TechRepublic Blogs

Thursday, January 9, 2025

आई

 असं म्हणतात, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. आई होणं म्हणजे सोपं असतं का हो? जेव्हा तिला समजते की आपण आई होणार आहोत तेव्हा तो आनंद काही निराळाच असतो. पण तो नऊ महिन्यांचा प्रवास हा तितकाच कठीण असतो. त्या दिवसापासून सुरू होतं पोटातील जीवासाठी देखील जगणं. त्याच्या पोटात होणाऱ्या प्रत्येक हालचाली तिला सुखावून टाकणाऱ्या असतात. बाळाने मारलेली पहिली लाथ जेव्हा तिला जाणवते तेव्हा ती किती आनंदात असते हे हा लेख वाचणाऱ्या प्रत्येक आईला ठाऊक असेल. म्हणून तर व.पुं.नी लिहिले आहे, " स्त्री जेव्हा जेव्हा संघर्षासाठी उभी असते तेव्हा ते नाते भलेही पत्नीचे असेल पण जेव्हा जेव्हा ती क्षमा करते तेव्हा ते नाते आईचेच असते.." मी मध्यंतरी एक विचार वाचला होता, " आईसाठी आई एवढं कधीच करता येत नाही.." खरं आहे हो. समजा,ती कधी आजारी पडली तर आपणच अर्धे कोलमडतो, कारण घरातली ती कर्ती स्त्री तर असतेच पण तिच्या आजारपणामुळे सगळं घरचं आजारी पडल्या सारखं वाटतं..

 लग्नामध्ये सनई जेव्हा जेव्हा वाजते तेव्हा त्या सुरांनी. डोळे पाणावतात. मुलगी बोहल्यावर चढताना मंगलाष्टकाचे सुर आईने ऐकू नये असं म्हणतात कारण, ते सुर तिच्या पाठवणीची वेळ समीप आली आहे असेच वाटतात. जेव्हा मुलगी आईला मिठी मारुन रडते तेव्हा तिच आई काळजावर दगड ठेवून मुलीला म्हणते, " रुप दर्पणी मला ठेवूनी जा, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा.." या वर देखील व.पुं.चा विचार मन हळवं करणारा आहे, " सांत्वन म्हणजे दु:खाचे मुल. मुल आईपेक्षा मोठं कसं होईल? मुल मोठं व्हायला लागलं की आई आणखीन मोठी होते. म्हणून समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात.." इतके दिवस आपण कोणाला तरी आई म्हणायचो,पण आता आपल्याला कोणीतरी आई म्हणणारं येणार आहे,ही किती सुखद अनुभुती आहे ना!! त्या छोट्या जीवाने मारलेली आई ही हाक ऐकताना कोणत्याही आईच्या मनात याच गाण्याच्या ओळी येतील, 

 " बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई.." 

 तिच्या कुशीत डोके ठेवल्यावर जो काही विसावा मिळतो तो औरच असतो. आपल्या चेहऱ्यावरील रेष आणि रेष ती ओळखते. तिला ताण असेल तर ती तो कितीतरी वेळा आपल्याला सांगत नाही पण आपल्या चूका ती पाठीशी घालते म्हणून तिला फसवणं हे मात्र नक्कीच चुकीचे आहे. म्हणून तर व.पु. म्हणतात ना, " कोणाचीही असली तरी आई या नात्याला कधीच फसवू नये.." म्हणूनच, मुलगी सासरी निघताना ती तो हुंदका आवरु शकत नाही.  सासर हे मुलीचं जरी घर असलं तरी व.पुं.नी म्हटलंय तसं," सासरी मुलगी सजवली जाते, रुजवली जात नाही.." असो, या विषयावर लिहावे तेवढे थोडेच आहे. विधात्याने निर्माण केलेल्या आई नावाच्या कलाकृतीला शुभेच्छा देताना एवढंच लिहावेसे वाटते, 

 " घे जन्म तू फिरोनी, येईन मी ही पोटी,

    खोटी ठरो न देवा,ही एक आस मोठी.." 

                                       

  .. मानसी संजय देशपांडे 

                                                                

No comments:

Post a Comment