TechRepublic Blogs

Monday, January 6, 2025

वाचनशिल्प

 *वाचनशिल्प*


*अध्यात्मिक अनुभव सोसण्याचे सामर्थ्यहि लागते*



*श्रीरामकृष्ण परमहंसांच्या* जीवनातील एक प्रसंग आहे , मोठा बोधप्रद आहे . श्रीरामकृष्ण आरंभी पुजारी म्हणून काम करीत असत . राणी रासमणी नावाच्या एका अत्यंत संपन्न स्त्रीने बांधलेल्या मंदिराचे आरंभी ते पुजारी होते  पुढे पुढे त्यांचा अधिकार लक्षात आल्यानंतर राणी रासमणी आणि तिचा सर्व परिवार परमहंसांचा भक्त झाला . माथूरबाबू या नावाचा रासमणीचा जावई होता . त्याने एकदा परमहंसांची भावावेषात तल्लीन झालेली मूर्ति पाहिली . त्यांच्या मुद्रेवर विलक्षण तेज झळकत होते आणि निरतिशय आनंद अनुभव जणू त्यांच्या रोमारोमातून ओसंडत होता . माथूरबाबूने ते पाहिले . *आपण इतक्या सुखविलासात राहतो , ऐश्वर्यात लोळतो तरी आनंदाचे हे स्वरूप आपल्या अनुभवाला कधी येत नाही . आपल्याला वाटणारे सुख तत्काळ ओसरून जाते , आणि मागून नाना प्रकारच्या चिंतांनी अंतःकरण व्यथित झालेले राहते , हे अनुभविलेले असल्यामुळे  , तल्लीनतेच्या दर्शनाने भारवलेल्या , माथूरबाबूने परमहंसांना  विनंती केली की ,  ' महाराज ! भाव - समाधीत आपण जो आनंद अनुभवता त्यातला थोडासा अंश आम्हालाही चाखवा ना !  त्याचे म्हणणे रामकृष्णानी फारसे मनावर घेतले नाही . पण माथूरबाबू मागेच लागला . चार - पाच वेळा त्यांनी आग्रह केल्यानंतर काही दिवसांनी रामकृष्ण त्याला ' ठीक आहे ' म्हणाले . तो जावई माणूस . रुसला तर काय करील कोणास ठाउक ? म्हणून रामकृष्ण ठीक आहे म्हणाले खरे ! आणि एक दिवस परमहंसांनी माथूरबाबूला आवर्जून स्पर्श केला आणि म्हणाले    ' जा  ! येईल तुला अनुभव .'*    माथूरबाबू  संतोषाने घरी आला पण संध्याकाळी त्याला काही चमत्कारिक वाटू लागले . शरीरात  , हृदयामध्ये  ,  डोक्यात काही जाणीव होऊ लागली . पण ते स्पंद त्याला सुखावह वाटेनात . तो अस्वस्थ झाला आणि परमहंसांच्याकडे धावत आला . पायांवर डोके ठेवले आणि म्हणाला ,  ' महाराज ! आपला हा अनुभव परत घ्या , तो मला असह्य होतो आहे .


*आध्यत्मिक अनुभव सोसण्याचे सामर्थ्यहि असावे लागते .* त्या दृष्टीने शरीर आणि अंतःकरण योग्य असावे लागते . विज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा काही विशिष्ट रसायनांचा प्रयोग करावयाचा असला तर सर्वसामान्य काचेची पात्रे चालत नाहीत. त्यासाठी पायरेक्स ग्लासची पात्रे वापरावी लागतात . साधी काच तडकते , वितळते म्हणून तिचा उपयोग करता येत नाही . माथूरबाबूला ते सोसले नाही . *रामकृष्ण परमहंसांनी आशाच काही आग्रहावरून नरेंद्रलाही अनुभव आणवून देण्यासाठी विशिष्ट हेतूने स्पर्श केला. पण ती दिव्य अनभूती नरेंद्राला सोसली , मानवलीही , त्यामुळेच नरेंद्राचे पुढे विख्यात  विवेकानंद झाले  !*


संदर्भ ग्रंथ - *पूर्वरंग - तरंगिणी*


             

No comments:

Post a Comment