदूत पण चमचे  ,डबे, घुसले की काय,?? मला नीट सांग...... मग त्या दिवशी प्रियाच्या घरून निघाल्यापासून इथपर्यंतची सगळी कथा राणीने तिला सांगितली .असं होय!! तर, मी सांगितलेल्या या गोष्टीने तुझा कायापालट झाला... .मग मला आता याचा काय मोबदला देणार?? देणार तर!!! तुझ्या घरून सुरुवात झालेल्या चमच्याभर आनंदाचा मोबदला मी माझ्याकडचा डबाभर आनंद देऊन करणार आहे. असं म्हणून राणीने एक मोठा डबा भरून पुलाव स्वानंदी कडे सोपवला. हा माझा आनंद मी तुझ्याबरोबर आणि तुझ्या घरच्यांबरोबर शेअर करणारं .आणि यापुढेही करत राहणार..... अस म्हणून तीने तो डबा तीच्या हातात दिला. आणि एकमेकींना टाळी देत 

 दोघीजणी  हसायला लागल्या खऱ्या.

सौ. माधुरी बर्वे. ( तारापूर).

शुभभाषण

 *॥श्रीहरिः॥*


नवव्या अध्यायाची सुरवात करताना श्रीभगवंत म्हणतात, 


*-----------------------------*


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता नवमोध्यायः


*इदं तु ते गुहातमं* 

*प्रवक्ष्याम्यनसूयवे ।*

*ज्ञानं विज्ञानसहितं* 

*यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥*

*॥९.१॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय नववा राजविद्याराजगुहायोग ९.१)


*भावार्थ:- श्री भगवान म्हणाले,* 

*तू असूयारहित असल्यामुळे अत्यंत गुह्य असं हे (ब्रह्म)ज्ञान प्रपंचज्ञानासह तुला आता सांगतो. हे जाणल्यानं तू दुःखप्रद अशा संसारापासून मुक्त होशील.* 


*-----------------------------*


समाधीच्या मार्गानं *अक्षरब्रह्माचं* ज्ञान होणं ही गोष्ट सर्वसामान्य जनांना अशक्यप्राय अशी आहे. त्यामुळे या लोकांची समस्या ध्यानात घेऊन सर्व लोकांना परमेश्वराचं ज्ञान सुलभ होईल असा राजमार्ग भगवान आता दाखवतात.


यालाच *'भक्तिमार्ग'* असंही म्हणतात. हा राजमार्ग ज्ञानविज्ञानाचाच एक भाग आहे. म्हणूनच भगवंत सांगतात, 


'हे गुह्यातलं गुह्य ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो. हे ज्ञान झालं म्हणजे तू पापातून मुक्त होशील. तू मत्सररहित असल्यामुळे मी हे ज्ञान तुला सांगत आहे.'


या ठिकाणी *'अनसूयवे'* हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हे गुह्यज्ञान जाणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जो असूयारहित आहे त्यालाच हा अधिकार आहे. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं ही सोपी गोष्ट असते; परंतु दसऱ्याच्या सुखानं सुखी होणं, त्याच्या सुखात आनंदानं सहभागी होणं ही गोष्ट महाकठीण असते.


एका गरीब ब्राह्मणाला, त्याचं दारिद्र्य पाहून वनदेवता एक अक्षयपात्र देते. ते अक्षयपात्र घेऊन तो ब्राह्मण घरी येतो. त्या पात्राकडे तो पंचपक्वान्नं मागतो. त्याबरोबर त्या पात्रामध्ये पंचपक्वान्न उपस्थित होतात. ब्राह्मण कुटुंबीय आनंदानं त्याचा आस्वाद घेतात. हे दृश्य शेजारचा माणूस बघतो. त्याच्या मनात असूया निर्माण होते. त्या ब्राह्मण कुटुंबाला भोजन - सुख मिळालेलं त्या शेजाऱ्याला बघवत नाही. रात्री सारी निजानीज झाल्यावर तो शेजारी त्या पात्रांची अदलाबदल करतो. या गोष्टीचा अंत अखेर सुखदच होतो. ब्राह्मणाला त्याचं पात्र वनदेवता परत मिळवून देते. तात्पर्य असं की, कित्येकांना अशाच तऱ्हेनं शेजाऱ्याचं सुख बघवत नाही. म्हणून आपल्याला जर ही राजविद्या आत्मसात करून घ्यायची असेल तर दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हायला शिकलं पाहिजे.



*महाभारतात* अर्जुनच्या जन्मापूर्वी व्यास महर्षी पांडुराजाला भेटायला हिमालयात येतात. ते कुंती आणि पांडुराजाला एक व्रत देतात. त्या व्रताचं नाव *'शुभव्रत.'* 

एक वर्ष शुभच बोलायचं,शुभभाषण करायचं, परनिंदा करायची नाही; तसा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. त्याप्रमाणे ते दोघं त्या व्रताचं पालन करतात. 


बुद्धी-मनाला अशी सवय लागली की ती तशीच रहाते. बरोबर एका वर्षानं कुंतीला उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर अत्यंत शालीन अशा पुत्राची प्राप्ती झाली. तोच *अर्जुन!* 


परनिंदा तर सोडाच; तो स्वत: विषयीही कधी बोलायचा नाही. किंबहुना त्याच्याविषयी कुणी गौरवानं बोलायला लागलं तर तो सभेतून उठून निघून जायचा. असं असूयारहित जीवन जगता आलं तर अशुभाचा नाश होतो. मग हे गुह्य ज्ञान प्राप्त झालं की दु:ख नाहीसं होतं. 


आपण एकाकी आहोत, सारं काही

आपल्यालाच करावं लागतं आणि या जगातून आपल्याला एकट्यालाच जायचं आहे, अशासारख्या साऱ्या अशुभ कल्पनांतून मनुष्याला मुक्ती मिळते. मृत्यूची भीती नाहीशी होते. म्हणजे कुणी मरणारच नाही, असा मात्र याचा अर्थ होत नाही. तर मृत्यू अशुभ न वाटता शुभ वाटू लागतो. मृत्यू म्हणजे या जीवनरूपी खेळातला प्राणच आहे, अशातऱ्हेची व्यापक दृष्टी येते.



सद्गती प्राप्त न झालेला मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरतच राहतो. ज्याप्रमाणे भगवान बुद्धांच्या उपदेशातील पहिलं आर्यसत्य आहे - *‘दुःख.’* 


अर्थात जेव्हा शरीराला इजा होते, तेव्हा तुम्हाला दुःख होतं. तसंच कुणाशी वादविवाद झाला तर मानसिक त्रासामुळेही आपल्याला दुःख होतं. शरीर आणि मन स्वस्थ असलं तरीही वाढत्या वयाबरोबर भविष्याच्या काळजीने मनुष्य दुःखी होतो. अशा अवस्थेत नवव्या अध्यायात दुःखमुक्तीसाठी श्रीकृष्ण अर्जुनाला परम गोपनीय ज्ञान देत आहेत. 


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* 

‘हे ज्ञान प्राप्त करून तो सुख- दुःखाच्या सांसारिक चक्रातून मुक्त होईल.येथे सांसारिक मुक्तीचा अर्थ पृथ्वीवरील जीवनाच्या समाप्तीशी निगडित नाही. तर ज्या दृष्टिकोनातून पाहिल्याने त्याला जीवनात दुःख जाणवतं, ती त्याची अहंकारयुक्त दृष्टीच नाहीशी होईल.' 


