श्रीराम समर्थ
तीर्थक्षेत्र
सामान्यतः नद्यांचे संगम, सरोवरे, विशिष्ट सागरतीर, मंदिरे, पर्वत, गुहा इत्यादींना तीर्थ स्थाने आणि धर्मक्षेत्रे म्हणून ओळखले जाते. या पवित्र स्थानांची यात्रा केल्यामुळे पाप नाहीसे होते व पुण्यलाभ होतो अशी भाविकांची श्रद्धा असते. अशी श्रद्धा नसणाऱ्या लोकांच्या दृष्टीने देवता मुर्ती म्हणजे विशिष्ट आकार दिलेला दगड आणि गंगेचे पवित्र जल म्हणजे केवळ पाणि असते. दैवी संपत्तीने श्रीमंत असलेल्या ब्रह्मनिष्ठांच्या, साधूसंतांच्या वास्तव्याने पवित्र झालेली स्थाने तीर्थक्षेत्रे होतात. ज्यांची संतांच्या ठिकाणी आणि ते जेथे राहिले त्यास्थानांसबंधी पावित्र्याची भावना असते अशा साधाकांना तीर्थयात्रा केल्यावर मानसिक समाधान लाभते.
मन अत्यंत शुद्ध होणे हे तीर्थामधे श्रेष्ठ तीर्थ होय. केवळ पाण्यात देह बुडविण्याला कोणी स्नान म्हणत नाहीत. सर्व तीर्थांमध्ये स्नान करूनही मन पापी आणि मलीन राहिले तर अशा माणसाला केवळ शरीराचा मळ गेला आहे म्हणून निर्मळ म्हणता येत नाही. विषयांची अत्यंत आवड हाच मनाचा मळ होय. ज्याने त्याचा त्याग केला तोच खरा निर्मळ होय. म्हणूनच केवळ रूढी म्हणून तीर्थयात्रा केलेल्या लोकांचे लोभ, द्वेष मत्सर इत्यादी विकार कमी होत नाहीत आणि तीर्थयात्रा केल्यामुळे आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत असा अहंकार मात्र निर्माण होतो.
तीर्थयात्रा करताना महर्षि मैत्रेयांकडून आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर विदूर हस्तिनापूरात परत आले. त्यानंतर त्यांना तीर्थयात्रेचा वृत्तान्त विचारताना युधिष्ठिराने म्हटले आहे 'हे प्रभो! तुमच्या सारखे भक्तभागवत स्वतःच तीर्थस्वरूप आहेत. पापी पुरुषांच्या द्वारा कलुषित झालेल्या तीर्थांना आपल्यासारखे महात्मे आपल्या हृदयामध्ये विराजित श्रीगदाधर भगवंताच्या प्रभावाने तीर्थत्व प्राप्त करून देतात.' [भागवत १.१३.१०]. त्याचप्रमाणे असे भक्त कोणत्याही जलाशयात स्थान करोत, त्यांच्या प्रभावाने त्या जलाशयाला तीर्थत्व प्राप्त होते.
जे तारून नेते ते तीर्थ. तीर्थ शब्दात तृ हा मुळ धातु असून त्याचा अर्थ ओलांडून पलीकडे जाणे, पोहोणे असा आहे. संसाराला सागराची उपमा देतात. हा सागर तरून जाण्यासाठी नामाच्या नावेमध्ये बसावे असे संतांनी आणि भगवंतानी म्हटले आहे. 'नामाचिया सहस्रवरी | नावा इया अवधारीं | सजूनिया संसारीं | तारू जाहलों ||' ज्ञानेश्वरी १२.९० || चित्तशुद्धी होण्यासाठी नामस्मरणाबरोबरच तीर्थयात्रा करावयास सांगितले आहे. काशी, प्रयाग, मथूरा-वृंदावन, अयोध्या तसेच महाराष्ट्रातील पंढरपूर, देहू, आळंदी, कोल्हापूर, नाशिक, तुळजापूर, गोंदवले, पावस, निंबाळ इत्यादी क्षेत्रात जाणाचा मुख्य उद्देश तेथे जाऊन स्नान, देवदर्शन व तीर्थप्रसाद घेऊन परत येणे हा नसून अशा ठिकाणी येणाऱ्या संत सत्पुरुषांचा सहवास घडून चित्तशुद्धी व्हावी व साधनास बळकटी यावी हा असतो. म्हणून नारदांनी तीर्थांना तीर्थपणा श्रेष्ठ भक्तांमुळे येतो असे या सूत्रात म्हटले आहे. संतांच्या केवळ दर्शनाने माणूस पावन होतो म्हणून भक्तांनी सत्संगतीला अतिशय महत्व दिले आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आलेल्या संतांच्या सहवासाचा साधकांवर अनायसा परिणाम होतो. सारांश संतांमुळे तीर्थांना पापी जनाना पवित्र करण्याची शक्ती प्राप्त होते.
*********
संदर्भः श्रीनारद भक्तिसूत्रे ||६९|| - लेखक श्री म वि केळकर
No comments:
Post a Comment