*कथा गाण्यांमागच्या*...
यातले बहुतेक सर्व किस्से शैलेंद्रजींचे सुपुत्र दिनेश शंकर यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहेत. शैलेंद्रंना रोज डायरी लिहायची सवय होती. ते सर्व अमूल्य टिपण दिनेश शंकर यांच्याकडे आहे. त्यातून काही निवडक गाण्यांविषयी माहिती जमली आणि जे काही पुढे आलंय ते आपल्या समोर ठेवायला मला आनंद होतोय. यातले बरेच किस्से काहीजणांना माहीतही असतील. पण ज्यांनी वाचले नाहीत अशा सदस्यांसाठी रिपोस्ट...
1) *मुडमुडके ना देख मुडमुडके*...
"एकदा राज कपूरची म्युझिकल टीमचे महत्वाचे सदस्य म्हणजे शंकर, जयकिशन, त्यांचे सहाय्यक आणि संगीतकार दत्ताराम, गीतकार शैलेंद्र, हसरत जयपुरी गाडीतून चेंबूरच्या आर के स्टुडियो मध्ये चालले होते. राजच्या श्री ४२० वर काम चालू होते. तेव्हा मुंबईत बैठी घरेच जास्त होती. रस्त्याच्या बाजूला नवीन बांधकाम चालली होती आणि दत्ताराम अपूर्वाइने सारखे मागे वळून पहात होते. ते पाहून शंकरजींनी विचारले," अरे दत्तू बार बार मुडमुडके क्या देख रहा है" पुन्हा थोड्या वेळाने तो प्रसंग रिपीट झाल्यावर शेजारी बसलेले शैलैंद्र म्हणाले, "अरे इस पर तो गाना बन सकता है, मुडमुडके ना देख मुडमुडके...राजकपूर आणि नादीरावर चित्रित झालेलं हे गाणं...
लिंक..
https://youtu.be/R3D3YNmg-Ak
2) *खोया खोया चांद खुला आसमान*...
"कालाबाजार" च्या गाण्यांच्या सिटींग्ज चालल्या होत्या. सचिनदांची चालही तयार होती. यावर बरेच दिवस शैलेंद्र लिहिण्याचा प्रयत्न होते पण मनासारखे शब्द सुचत नव्हते. त्रासून एक दिवस सचिनदा त्यांना म्हणाले, "आज कुठल्याही परिस्थितीत गाणं लिहून पाहिजे" आणि पंचमला शैलेंद्रंबरोबर पाठवून म्हणाले गाणं घेतल्याशिवाय घरी येऊ नकोस. दिवसभर दोघे आरे कॉलनी, नॅशनल पार्क अशी आवडीची ठिकाणं पालथी घालत शेवटी रात्री जुहूला आले. त्याकाळात जुहूला निवांतपणा होता. शैलेंद्रंनी पंचमकडे माचिस मागितली, सिगरेट शिलगावली आणि नीरव शांततेत, वर चंद्राकडे एकटक पहाता शैलेंद्रना शब्द सुचले. दिवसभर खरडून खरडून कागद संपले होते. सिगरेटच्या पाकिटातल्या आतल्या कागदावर अप्रतीम गाणे अवतरले.
"खोया खोया चाँद खुला आसमान, आँखोमें सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी...
शैलेंद्र म्हणाले,"अब तुम आरामसे घर जा सकते हो! सचिनदासे कहो, कल रेकाॅर्डिंगकी तैयारी करें!
लिंक..
https://youtu.be/9QWWH0QDvSY
3)"परख"..चित्रपटाच्या गाण्यांविषयी..
"परख" चित्रपटातलं मधुर गाणी जर जन्मालाच आली नसती तर???धक्का बसला ना? बिमल रॉयनी हा चित्रपट करायचा ठरवलं तेव्हा त्यात एकही गाणं नसेल असं ठरलेलं होतं. त्यांनी सलिल चौधरींना पटकथा आणि शैलेंद्रंना संवाद लेखनाची जबाबदारी दिली होती. हा असा एकमेव चित्रपट असावा ज्याचे पूर्ण संवाद शैलेंद्रंनी लिहिले आहेत. पण गाण्याशिवाय चित्रपट ही कल्पनाच कोणाला रुचेना आणि ते ही समोर उत्तम गीतकार, संगीतकार असताना? पुढे बिमलदांची समजूत काढण्यात सगळे यशस्वी ठरले आणि "ओ सजना बरखा बहार आई, मिला है किसिका झूमका, मेरे मनके दिये, क्या हवा चली बाबा रुत बदली....या सारख्या सुंदर गाण्यांनी रसिकांना .अतीव आनंद दिला.
लिंक..all songs
https://youtu.be/MK3CVhVk8_k
4) *जिस देशमें गंगा बहती है*.....
हा खरंतर कुणा एका गाण्याबद्दल चा किस्सा नाही. या चित्रपटाची कथा ऐकण्यासाठी राजकपूरनी त्यांच्या टीमला राजकुटीर वर बोलावले होते. कथा ऐकल्यावर अचानकपणे शंकरजींनी हातातला चहाचा कप जोराने टेबलवर आदळला, एक कचकचीत शिवी हासडली आणि रागाने रुमबाहेर गेले. राजकपूरनी "अरे देख तो पहलवान को क्या हुआ? असे म्हणताच हसरतजी आणि शैलेंद्र त्यांच्या मागोमाग गेले. त्यांनी विचारल. "भाई हुआ क्या? शंकर वैतागून म्हणाले, 'डाकूओंकी पिक्चरमें संगीतका क्या काम? शैलेंद्रंनी समजावले अरे नहीं वो गानोंके बगैर पिक्चर कैसे बनाएंगे? आणि खरंच एक , दोन नाही तब्बल नऊ गाणी राज कयूरने अशी चपखल बसवली आणि सगळी हीट झाली.