या ज्ञानामुळे त्याला अशी समज, अशी विचारधारणा आणि अशी दृष्टी मिळेल, जेथून पाहिल्यावर त्याला सर्वदूर, जळीस्थळी परमेश्वरच दिसेल.मग त्यानंतर केवळ आनंदच उरेल..


*सारांश:*

*दुसऱ्याच्या सुखानं सुखी होण्याची कला अवगत झाली, जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण झाला, तरच हे गुह्यज्ञान प्राप्त होतं आणि दुःखातून मुक्ती मिळते.शुभव्रत घेणं त्यासाठी आवश्यक आहे.*



संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

Tuesday, October 21, 2025

अनुभवाला येते

 *🚩श्री  राम  जय  राम  जय  जय  राम🚩*



*देव  आणि  नाम  भिन्न  नाहीत .*


आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले, तरी आपण त्या प्रमाणे वागतो का ? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का ? हाच तर आपला दोष आहे. थोर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले, आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत ! जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो, असे जेव्हां त्यांच्या अनुभवास आले, तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरविली आणि खर्‍या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे, असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. हेच, वेदकाळापासून तो आतापर्यंत सर्व साधुसंतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे. सद्‍गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तिने आणि एकाग्रतेने घेतले, तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसे नाम घेतो का ? नामाकरिता नाम आपण घेतो का ? का मनात काही इच्छा, वासना ठेवून घेतो ? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच; नाम म्हणजे देव आणि देव म्हणजेच नाम. एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवितात, एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो. तरी तो पतंग उडविणारा म्हणतो, 'माझ्या हातात आहे पतंग.' कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला.


आपल्या नामस्मरणाला एक गोष्टीची अत्यंत जरूरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, तो पर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी वृत्ती बाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट ! परमेश्वरावाचून आपले कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा येईल ? परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले, तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच 'निष्ठेचे नाम' असे म्हणतात.


*१९५ .  भक्त ,  भगवंत  व  नाम  ही  तिन्ही  एकरूपच  आहेत .  जेथे  नाम  आहे  तेथे  भक्त  आहे ,  व  तेथेच   भगवंत  आहे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Monday, October 20, 2025

शरणांगत

 संतांच्या अंगी सद्गुरु होण्याची पात्रता आपोआप येते. सदगुरुंचे मुख्य कार्य म्हणजे त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांच्या अंतर्यामी क्रांती घडवून आणणे. माणसांची वासना दृश्यांमध्ये गुंतलेली असते. ती आंत वळवून हृदयस्थ ईश्वराच्या चरणी स्थिर करण्याचा प्रक्रियेला ईश्वरास शरण जाणे असे म्हणतात.

 ज्याच्या त्याच्या पूर्वकर्मां प्रमाणे प्रत्येक माणसाची परिस्थिती निराळी असते. परंतु परिस्थिती कशीही असू दे, शरणांगत होण्याची कला साधली की माणूस शांत तृप्त व निर्भय जीवन जगतो. साधकांच्या जीवनामध्ये ईश्वराला अथवा सद्गुरुला शरणांगत होण्याला अनन्य साधारण महत्व दिले जाते. 

त्यामुळे साधकाच्या साधनांमध्ये शरण जाण्याचा संकल्पनेला प्राथमिक स्थान असते. पण सिद्ध अवस्था भोगणाऱ्या संतांना देखील शरणागतीचा दिव्यपणा पदोपदी जाणवतो.

Sunday, October 19, 2025

ब्रह्म सत्यं

 *श्रीराम समर्थ*


*'ब्रह्मचैतन्य'चा अर्थ*


         भवानराव म्हणून गृहस्थ महाराजांकडे होता. तो गांजट होता. पण हे लोक कसे असतात, एक गुण असतो त्यांच्यामधे. तो गुण असा महाराजांशिवाय देव नाही. गुरुशिवाय देव नाही. गांजट खरा पण त्याची निष्टा काय होती. तो भवानराव रोज लाकडे फोडायचा तिथे आणि चुलीत घालायला द्यायचा. त्याचं कामच ते स्वैपाकाला लाकडं पुरवायची. त्या दिवशी काही लाकडं नव्हती, तेंव्हा एक नविन खोली बांधली होती नवीन अगदी. हे कुर्तकोटींनी  स्वतः सांगितलेलं आहे बंर का. ऐकीव नव्हे. तेंव्हा महाराज म्हणाले लाकडं नाहीत. बर म्हणाले, काढा म्हणाले वासे याचे. अहो दोन दिवसापूर्वी बांधलेली खोली सगळी लाकडं काढली, पोळपाट होते ते फोडले आणि चुलीत घातले. सगळे लोक आश्चर्य  करायला लागले, काय हे? तेंव्हा हे सांगून कुर्तकोटी  म्हणाले 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या हे आचरुन दाखवलं' म्हणाले. हे दृश्य जे आहे, काय अर्थ आहे याला, सत्य परमात्मा आहे हे आचरुन दाखवलं. आणि ते सांगून म्हणाले, काय नाव ठेवलं होतं गुरुंनी तरी, ब्रह्मचैतन्य असं नाव ठेवलं म्हणाले. याचा अर्थ असा ब्रह्म निर्गुण निराकार कोरं शांत आहे. पण ते ब्रह्म जेंव्हा अॕक्टिव्ह होतं, ते ब्रह्म जेंव्हा काम करायला लागतं, ते ब्रह्म जेंव्हा विश्र्व निर्माण करतं तेंव्हा ते चैतन्यरुपानं दिसतं ते हे आहे.


               ********* 


*संकलनःश्रीप्रसाद वामन महाजन*

Saturday, October 18, 2025

भूतविद्या

 एका साधकाने पु.श्रीरामकृष्ण परमहंस यांना विचारले भूतविद्या सुर्यलोक, चांद्रलोक नक्षत्रलोक हे काय आहे? श्रीरामकृष्ण म्हणाले इतका हिशोब कशाला? आंबे खा , आंब्याची झाड किती आहेत,  किती लाख फांद्या आहेत , किती पण आहेत हे हिशोब करण्याची गरज काय ? मी आमराईत आंबे खायला आलो आहे आंबे खाण्याशी मतलब. पुढे म्हणाले "चैतन्य जर एकदाचे जागे झालं , कोणी एखादा ईश्वराला जाणू शकला तर मग असल्या फालतू गोष्टी जाणण्याची इच्छाच होत नाही. तापात भ्रम झालेला रोगी बडबडत असतो मी पाच शेर तांदुळाचा भात खाईन, मी घडाभर पाणी पीईन वगैरे. हे ऐकून वैद्य म्हणतो " ठाऊक आहे सर्व करशील " भ्रम दूर झाल्यावर फक्त ऐकायचं असत. तो साधक म्हणाला आमचा भ्रम कायमच राहणार. श्रीरामकृष्ण म्हणाले " ईश्वराकडे मन ठेवा. चैतन्य जागेल. तो साधक म्हणाला " आमचा ईश्वराशी योग क्षणिक. 

चिलीम ओढायला लागतो तितका वेळ." श्रीरामकृष्ण म्हणाले क्षणभर योगाने सुद्धा मुक्ती लाभते." "" आहिल्या म्हणाली "रामा डुकराचा जन्म येऊ दे की  आणखी कशाचा येऊ दे, जेणेकरून तुझ्या पादपद्मी मन राहो, शुद्ध भक्ती लाभो म्हणजे झाले." मनापासून त्याच्याजवळ प्रार्थना केल्यास त्याच्याकडे मन लागते ईश्वराच्या पादपद्मि शुद्ध भक्ती उपजते.

