TechRepublic Blogs

Sunday, January 5, 2025

नामस्मरण

 श्रीराम समर्थ


          *नामस्मरणाचा परिणाम*


          नीलगिरीच्या बाजूला एक मोठा काॕफीचा मळा आहे. त्याच्या श्रीमंत मालकाला एकच मुलगा होता. लहानपणी त्या मुलावर चांगले संस्कार झाले. तो बी.ए. झाला व आपलें जीवन ध्यानधारणेला लावायचें त्यानें ठरवलें. म्हणून गुरूच्या शोधांत तो हिमालयांत गेला. तेथें एका थोर संन्याशाची गांठ पडली. त्याच्याकडून या तरुण मुलांनें संन्यासदीक्षा घेतली. गुरूनें त्याला सोहंचा मंत्र दिला व कांहीं योगप्रक्रिया शिकवल्या. तो मैसूरमधें एका मठांत उतरला होता. *हुच्चुराव नांवाचे एक साधक तेथें ज्या घरांत राहात त्या घरातील एका खोलीमधें नारायणाप्पांच्या प्रेरणेनें तेरा कोटी जप झाला होता. जप तेरा अक्षरीं मंत्राचाच झाला.* संन्यासी मैसूरला आलेला हुच्चुरावना कळले. ते त्याच्याकडे गेले आणि वेळ काढून आपल्या घरीं येण्यास त्याला विनवलें. संन्यासी म्हणाला 'मला साडेअकरा वाजता राजवाड्यांत जायचें आहे. त्याच्या आधी पांच मिनिटें मी येऊन जाईन.' ठरल्याप्रमाणें हुच्चुरावनीं त्याला आणलें. संन्यासी घरांत आला, ज्या खोलीत तेरा कोटी जप झाला होता तिच्या दाराशी आला. पण तो उंबरठ्यापाशीच थबकला आणि कानडीत म्हणाला, *'अरे, या खोलीमधें प्रचंड प्रमाणांत नाम भरलेलें आहे.' समोर श्रीब्रह्मचैतन्यांची मोठी तसबीर होती. तिच्याकडे पाहून तो म्हणाला 'हा कोण थोर पुरुष आहे ? त्याच्याभोवतीं मला तेजोमय असा तेरा अक्षरी मंत्र दिसतो. मी येथे थोडावेळ बसतो.'* म्हणून तो हातपाय धुवून आला आणि सिद्धासनावर डोळे झांकून बसला. पाच मिनिटांसाठीं आलेला तो वीस मिनिटें शांतपणे बसला. जातांना तो म्हणाला *'मोठे रम्य स्थान आहे.'* 

          *नाम घेणाऱ्याचा सूक्ष्मदेह नामाच्या स्पंदनांनीं भरून जातो. पण जेथें नाम चालतें तें स्थानही नामाच्या स्पंदनांनीं भरून जातें. त्या स्पंदनांचा अनुभव येण्यास आपण संवदेनशील व्हावें लागतें.*


               ---------- *प्रा के वि बेलसरे* 


               *******

संदर्भः *साधकांसाठी संतकथा हें यांचे पुस्तक. पान ८१/८२*

संदर्भः श्रीप्रसाद वामन महाजन.

No comments:

Post a Comment