लिंक..all songs
https://youtu.be/3ICwJPcqg0Q
5) *जाओ रे जोगी तुम जाओ रे*...
लेख टंडनजींचा चित्रपट "आम्रपाली"च्या एका रेकाॅर्ढर्डिंगची गोष्ट! शैलेंद्रंच्या गाण्यावर शंकर जयकिशनची रिहर्सल चालली होती. एका बाजूला रेकाॅर्डिंगची तयारी चालू होती तेवढ्यात राजकपूरचा शंकरना फोन आला, "क्या हो रहा है ?ते म्हणाले, "गानेकी रिहर्सल चल रही है! राजकपूरने गाणे फोन वर ऐकवायला सांगितले! गाणे ऐकल्यावर त्याने लेखजींकडे फोन द्यायला सांगितले आणि त्यांना म्हणाला, "ये गाना तो मेरी फिल्म के लिए तू फीट है! तू,अपने लिये दूसरा लिखवा ले! (लेख टंडन काही दिवस राजकपूरकडे असिस्टंट होते. ते नाही म्हणू शकले नाहीत.)
सगळ्यांच्या चेहेर्यावर चलबिचल स्पष्ट दिसत होती. शेजारीच लताजी होत्या त्यांनी समजावले, " अरे गानेका क्या है? हम दूसरा लिखवाएंगे! त्यांनी पेटीवर काही सुरावट वाजवली. शैलेंद्रंनी शब्द लिहिले.. "जाओरे जोगी तुम जाओरे, यै है प्रेमियोंकी नगरी, यहाँ प्रेम ही है पूजा..अंतर्याची चाल, ठरली पण मनासारखे अंतरे सुचेनात.
शेवटी पुन्हा ३ वाजता पुन्हा जमायचे ठरले. दोन वाजून गेले तरी अंतरे तयार नव्हते. रेकाॅर्डिंग कसे करणार? ठरल्याप्रमाणे लताजी आल्या. तिकडे कोणाचीही हिंमत होईना लताजींना हे सांगायची की अंतरे तयार नाहीत. लेखजींनी शैलेंद्रनाच आत पाठवले. ते आत गेले आणि लताजींशी संभाषण सुरु झाले. खोली साऊंडप्रुफ असल्याने आत काय चाललंय ते कळेना. बाहेर सर्व हैराण परेशान! लताजी काय बोलताहेत? नक्कीच रागावल्या असतील! शेवटी न राहवून लेखजींनी आतला माईक सुरु केला तर लताजी शैलेंद्रंना हसून म्हणत होत्या "अरे बास बास शैलेंद्रजी ! तीन अंतरे हो गए और कितने अंतरे सुनाएंगे? समोर कागद, पेन नसताना ते उत्स्फूर्तपणे म्हणून दाखवत होते. कदाचित समोर साक्षात गानसरस्वतीला पाहून शैलेंद्रंच्या प्रतिभेलाही सकारात्मक् ऊर्जा मिळाली असेल! होय ना?
लिंक...
https://youtu.be/9-a9Ggv_PSo
6) *छोटिसी ये दुनिया पहचाने रास्ते हैं*....
शंकर जयकिशनना एका साऊथच्या निर्मात्याचा चित्रपट या अटीवर मिळाला की गीतकार त्यांच्या पसंतीचा असेल. तो पर्यंत हा अलिखित नियम होता की एस जें चे संगीत असेल तर गीते हसरत किंवा शैलेंद्रजींची असणार! जेव्हा शैलेंद्रंना ही गोष्ट कळली तेव्हा ते रागाने हसरतजींना घेऊन रेकार्डिंग रुमवर आले. ते तिथे न भेटल्याने एका कागदावर त्यांनी खरडले, "छोटीसी ये दुनिया पहचाने रासते हैं, तुम कभी तो मिलोगे कहीं तो मिलोगे तो पूछेंगे हाल" आणि निघून गेले.
शैलेंद्र खरंच दुखावले होते. त्या दोघांनी ठरविले आता एकत्र काम करायचे नाही. ही गोष्ट राजकपूरला कळल्यावर त्याने चौघांनाही जुहूला ठरल्याजागी बोलावले आणि अथांग समुद्राच्या साक्षीने त्यांची दिलजमाई झाली. वादळ शमले. पुढे शैलेंद्रंकडूनच अंतरे लिहून घेऊन एस जें नी "रंगोली" या चित्रपटात ते गाणे वापरले.
लिंक..
https://youtu.be/CeOVtDnYpbc
जाता जाता "जीना यहां मरना यहां" या अप्रतीम गीताविषयी! शैलेंद्रंनी याचा फक्त मुखडा लिहिला होता. अंतरे बाकी होते. दुर्दैवाने त्याच दरम्यान त्यांचे निधन झाले ते ही राज कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशीच! राजला त्याच्या अजीज दोस्ताची आठवण अश्यारितीने राहिली ती कधीही न विसरता येण्यासाठी! त्या गाण्याचे अंतरे नंतर शैलेंद्रंचेचे सुपुत्र शैली शैलेंद्र यांनी पूर्ण केले आहेत.
सर्व भावंडांमध्ये थोरले असल्याने शैली यांना वडिलांचा सहवास इतरांच्या तुलने जास्त मिळाला. शैलेंद्र यांनी हे पूर्ण गीत लिहिले नाही हे ओळखू येणार नाही अशी अंतर्यांची रचना शैली ने केली आहे
© कृपा देशपांडे,पुणे
सौजन्य....यू ट्यूब
No comments:
Post a Comment