Friday, October 17, 2025

नामस्मरण करावे

 श्रीराम समर्थ


*पूरग्रस्थांची गोंदवल्यास सोय*


         सन १९६१ साली जुलै मध्ये पुण्याला पानशेतचा पूर आला. त्यामध्ये पुष्कळ कुटूंबे निराधार झाली. त्यात काही श्रीमहाराजांची अनुग्रहीत मंडळी होती. त्यांचा समाचार घेण्यासाठी श्रीमहाराज मुद्दाम पुण्यास आले होते. [वाणी अवतारात] त्यावेळी श्रीगोंदवले देवस्थानचे ट्रस्टी श्री कर्वे श्रीमहाराजांना भेटले. श्रीमहाराज त्यांना म्हणालेः


         *'गोपाळराव, ही जी पुण्यावर आपत्ती आली आहे ती दैवी आपत्ती आहे. त्यात कोठल्याही मानवाचा दोष अगर अपराध नाही. अशा दैवी आपत्तीने जी कुटूंबे निराधार व निराश्रित झाली असतील त्यांना टाहो फोडून सांगा की त्या सर्वांनी गोंदवल्यास येऊन राहावे. त्या सर्वांची आश्रयाची वा अन्नवस्त्रांची सोय जरुर करण्यात येईल. श्रीगोंदवल्यास जाण्यास द्रव्य सहाय्यही देण्यात येईल. त्यांनी फक्त श्रीगोंदवल्यास काय जाडेभरडे अन्न मिळेल त्यावर उपजिवीका करुन घ्यावी. व गोंदवल्यास राहिलेल्या काळात त्यांनी होईल तितके नामस्मरण करावे. हे सर्व तूम्ही अगदी माझा निरोप म्हणून टाहो फोडून सांगा. अशा आपत्ती मध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर त्या मंदिराचे कामच काय?*


         जेवढे लोक जातील ती माहिती मला कळवावी म्हणजे त्यांची व्यवस्था नीट लागते की नाही याची जिम्मेदारी माझ्यावर राहील. 


               *********

संदर्भः श्री बापूसाहेब मराठे यांचे हस्तलिखित

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Thursday, October 16, 2025

अन्नपूर्णेचे महत्त्व....

 अन्नपूर्णेचे महत्त्व........


🙏🕉️🙏


 अन्नपूर्णा या देवतेला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विशेषतः मी दत्तसंप्रदायात असल्यामुळे जेव्हा श्रीदत्ताला नैवेद्य दाखवला जातो ,त्यानंतर लगेच अन्नपूर्णेलाही दाखवला जातो. मला हे नेहमी कोडं पडायचे की अन्नपूर्णेला एवढे महत्त्व का दिले जाते.शेवटी मी अन्नपूर्णे संबंधी जेवढी माहिती मिळेल ती सर्व मिळवण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी शंकर पार्वतीची कथा प्रसिद्ध आहे. अन्नाचे एवढे महत्त्व श्री शंकराला ही मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपुर्णाच. तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहा:कार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्रीशंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले आणि ते स्वतः कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागायला आले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे.


               जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्त प्राणीमात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत. अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते. अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते .म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. ते अन्न सुग्रास असले पाहिजे. अन्न  बनवणाऱ्याची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. त्यांनी ते अन्न समाधानानी बनवले असले पाहिजे. तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अन्नाची चव वेगवेगळी असते. याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते. म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे. तिने शुचिर्भूत होऊन अन्न शिजवले पाहिजे.आपल्याकडे मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती त्यासाठीच दिली जाते. तिने अन्नपूर्णेची सेवा , उपासना करून, उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते.


               मध्यंतरीच्या काळामध्ये मी मुद्दाम अन्नपूर्णेची उपासना केली आणि मग लक्षात आले की नुसती उपासना उपयोगी नाही .तिची प्रत्यक्ष सेवा केली पाहिजे. म्हणून मी स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आणि कोणताही पूर्वानुभव नसताना सुद्धा ह्या सर्व पाककृती अतिशय छान सराईतासारख्या केल्या गेल्या.जणू अन्नपूर्णादेवीच माझ्या हातातून काम करत होती.

            

               आपल्या अनेक वासना या अन्नाद्वारे पूर्ण होत असतात .मी पुष्कळ संन्याशीहि असे पाहिले आहेत की ज्यांच्या वासना अन्नात अडकून बसलेल्या असतात. खाण्याच्या अनेक इच्छा अपूर्ण असतात. शरीर आहे तिथे वासना असणारच. त्या पूर्ण झाल्याशिवाय संपत नाहीत. मित्रमंडळ जमा करून चिवड्याचा ढीगच्या ढीग फस्त करताना कसा आनंद मिळतो हे अनेकांनी अनुभवले असेल. शेवटी जीवन हे आनंद निर्मिती साठीच आहे .छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप आनंद भरला आहे, परंतु आपल्याला त्याची कल्पनाच नसल्यामुळे तो आनंद आपण घेत नाही.


               अन्नामुळे शरीरात चैतन्य उत्पन्न होते .अगदी शरीर सोडल्यानंतर सुद्धा या चैतन्याची आवश्यकता लिंग देहाला असते. उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते. शुचिर्भूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे. त्या अन्नात प्रेम असते. म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते. केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो.म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते .उत्तम संसार करून सर्व प्रकारच्या वासना भोगून पूर्ण केल्या पाहिजेत. तेव्हाच माणूस परमेश्वर चिंतनाकडे वळू शकतो. असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही. आपले सर्व ऋषी-मुनी हे विवाहित दाखवले आहेत आणि सर्व प्रकारचे भोग भोगून वासनाक्षय करूनच ते पूर्णत्वाला पोहोचले आहेत. 

म्हणूनच शंकराचार्य 

म्हणतात--

'अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राण वल्लभे।

ज्ञान वैराग्य सिध्यर्थं

भिक्षांदैहि च पार्वती।।

 शतशः अभर ..... श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत मध्ये सुद्धा याचा उल्लेख केला आहे ..... 


🕉️ श्री गुरुदेव दत्त

Wednesday, October 15, 2025

नाम सत

 नामाच्या बाबतीत त्याच्या खरेपणाची जाणीव कां होत नाही ? आपण स्थळ, काळ आणि निमित्त किंवा कार्यकारणभाव ह्या तीन बंधनात वावरतो. नाम हे त्याच्या पलीकडे आहे. नाम घेताना काळाचा विसर पडणे ही पहिली पायरी. नामाला बसला की की बसला कितीवेळ नाम चाललं आहे याचं भानच राहणार नाही. 

दुसरी पायरी स्थळाचा विसर पडणे. या दोन्हीही पायऱ्या साधणे एकवेळ शक्य आहे पण तिसरा कार्यकारणभाव नाहीसा होणे कठीण आहे. मी नाम घेतो, त्यातून अमुक व्हावे, समाधान मिळावे, ज्ञान व्हावे असे काहीतरी राहतेच. नाम घेण्याला काही कारण नाही असे होत नाही.  विचार केला तर माझ्या "असण्याला" काही कारण नाही. मी आहे म्हणजे आहे. त्याला दुसरे कारण नाही. माझे असणे सिद्ध करायला दुसऱ्या कशाची जरुरी नाही. मी का जगतो प्रश्न निराळा. त्याचे काहीतरी उत्तर मिळेल.

