काल मातृदिनी एका फेसबुक समूहात एका सदस्याने एक फोटो पोस्ट केला. त्या खाली लिहिलं "तू आहेस म्हणून मी आहे. आय लव्ह अँड रिस्पेक्ट यु. मी आजच्या दिवसासाठी देवाचे आभार मानतो!"
त्यावर सदस्यांनी कॉमेंट केल्या. आईंना नमस्कार वगैरे. मग अनेकांनी त्या सदस्याच्या आईच्या फिटनेसची स्तुती केली. सदस्य साधारण पंचेचाळीस ते पन्नासच्या आत बाहेरचा होता. म्हणजे आई किमान सत्तर पंचाहत्तर वर्षांची असेल असा अंदाज. पण त्या मानाने आई बऱ्यापैकी तरुण दिसत होती. अनेकांनी लिहिलं देखील "काकू जास्तीतजास्त साठीच्या वाटतात" वगैरे. दिवसभर काकूंच्या फिटनेसचं कौतुक सुरू होतं. पंचाहत्तरीच्या त्या काकू साठीच्या कश्या वाटतात ह्याचं लोक मनापासून कौतुक करत होते. तो फोटो, ती पोस्ट आणि काकू समूहात हिट झाले होते. आणि संध्याकाळी अचानक ती पोस्ट समूहात दिसेनाशी झाली. सहज कुतूहल म्हणून मी त्या सदस्याच्या पर्सनल वॉल वर जाऊन पाहिलं तर तोच फोटो आणि तोच मेसेज तिथेही होता. फक्त त्याच्या मित्र आणि नातेवाईकांनी त्या पोस्टवर "वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!" अश्या कॉमेंट लिहिल्या होत्या!
ते वाचून क्षणभरात माझी ट्यूब पेटली! त्या माणसाच्या चाळिशीतल्या बायकोचा वाढदिवस नेमका मातृदिनी आल्यामुळे समूहातील लोकांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे लोकांनी कॉमेंट करताना त्याच्या बिचाऱ्याच्या चाळीशी मधल्या बायकोला त्याची आई समजून तिच्याच वाढदिवशी अनवधानाने तिला साठीची करून टाकली होती. ते लक्षात आल्यावर अर्थात त्याने ग्रुप पोस्ट डिलीट केली. पण त्या पोस्ट मधून त्याला पंचाहत्तरीची आई साठीची दिसते अश्या कॉम्पलीमेंटच्या आनंद मिळण्या ऐवजी आपली चाळिशीतली बायको साठीची वाटते हा साक्षात्कार बायकोच्याच वाढदिवशी पचवावा लागला होता!
No comments:
Post a Comment