TechRepublic Blogs

Thursday, January 2, 2025

पांडुरंगमय

 आजच्या पांडुरंगमय वातावरणात कुणीतरी साखरेहून गोड कविता पाठवली आहे पहा.

😊


विठोबाही रुक्मिणीला

       खूप कामे सांगतो,

अन्  तिच्यावर थोडा

       रूबाब गाजवतो..


सकाळीच म्हणाला विठुराया

      रुक्मिणी, "जरा आज

नीट कर सडा-सारवण

      आपल्याकडे येणार भक्त सर्वजण


विठोबा म्हणतो रुक्मिणीला,

          "भक्तांची विचारपूस

जरा अगत्याने कर..

           अगं हे तर त्यांचं माहेरघर !"


विठोबा म्हणतो, "जनीची,

       कर ना तू वेणी -फणी"

अगं एकटी आहे अगदी

       तिला या जगी नाही कुणी 


रुक्मिणी, उद्या तर घाल तू

         पुरणा-वरणाचा घाट

उद्या आहे बार्शीच्या

         भगवंताच्या स्वागताचा थाट


एका मागोमाग सूचना ऐकून

       रुक्मिणी आता रुसली

आणि रागा रागाने जाऊन

       गाभाऱ्या बाहेर बसली 


सारखंच याचं आपलं

       भक्त अन् भक्त

मी काय आहे

       कामालाच फक्त ?

  

भोवती तर याच्या सारखा

      भक्त आणि संत मेळा

काय तर म्हणे..!

      विठु माझा लेकुरवाळा 


भक्तांनाही कांही

       माझी गरजच नाही

कारण तोच त्यांचा बाप

       अन् तोच त्यांची आई 


कधीतरी माझी ही 

      कर जरा चौकशी

भक्तांच्या सरबराईत

      दमलीस ना जराशी ?


मी आता मुळी

     जातेच कशी इथुन

बाहेर जाऊन याची

      गंमत बघते तिथुन


आता तरी याला

       माझी किंमत कळेल

अन् मग हळूच

       नजर इकडे वळेल


विठू जरी आहे

      साऱ्यांची माऊली

भगवंतांच्याही मागे असते

       "लक्ष्मीची" सावली.


🙏🙏🙏🚩🚩🚩 


लेखक अज्ञात !!!

No comments:

Post a Comment