 पण मी का आहे याला उत्तर नाही. तसे नाम केवळ आहे. माझे असणेपण जसे मला जाणवते तसे नामाचे असणेपण जाणवणे, म्हणजेच नामाचे नसणेपण कधीही नसणे ही नामाची वास्तव्यता, सत्यता आहे. मी जसा जिवंत आहे तसं नाम जिवंत आहे. ते सत आहे तसेच ते चितही आहे. हा नामाचा वेगळा चैतन्यमय पैलू आहे. नाम सत आणि चित आणि तसेच ते आनंदमय ही आहे. आनंदाशिवाय  त्यात काही नाहीच.

Tuesday, October 14, 2025

समाधान

 *कर्म तर करायला पाहिजे पण त्याला काहीतरी फळ पाहिजे ना ? फळ नसेल तर कर्म कोण करील.*


उदा. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले एक माणूस प्रवासाला जायचे म्हणून स्टेशन वरती गेला. आणि तेथील तिकीट कारकूनाला म्हणाला " मला तिकीट दे" तो म्हणेल "अहो कोणत्या गावाचे तिकीट हवे ?" तो म्हणाला "नाही मला तिकीट दे" कारकून म्हणाला "अरे तुला ज्या गावाला जायचे आहे त्या गावचे नाव सांग मग मी तिकीट देतो" तसे कर्म करताना मी कशा करता कर्म करतोय ? फळ नसेल तर मग त्या कर्माला दिशाच नाही. प्रत्येक कृतीला कर्माला काहीतरी फळ आहे. त्याशिवाय कर्म नाही. 

हे जर आहे तर मग आपण जे कर्म करणार त्याचे फळ असलेच पाहिजे. ते फळ आपल्या हातात आहे का ? उदा.साध कचेरीतुन दुसऱ्या ठिकाणी बदली झाली तरी ती बदलण्याचे आपल्या हातात नाही. तुम्ही उत्तम नोकरी करत आहात. पण तेवढ्यात तुमच्या डोक्यावर खालचा कुणीतरी  माणूस आणून बसवतो ना  मालक. काय फळाचा अधिकार आहे आपल्या हातात. काही नाही. मग जर कर्तेपण माझ्या हातात नाही तर त्या कर्माचे फळ माझ्या हातात कसे असेल. तर देणारा जो माझा गुरू आहे तर त्या कर्माचे फळ तो देईल. मग कर्माचा मुक्काम कसा आहे तर कर्मतर झालंच पाहिजे, कर्म करताना सर्वस्वी मी कर्ता नाही ही भावना पाहिजे आणि कर्म केल्यावर जे फळ मिळेल त्यात समाधान पाहिजे.


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*

Monday, October 13, 2025

सीमा

 *श्रीराम समर्थ*


*भक्तपणाची सीमा*


         देहाच्या व मनाच्या प्रतेक हालचालीमधें भगवंताची संगत न सुटणे यामधें भक्तपणाची सीमा गांठली जातें. आपल्या जीवनांत फक्त एक भगवंतच कर्ता आहे अशा संपूर्ण श्रद्धेनें भक्त जीवनांत वावरतो. अशा भक्ताच्या प्रापंचिक इच्छा नामषेश होतात. कारण जें घडलें तें, जें घडणार तें आणि जें घडत आहे तें भगवंताच्या इच्छेनें घडतें असें त्याला मनापासून वाटतें. अशा भक्ताच्या अंतरी जे उमटतें त्याचें प्रतिबिंब भगवंतामधें पडतें. भक्त जी भावना करतो भगवंत तिचा स्वीकार करतो. आपल्या बरोबर भगवंत आहे ही भावना ठेवणाऱ्या भक्ता बरोबर राहिल्याशिवाय भगवंताला चैन पडत नाही. भक्त म्हणतो 'भगवंता! तूं माझा स्वामी आहेस. तूं जें करशील तें योग्यच करशील. त्यावर मी विचार करणार नाही. मी तुझा आहे येवढें मी जाणतो. तू जेथें नेशील तेथें मी आनंदानें जाईन. हे जग काय आहे? मी येथें कां आलो ? ते तू पहा. तू मला वापरशील तसे वागणे, तू मला ठेवशील तसें राहणें हेंच माझें परम भाग्य आहे. तुझे सानिध्य हेंच ध्येय, तुझे प्रेम हाच माझा मोक्ष, तुझे नामस्मरण हीच माझी साधना आणि तुझ्या हजेरीत मरण हेंच माझें मागणे आहे.' भक्त म्हणजे अशी भगवंताला वाहिलेली, भगवंताच्या अनुसंधानांत मुरलेली, भगवंताच्या स्मरणांत धुंद झालेली, भगवंतानें व्यापलेली, वासना मेलेली, अहंकार किंवा कर्तेपण जळलेली व भूतमात्रांशी विनम्र झालेली व्यक्ति होय. स्वतःमधें आपण नसून भगवंतच आहे हा साक्षात् अनुभव येणें ही भक्तीची सीमा आहे. अशा भक्ताच्या अंतःकरणांत निरंतर अनिवार भगवत्-स्फूर्ति चमकते. तो देहानें माणूस दिसला तरी आंतमधें भगवत्स्वरूप म्हणजेच ज्ञानस्वरूप असतो. 

ही दिव्य अवस्था भगवंताच्या अनुसंधानानें प्राप्त होते. गुरूनें दिलेल्या नामाच्या अजपाजपानें भगवंताच्या दर्शनास रोखणारे सारे प्रतिबंध वितळून जातात. भक्त भगवंतापाशीं समरस होतो. भक्त आणि भगवंत यांचे भक्ताच्या हृदयांत मधुर मीलन होतें. पण एक होऊनही दोघे दोनपणानें दिसतात. दिसायला दोन दिसूनही दोघे एकच असतात. भक्त ज्ञानाचा सागर होतो पण त्याच बरोबर भक्तीचें मंदिर - चालतेंबोलतें मंदिर - बनतो. ही ज्ञानोत्तर भक्ति भक्तांच्या जीवानातील मोठें रम्य असे गूढ आहे. या अवस्थेत नामाचें रूपांतर अनाहत नादांत होतें. त्या नादाच्या धुंदीमधें भक्त सतत भगवंताचा आस्वाद घेतो.

         ---------प्रा के वि बेलसरे


               *********


संदर्भः भगवंताचें अनुसंधान साधनेचा प्राण हे त्यांचेच पुस्तक पान ५९-६०-६१


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

Sunday, October 12, 2025

संतांची परीक्षा

 🌿🌹🌿 ll श्रीराम समर्थ ll 🌿🌹🌿


श्रीमहाराज इंदूर मध्ये होते. तेव्हा इंदूर च्या इनामदारांच्या विनंतीला मान देऊन ते त्यांच्या बागेत राहण्यास गेले. त्यांची पत्नी जिजीबाई विलक्षण बाई होती; सर्व तिला वचकून राहत. तिने नवऱ्याला अशा बैराग्याला घरी आणल्याबद्दल दटावले आणि महाराजांची परीक्षा करण्याचा बेत केला. 


