TechRepublic Blogs

Sunday, January 12, 2025

शिवणाचा डबा

 *शिवणाचा डबा*


परवा मी काहीतरी उसवलेलं शिवत होते ,

सुईदोरा पाहिला आणि नात(वय वर्षे ८ ) म्हणाली ,आजी काय करतेस ?

मी म्हटलं अगं आजोबांच्या पॅंटचा काठ उसवलाय  तो शिवतेय 

मग तिचे प्रश्न काय संपतायत ?

उसवलं म्हणजे काय ?

काठ म्हणजे काय 

मग सगळं शिस्तवार समजावून सांगणं आलं 😃

पण त्याचा एक फायदा झाला , 

ती म्हणाली मला शिकव ना आणि लगेच एक कापडाचा तुकडा घेऊन आली . 

चला हे ही नसे थोडके म्हणून मी पण लगेच सुई ओवण्यापासून सगळं शिकवलं आणि माझं गुणी बाळ पण लक्ष देऊन पहात होतं 😊

मग तिला हेम म्हणजे काय 

धावदोरा म्हणजे काय उत्साहाने सगळं सांगितलं 

आणि खरच तिने सांगितल्याप्रमाणे इतका छान प्रयत्न केला ना हेम धावदोरा घालायचा मला तर भरुनच आलं 😃. 

शाळेला सुट्टी त्याचा एवढा फायदा झाला याचाच मला आनंद . 

आता त्याचा प्रत्यक्ष उपयोग कधी होईल देवास ठाऊक .

कारण हल्ली ब्रॅंडेड कपडे उसवतही नाहीत आणि फाटतही नाहीत. 

 वाढत्या वयामुळे लवकर लहान मात्र होतात . 😊


पण आपल्या लहानपणी शिवणकाम शिकताना जगण्याचे संस्कार होत होते . मुलामुलींच्या मनावर . 

कारण शाळेत ५वी ते ७ वी शाळेत शिवण विषय असायचा. 

धावदोरा हेम घालणं काजं करणं बटण लावणं (तेव्हा हूक नव्हते 😊)या प्राथमिक गोष्टी शाळेतच शिकायला मिळाल्या . आणि वार्षिक परिक्षेत त्याचे % टक्क्यांमध्ये भरघोस मार्क वाढायचे हा आनंद जास्त 😃


फार पूर्वी तर घरी हातानेच कपडे शिवायची पद्धत होती . 

मला आठवतय माझी आजी पांढरी चोळी (त्यावेळेस बायका पोलके किंवा ब्लाऊज म्हणत नसत 😊)

घालायची 

आणि ती त्या स्वत : शिवायची  हाताने आणि ती चोळी ८ तुकड्यांची असायची 

वितीने माप घेऊन कसं तिला बरोबर साधायचं आता खरच कमाल वाटते . 

पण अडून राहणच नाही हा मला वाटतं पहिला संस्कार असावा बाईवर .

कुंची लंगोट दुपटी झबली (आता ही नावं सुद्धा वापरातून बाद होतील बहुतेक ) घरीच शिवायची . आजीमुळे हे शिकायला मिळालं . 

शिवणाच्या डब्यात बारिक जाड सुया खाकी पॅंटची आणि इतर मोठी बटणं प्रेस बटणं रिळं याचा संग्रह असायचा .

माझ्या डब्यात आता गरजेप्रमाणे ईलॅस्टिक वेलक्रो अश्या गोष्टीही सामावल्यात .  

अजूनही या सुई दोर्याने शिवण्याचा सिनेमात फक्त हिरो हिरॉईनचा  रोमान्स दाखवताना हिरोच्या जवळ उभं राहून त्याच्या  अंगातल्याच शर्टाला बटण लावायचा सीन हमखास दाखवला जातो . 

जो प्रत्यक्षात कधी नसतोच .😃 

नवरा एकतर पटकन शर्ट काढून देईल किंवा दुसरा शर्ट घालेल 😃

आताच्या मुली असा डबा ठेवत असतील का ?आणि किती जणाना याचं ज्ञान असेल ?😃

अपवाद असतीलच . 

त्यामुळे या ज्ञानातून जे आज्यांकडून (मौलीक ?)विचार ऐकायला मिळायचे ते संपलेच .😊

O१ अगं एक टाका वेळेवर घातला तर पुढचे १० टाके घालायचे वाचतात . २ अगं थोडी चूण घालावी गं कपड्यासारखी मनाला . 

३ अगं कपड्यासारखी अलगदपणे माणसं जोडता आली पाहिजेत गं बाळा ,

४ धागा उसवला म्हणून कुणी कपडा टाकून देतं का ?

तसच नात्याचं आहे बयो, टाका घालून जोडता आलं पाहिजे गं 

५ बाईच्या जातीला शिवण टिपण आलं पाहिजे गं बाई तिलाच तर सारं जोडायचं आणि बांधून ठेवायचं  असतं संसारात . 


असे संवाद संपलेच की आता . 

दुपारच्या वेळी माजघरात शिवण टिपण करत बायका एकमेकींशी सुखदुखाच्या गोष्टी  बोलतायत हे दृश्य फक्त सिनेमात किंवा  फोटोत दिसेल आता . 

आता वेळ कुणाला आहे जोडाजोडी करायला ?

आणि लागतच नाही असं काही करायला . 

सगळं रेडीमेड मिळतच की, आणि माणसांचं म्हणाल तर ते फारसं  महत्वाच नाही (🤫) ?

कुणी आलं बरोबर तर ठिक आहे  त्याच्यासह,...  नाहीतर ठिक आहे , त्याच्याशिवाय ,

फक्त धावायचं असतं प्रत्येकाला . 

पण अजूनही निरागस मनाची नातवंडं आजूबाजूला असतील  ना तर नक्की आजीने टाके घालून जोडायचं कौशल्य शिकवत राहावं 

कुणी सांगावं काळ फिरुन येईल  आणि काळाची गरज म्हणून  ( कपडे आणि नाती जोडायला )  परत या गोष्टी करायला शिकवेल तेव्हा आपली आठवण निघेल . 😃

तोपर्यंत आपण आपला शिवणाचा डबा त्यातील सर्व सामानासकट जपून ठेवूया 

आपण एवढं तर करुच शकतो . 😊


  ©️®️ सौ . नीलिमा लेले .

No comments:

Post a Comment