महाराज आल्यावर एक दोन दिवसांनी तिने महाराजांसाठी तिखटाचे सहा गोळे केले आणि ते लाडू म्हणून नेले. महाराजांनी हसत तिच्याकडून मागून एक एक गोळा घेतला व ते सर्व गोळे लाडवा प्रमाणेच खाऊन टाकले. अजून मागू लागले! तिचे कपट लक्षात येऊनही हा महात्मा काहीही बोलला नाही! कपटी माणसाचे मन अत्यंत हीन पातळीला जाऊ शकते. तिने दुसऱ्या दिवशी महाराजांच्या पुढ्यात भाजलेले निखारे परातीत घालून ठेवले. आता हे देखील जेव्हा महाराजांनी सहज खाऊन टाकले तेव्हा मात्र ती घाबरली. निखारे पचवणारा सिद्ध पुरुष आता आपल्याला सोडणार नाही असे तिला वाटले. 


त्यावेळी अकारण करुणाकर महाराजांच्या विशाल हृदयाची तिला काय कल्पना! तिने महाराजांचे पाय धरले. तर महाराज म्हणतात- "बाळ, कोण मनुष्य कसा आहे, आपल्याला कळत नाही. म्हणून अशा रीतीने कुणाची परीक्षा करू नये. संतांची परीक्षा निराळ्या पद्धतीने करावयाची असते. तरी पण झाले गेले विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करण्यास आरंभ कर. राम तुझे कल्याण करील हे निश्चित समज!"


*🙏🏻 ॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥ 🙏🏻*

ज्ञानाची व्याख्या

 ज्ञानाची व्याख्या काय ? ज्ञान म्हणजे अनेक तऱ्हेचे विश्वास पण ते विश्वास सत्य आहेत, वास्तुतिथी आहे हे जेव्हा पटते तेव्हा ते ज्ञान होतं. नाहीतर नुसता विश्वास राहतो. ते ज्ञान पटलं की त्याची श्रद्धा होते. श्रद्धा याचा अर्थ सत्याची धारणा सत आणि धा, विश्वासाला ज्ञानाचं स्वरूप केव्हा येतं तर ज्या वेळेला हे खरं आहे हा विश्वास घट्ट होतो तेव्हा. 

तुम्ही आम्ही देव आहे असं म्हणतो पण तुकाराम महाराज कोणत्या अर्थाने म्हणत होते ? त्यांच्या विश्वासात जो जोर होता, त्यात जे खरेपण होतं ते आपल्यात नाही. आपण नामस्मरण इतकं करतो, तुकारांमहाराजांनी पण नामस्मरण केलं . ते म्हणतात भगवंत  नामातच आहे. आपल्याला वाटत  असेल किंवा नसेल. बर्फ जेव्हां पडत तेव्हा ते भुसभुशीत असतं पण ते जेव्हा दगडासारखं घट्ट झालं की श्रद्धा होते आणि ती जेव्हा मोडतच नाही ती निष्ठा. या तीन पायऱ्या आहेत. विश्वास कसा असतो तर आंधळा व ऐकीव असतो. तो आतून येत नाही. 

पण विश्वास जेव्हा घट्ट होतो  तो आतून येतो बाहेरून त्याला पुरावा लागत नाही ती श्रद्धा. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानं. तो आहेच नाही कसा. श्रीतुकाराम महाराजांनीं  पांडुरंगाची उपासना करताना काही दगडाचा देव आहे असं म्हणाले नाही. तो जिवंत प्रत्यक्ष आहेच असंच त्यांना वाटत होते. ते जेव्हा त्याच्याशी भांडत किंवा त्याला सांगत त्यावेळेला तो आहेच ही भावना होती. हाच फरक आहे संतांच्यामधे आणि आपल्यामधे.

Saturday, October 11, 2025

ध्येयपूर्ती साठी

 चिंतन 

             श्रीराम,

      परमार्थाचा अभ्यास करताना काळ आणि वेळेचे गणित मांडावे लागते. आपले आयुष्य किती शिल्लक राहिले ते माहित नाही. त्यात, सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्याचे आपले ध्येय आहे. मग या ध्येयपूर्ती साठी, त्याच्या अभ्यासाला लागणारा वेळ ह्याचे गणित मांडायचे म्हणजे काळ आणि वेळेचे गणित मांडणे.

                    गणिताचा अभ्यास आपल्याला आनंद देत नाही पण प्रत्येक समस्येला उत्तर असतेच ही शिकवण देतो. परमार्थाचा अभ्यास पुस्तकी नसून कृतीचा आहे. मग छोटी छोटी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मनाचा दृढ निश्चय करावा लागतो. कारण हे मनच आहे, ज्याच्यात क्षणाक्षणाला विकल्प येत रहातात आणि विकल्पाने ध्येय कोसो दूर जाते. अनेक शंकाकुशंकांनी भरलेले मन डळमळीत होत रहाते. सतत कोण काय म्हणेल अशा भीतीने भरलेले मन कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नसते. म्हणून मनातील शंकाकुशंका दूर करण्यासाठी त्यामध्ये असलेली अनामिक भीती घालवण्यासाठी योग्य मार्ग म्हणजे ईश्वर आणि संतांवर श्रद्धा ठेवणे.

                     ||श्रीराम ||

Friday, October 10, 2025

विठूमाऊली

 🌈🛕⛱️🏆


पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ

कुण्या घरचे दळण, आला दळुन विठ्ठल


पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ही साखर

पीठ हुंगले दुज्याने, म्हणे सुगंधी कापुर


कुणी शेला झटकला, पीठ उडुन जाईना

बुचकळला पाण्यात, पीठ धुऊन जाईना


झाली संचित पंढरी, वाढे राऊळी वर्दळ

ठिगळाच्या पांघरुणा, शेला म्हणती सकळ


फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ 

विठ्ठलप्रेमे भरून आले , जनी रडे घळघळ ...


      🕉️🛕🔱🪔🚩


*संत जनाबाईला दळण कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो. व चुकून तिची वाकळ घेऊन जातो,* 


*विठ्ठल ... विठ्ठल ....*

*पांडूरंग .... पांडूरंग*....

*जय विठूमाऊली ...*🛕🔱🪔🚩


*जय जय विठ्ठोब्बा रछूमाई*

*बोला विठ्ठोब्बा रखूमाई*🚩


🍁🌈🛕⛱️🍁

Thursday, October 9, 2025

भयकथा

#ती.    सत्यकथा

 

   आपल्या भाच्याना छान सांभाळणाऱ्या प्रेमाला कपड्याचा एवढं मोठं गाठोडे देऊन वाहिनीने तिला नदीला पाठवले . संध्याकाळची वेळ कसे तरी शाळेतून आल्यावर चहाचा एक  घोट तिच्या नशिबात मिळाला . भुकेने कासावीस प्रेमा कपडे धुऊ लागली.हे काम झाल्यावर थोडा तरी खाऊ मिळेल हेच विचार डोक्यात होते तिच्या.

 एक एक कपडा धुत विचारात गडलेली असतानाच शेजारी एक सुंदर स्त्री कपडे घेऊन आली दिसायला सुंदर गोरीपान,हातभार हिरव्या बांगड्या,गळ्यात ठसठसित मंगळसूत्र. केस खूप मोठे कंबरे खाली आणि कपाळावर मोठे कुंकू. तिच्या कडे काही ठराविकच कपडे धुवायला होते.बराच वेळ ती तेच कपडे धूत राहिली ,प्रेमाला कपड्याचा ढीग होता १०वर्षाची प्रेमा एवढ्याशा हाताने कपडे पिळत होती ,पुन्हा दुसरे धूत होती . त्या बाईला ती निरागसपणे बघत होती. ती बाई काही केल्या तिचे काम संपवेना ,प्रेमाने तिला तुम्ही किती वेळ कपडे धूत आहात कुठे राहता ,असे प्रश्न केले . ती काही बोलली नाही मी इथेच राहते असे जुजबी बोलून हसली . गोरीपान, सुंदर बाई तिचे हात खूपच सुंदर होते प्रेमाला आपण कपडे धुवायला आलो आहोत घरी जायचे याचा विसर पडला. 

   असेच १तास होत आला घरी जायचे म्हणून प्रेमा पाय धुवायला गेली तर ती बाई कपडे पिळत असल्यामुळे प्रेमाला  तिचे पाय दिसले .पाण्यात पाय उलटे होते . पाय बघून प्रेमा जाम घाबरली. कपड्याचा बादली घेउन तिने धूम ठोकली,आईने तिला उशिरा नदीला जायचे नाही हे बजावलेले आठवले .तिथे एक आत्मा फिरतो हे आठवले. घरी गेल्यावर तिला बोलताही येईना . तापाने फणफणली.  

   क्रमशः.                          

  अस्मिता माधव

Tuesday, October 7, 2025

नामस्मरण करा

 *नामस्मरणाचे प्रकार*


एकदा गरुडाच्या मनात आले की, मी भगवंताचे वाहन अर्थात मी जवळचा, माझ्याशिवाय भगवंत कुठे जात सुद्धा नाहीत. श्रीकृष्णाला माता रुक्मिणीनंतर मीच प्रिय. तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्त्व देतात ? अगदी त्याचा रथ सुद्धा चालवला.


एक दिवशी या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे आले, तर अर्जुन झोपला होता आणि द्रौपदी त्याच्या डोक्याला तेल मालिश करत होती. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले तरी अर्जुन उठला नाही हे पाहुन गरुडाला आणखी राग आला. पण श्रीकृष्ण हसत हसत त्याच्या डोक्याशी जाऊन बसले आणि द्रौपद्रीला बाजूला करून स्वत: त्याच्या केसाला तेल लाऊ लागले. 

आता मात्र कहर झाला या विचाराने गरुड निघणार तेव्हढ्यात श्रीकृष्णाने त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले. रागानेच गरुड बसला. त्या शांततेत त्याला "श्रीकृष्ण कृष्ण जय जय, श्रीकृष्ण कृष्ण जय जय" असा मंद आवाज ऐकू येऊ लागला. जप कुठून येतोय हे पाहता गरुडाच्या लक्षात आले, की आपण जे अर्जुनाचे केस हातात घेतलेत त्यातूनच, नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातुन नामस्मरण होत आहे आणि अर्जुनाची महती गरुडाला कळुन चुकली.     


आजच्या युगात सुद्धा संत तुकाराम, संत चोखामेळा आणि श्री ब्रम्हाचैतन्य गोंदवलेकर महाराज अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांचा परावाणीने जप होत असे. मंत्रजप हा चार वाणीने होतो.


१) वैखरी वाणी - आरती नंतर सामुदायिक जप मोठ्याने करतो तो.

२) मध्यमा - ओठ आणि जीभ याद्वारे मंत्र पुटपुटणे.

३) पश्यन्ति - जीभ ओठ न हलवता मंत्र जप करणे.

४) परा - अत्यंत उच्चपातळी वर हा जप शरीरातील रोमारोमातून, हृदयातून हा जप आपोआप होत असतो. जसे की, मृत्युनंतरही चोखामेळाच्या अस्थि जप करत होत्या.


*सतत नामस्मरण करा*


ll ओम नमः शिवाय ll

श्रद्धा

 चिंतन 

             श्रीराम,

      परमार्थाचा अभ्यास करताना काळ आणि वेळेचे गणित मांडावे लागते. आपले आयुष्य किती शिल्लक राहिले ते माहित नाही. त्यात, सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्याचे आपले ध्येय आहे. मग या ध्येयपूर्ती साठी, त्याच्या अभ्यासाला लागणारा वेळ ह्याचे गणित मांडायचे म्हणजे काळ आणि वेळेचे गणित मांडणे.

                    गणिताचा अभ्यास आपल्याला आनंद देत नाही पण प्रत्येक समस्येला उत्तर असतेच ही शिकवण देतो. परमार्थाचा अभ्यास पुस्तकी नसून कृतीचा आहे. मग छोटी छोटी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मनाचा दृढ निश्चय करावा लागतो. कारण हे मनच आहे, ज्याच्यात क्षणाक्षणाला विकल्प येत रहातात आणि विकल्पाने ध्येय कोसो दूर जाते. 

अनेक शंकाकुशंकांनी भरलेले मन डळमळीत होत रहाते. सतत कोण काय म्हणेल अशा भीतीने भरलेले मन कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नसते. म्हणून मनातील शंकाकुशंका दूर करण्यासाठी त्यामध्ये असलेली अनामिक भीती घालवण्यासाठी योग्य मार्ग म्हणजे ईश्वर आणि संतांवर श्रद्धा ठेवणे.

                     ||श्रीराम ||

Sunday, October 5, 2025

नामस्मरणाची चावी

 *बँकेचा लॉकर आणि श्रीमहाराजांची कृपा* ------


         मुलीकडे जर्मनीला व नंतर मुलाकडे कॅनडाला जाण्यासाठी विसा काढायचा होता. त्यासाठी पासपोर्ट लागणार म्हणून बँकेच्या लॉकरमधून माझा व विनयाचा पासपोर्ट आणायला गेलो आणि एकदम हा विचार मनात आला.

       येथील एका बँकेत आमचे लॉकर आहे. तिथे गेलो की जरूर त्या सह्या करून आपली चावी लॉकरला लावायची. नंतर बँकेचा मॅनेजर त्याची कॉमन चावी लॉकरला लावणार. मग तो लॉकर उघडून आपल्याला आत ठेवलेला आपला ऐवज मिळणार. मग याचा परमार्थाशी  संबंध काय ?

         परमार्थामधला अमूल्य ऐवज म्हणजे समाधान. पैसा, संपत्ती, विद्वत्ता, सामाजिक पोझिशन वगैरे तात्पुरता आनंद देतील, पण त्यांच्यामुळे समाधान मिळेलच याची खात्री नाही. खरे समाधान भगवंताच्या लॉकरमध्ये आहे. त्याच्या दोन चाव्या. एक आपल्याकडे, ती म्हणजे आपले नामस्मरण. तर दुसरी कॉमन चावी भगवंताकडे, आपल्यासाठी श्रीमहाराजांकडे. ती चावी म्हणजे त्यांची कृपा. दोन्ही चाव्या लागल्या की समाधानाचा ठेवा हाती लागतो.

          आता मी माझी बँक सोडून दुसर्‍या बँकेत किंवा माझ्याच बँकेच्या दुसर्‍या शाखेत गेलो तर मला माझा लॉकर उघडता येईल का ? तसेच ज्यांनी मला मंत्र दिला त्यांना सोडून मी दुसर्‍या गुरूंच्या किंवा साधुपुरूषाच्या नादी लागलो तर माझं काम होईल का ? तसेच माझी योग्य ती चावी, जी मला बँकेने दिली आहे ती न नेता, मी दुसरीच चावी घेऊन गेलो तर माझे लॉकर मला उघडता येईल का ? बँकेचा मॅनेजर माझ्या ओळखीचा असला तरीही लॉकर उघडता येणार नाही. तसेच गुरूने दिलेली नामस्मरणाची चावी न वापरता, गुरूने सांगितलेल्या साधनाऐवजी मी इतर साधनावर विश्वास ठेवला तर समाधानाचे लॉकर कसे उघडता येईल ?

        बँकेच्या मॅनेजरकडे बँकेत लॉकर्सची कॉमन चावी सतत जवळ असते. तुम्ही फक्त तुमची चावी घेऊन बँकेत जाणे आवश्यक असते. तसेच भगवंताची कृपा सतत सर्वांवर वर्षाव करीतच असते, फक्त आपण आपली नामस्मरणाची चावी सतत जवळ बाळगली पाहिजे.

        दोन्ही लॉकर्समध्ये दोन फरक आहेत. बँकेच्या लॉकरसाठी आपली चावी आधी लावावी लागते, मग मॅनेजर त्याची चावी लावून लॉकर उघडून देतो. पण भगवंताच्या लॉकरसाठी भगवंताची चावी सतत लावलेलीच असते, फक्त आपणच आपली चावी लावायची आवश्यकता असते.

           मुख्य फरक म्हणजे, बँकेच्या लॉकरमध्ये आपण जे ठेवले असेल ते व तेवढेच आपल्याला मिळू शकते, पण भगवंताच्या लॉकरमध्ये भगवंताने भरभरून समाधान ठेवले आहे. आपण नामस्मरणाची चावी लावून हवे तेवढे लुटायचे आहे. 


श्रीराम .


    ------  *डॉ. मनोहर वर्टीकर.*

Saturday, October 4, 2025

नामस्मरणाचे अन्न

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*नामस्मरणाच्या जोराने कल्पना मारावी.*


*कल्पना आल्या तरी तिकडे दुर्लक्ष करून नामस्मरण करीत राहावे, नेम करीत राहावे म्हणजे थोड्या वेळाने नामाचा जोर वाढतो व कल्पनांचा कमी होतो; मग नामाच्या वाढलेल्या जोराने कल्पना मारता येतात. प्रथमच कल्पना मारण्याचा प्रयत्न केल्यास ते जमत नाही हे तत्त्व भीम व बकासुराच्या गोष्टीचा दृष्टांत देऊन श्रीबाबा मोठ्या मौजेने सांगत असत.

 ते म्हणत, "बकासुरासाठी पाठविलेल्या अन्नाच्या गाड्यावर बसून, त्याचा बळी म्हणून ब्राह्मणपुत्राऐवजी भीम गेला. व गाड्यातील अन्न आपणच खाऊ लागला. बकासुर तेथे आल्यावर, भीमाला अन्न खाताना पाहून, संतापला व त्याला मारु लागला. परंतु भीमाने माराकडे दुर्लक्ष केले व अन्न खाऊन संपविण्याचा सपाटा चालविला. सर्व अन्न खाऊन झाल्यावर, त्या अन्नाने त्याच्या अंगात खूप बळ आले, व त्याने बकासुराला मारून टाकले. तसे साधकाने भीम होऊन नामस्मरणाचे अन्न खावे. त्यावेळी कल्पनेच्या बकासुराने त्रास दिला तरी तिकडे दुर्लक्ष करावे. मग नामस्मरणाचे अन्न खाऊन बळ वाढल्यावर कल्पनेच्या बकासुराला सहज मारता येते."*


*_पुस्तक संदर्भ:- श्री अंबुराव महाराज यांच्या आठवणी_*

Friday, October 3, 2025

ब्रह्मचैतन्य

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                 भाग - ६.

               तुकामाईंनी गणूंची सर्व प्रकारे परीक्षा घेतली व त्यांच्या कसोटीत गणू पुर्णपणे उतरल्यावर, त्यांनी गणूला पोटाशी धरले. अश्रूंचा वाहू लागला. म्हणाले, बाळ, तुला मी खूप त्रास दिला. असं म्हणून त्यांच्या सर्वांगावर हात फिरू लागले. गणूचे दुःख दूर झाले. 

            काही दिवसांनी रामनवमी आली. त्या दिवशी त्यांनी गणूला दुपारी बारा वाजता अशोक वृक्षाखाली बसून अनुग्रह दिला. मंत्र दिला.. "श्रीराम जय राम जय जय राम।" आणि त्यांचे नामकरण केले "ब्रह्मचैतन्य!"

            ब्रह्मचैतन्यांना राम मंदिर बांधण्याची आज्ञा केली. काही दिवस तिथे राहिल्यावर तुकामाई म्हणाले, बाळा, आता बारा वर्षे देशाटन कर. साधना सोडू नकोस. स्वतःच्या गावी जा. गणूला ही आज्ञा फार अवघड वाटली. पण गुरु आज्ञा पाळणे भाग होते.

            तुकामाई गणूला घेऊन उमरखेडला आणून आपल्या गुरूंच्या पायावर घातले. गणूला निरोप देण्यासाठी स्वतः वेशीपर्यंत आले. गुरूंना सोडून जाणे गणूंना फारच अवघड वाटत होते. पायात मणाणणाच्या बेड्या पडल्यासारखे वाटत होते. पाय जड झाले. पण गुरु अज्ञानुसार त्यांना जाणे भाग होते. मागे वळून वळून पाहत गणू गुरुमूर्ती हृदयात साठवून घेत पुढे पुढे चालू लागले. आणि गणूचे ते  " गणू महाराज " झाले.

              गुरुआज्ञेनुसार गणू महाराज आपल्या मातृभूमीला आले.  मारुतीच्या मंदिरात चार वैराग्यांसह बसले होते. एका हातात रुद्राक्षाची माळ, दुसऱ्या हातात कुबडी, लहान वयाचा कौपीन परिधान केलेला तेजःपुंज साधू पाहून, गावातील लोक त्यांच्या दर्शनाला येत होते. ते सर्व लोक ओळखीचे होते. पण त्यांना स्वतःचा परिचय लोकांना द्यायचं नव्हता. 

              कोणी साधु महाराज मारुतीच्या मंदिरात आल्याची बातमी गावभर पसरली. तशी गीतामाय व रावजीनाही कळली. गीतामायने विचार केला, जर हे महाराज खरच सामर्थ्यशाली असतील तर, आपला बारा वर्षापासून बेपत्ता झालेल्या मुलाचा पत्ता सांगू शकतील. म्हणून गीतामाय आणि रावजी महाराजांच्या दर्शनाला आली. 

         आपल्या आई-वडिलांना समोर पाहिले. त्यांना महाराजांनी मनोमन साष्टांग नमस्कार घातला. आईला पाहिले मात्र महाराजांचे डोळे भरून आले. वाटले असेच उठून आपल्या आईला कडकडून भेटावे. पण मर्यादा आडवी आली. त्यांना प्रगट व्हायचे नव्हते. गुरुइज्ञेचेचे उल्लंघन होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःला मोठ्या प्रयासाने आवरले.

               गीतामाय त्यांच्या पुढे येऊन हात जोडून म्हणाली, महाराज! माझा मुलगा बाराव्या वर्षी गुरु शोधार्थ बाहेर पडला. त्याला अध्यात्माचे वेड आहे. तुमचा सगळीकडे संचार आहे. माझा बाळ कुठे पाहिला का हो? ऐकून महाराजांच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाले, आपण रामनाम घ्यावे. एक वर्षांनी तो परत येईल. गीतामाई मोठ्या समाधानाने दुःखी मनाला दिलासा मिळाल्याने जणू आपला बाळच भेटला या आनंदात महाराजांचे आई वडील परत फिरले.

       आणि महाराजांच्या डोळ्यांसमोर चलचित्र प्रमाणे गतस्मृती सरकू लागल्या. आपण कसे वयाच्या बाराव्या वर्षी कोणालाही न सांगता अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडलो? सांगली, मिरज, अक्कलकोट, हुमणाबाद, कलकत्ता, नाशिक सगळीकडे जाऊन शेवटी येहेळगावला तुकामाईच्या मठात आलो. तुकामाईकडे नऊ महिने राहून त्यांची मनापासून सेवा केली.

 त्यांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी दिलेल्या अनुग्रहाने  कृतकृत्य झालो.नंतर तुकामाइने त्यांचे गुरु चिन्मया नंदाकडे नेले. आजेगुरूंना नमस्कार करताना त्यांच्या समाधीवरचा हार कसा आपल्या गळ्यात पडला? तुकामाईने अत्यानंदाने कसे पोटाशी धरत साश्रू नयनाने कुरवाळतत म्हणाले, बाळा, तुला मी फार त्रास दिला का रे?

           आता तू उत्तरेकडे भ्रमण कर. देश पालथा घाल. बाळा, ब्रह्मज्ञान झाले तरी ते मुरले पाहिजे. जा..  गणूंना पाठवताना त्यांच्या विरहाने तुकामाईनांही अवघड वाटत होते. गणूंना पाय पुढे टाकवत नव्हते. पण गुरुआज्ञेचे पालन करणे तेवढेच महत्वाचे होते. मोठ्या कष्टाने आपण तिथून निघालो.

       क्षणभर आपण कुठे आहोत याचे भान महाराज विसरले  होते. ते अगदी गुरूचिंतनात गढून गेले होते. लोक दर्शनाला येतच होते. गावचे पाटीलही आले. त्यांना या साधूबद्दल संशय आला. हा आपला गुणू तर नसेल? म्हणून त्यांनी महाराजांच्या कानाकडे पाहिले. आणि त्यांना महाराजांचा फाटका कान दिसला. त्यांना त्यांच्या फाटक्या कानाची खूण पटली. उद्या सकाळी गीतामाईला सांगू. असे म्हणून ते घरी निघून गेले. फाटक्या खाण्याचे रहस्य असे होते की...

            क्रमशः 

संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Thursday, October 2, 2025

प्रपंच व परमार्थ

 चिंतन

           श्रीराम,

         मानवी जीवनात प्रपंच व परमार्थ म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू! प्रपंच व परमार्थ समांतर चालविण्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे. म्हणून समर्थ सांगतात - आधी प्रपंच करावा नेटका |मग घ्यावे परमार्थ विवेका |१२.१.१

              प्रपंचात जसे ध्येय ठरवले जाते, त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्याचे लक्ष्य सतत समोर ठेवावे असे संत सांगतात.

 त्यासाठी योग्य सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभणे फार महत्वाचे असते. ईश्वरी कृपेनेच योग्य सद्गुरूंची भेट होते. मग आपल्या हातात असलेले आपले आयुष्य आणि अभ्यासाला लागणारा वेळ..

 ह्याचा ताळा घालून ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करावी लागते. कारण आपले आयुष्य किती आहे ते कोणालाच माहीत नसते. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात - चिरंजीव हे सर्व मानिताती |अकस्मात सांडूनिया सर्व जाती ||१५||

                             ||श्रीराम ||

Wednesday, October 1, 2025

साधकांना बोध

 *🌿🌹🌿 || श्रीराम समर्थ || 🌿🌹🌿


*नामस्मरणाच्या जोराने कल्पना मारावी.*


कल्पना आल्या तरी तिकडे दुर्लक्ष करून नामस्मरण करीत राहावे, नेम करीत राहावे म्हणजे थोड्या वेळाने नामाचा जोर वाढतो व कल्पनांचा कमी होतो; मग नामाच्या वाढलेल्या जोराने कल्पना मारता येतात. 

प्रथमच कल्पना मारण्याचा प्रयत्न केल्यास ते जमत नाही हे तत्त्व भीम व बकासुराच्या गोष्टीचा दृष्टांत देऊन श्रीबाबा मोठ्या मौजेने सांगत असत. ते म्हणत, "बकासुरासाठी पाठविलेल्या अन्नाच्या गाड्यावर बसून, त्याचा बळी म्हणून ब्राह्मणपुत्राऐवजी भीम गेला. व गाड्यातील अन्न आपणच खाऊ लागला. 

बकासुर तेथे आल्यावर, भीमाला अन्न खाताना पाहून, संतापला व त्याला मारु लागला. परंतु भीमाने माराकडे दुर्लक्ष केले व अन्न खाऊन संपविण्याचा सपाटा चालविला. सर्व अन्न खाऊन झाल्यावर, त्या अन्नाने त्याच्या अंगात खूप बळ आले, व त्याने बकासुराला मारून टाकले. तसे साधकाने भीम होऊन नामस्मरणाचे अन्न खावे. त्यावेळी कल्पनेच्या बकासुराने त्रास दिला तरी तिकडे दुर्लक्ष करावे. मग नामस्मरणाचे अन्न खाऊन बळ वाढल्यावर कल्पनेच्या बकासुराला सहज मारता येते."


*_पुस्तक संदर्भ:- श्री अंबुराव महाराज यांच्या आठवणी_*


*संग्राहक :- श्री. ग.वि. तुळपुळे*

कर्म

 कर्म माणसाला नेहमी परतंत्रीच करत. तुम्हाला नियमांनी बांधावंच लागते. नाहीतर कर्माला कर्मपण राहात नाही.मर्यादा हा शब्द  कर्मालाच लागू आहे. या मर्यादा माणूस आपल्या समाजामुळे, आपल्या कल्पनेने, आपल्या प्रथांनी घालून घेतो. 

अशी प्रत्येक कर्माला मर्यादा आहे. ही मर्यादा प्रकृती मूळे येते. भगवंताला जेव्हा विश्व निर्माण करण्याची इच्छा झाली त्यावेळी त्याने हे सर्व आपल्या शक्तीने निर्माण केलं. त्या शक्तीला माया प्रकृती ही नावे आहेत. 

ही शक्ती सर्वंकष आहे, सर्वांना आवरणारी शक्ती आहे. त्या प्रकृतीच्या शक्तीने माणसाचं जीवन चालते. या विश्वाला चालविणारी शक्ती जी आहे ती मला माझ्या जीवनात चालवते. संतांना हे सोपं करून सांगण्यासाठी त्यानी एक शब्द काढलेला आहे. श्री.समर्थ रामदासस्वामी म्हणाले " रामकर्ता ही भावना ठेवा." त्याला एक सुंदर दृष्टांत दिला की एक माणूस वाहनात बसला. 

ज्या गाडीत तो बसला त्याचा सहवास घडतो. त्याची गती आपल्याला येते.तुम्ही स्वस्थ बसता, पण त्या गाडीच्या गतीनं सगळीकडे फिरता. तसं माणूस स्वस्थ बसला तरी मन त्याला अनेक ठिकाणी फिरवून आणते. इतका मी कर्मी परतंत्र आहे.