शुद्ध चित्त जले, पुन्हा प्रक्षाळिले, चरण पुसले, मार्दवाने ||६
पंचामृताचा अभिषेक झाल्यावर परत शुद्ध जलाने सद्गुरूंचे चरण प्रक्षालन करायचे आणि अत्यंत प्रेमाने म्हणजेच मृदू तलम कापडाने (मृदू भावनेने) चरण पुसायचे.
मानसपूजेद्वारे आपण आपली बुद्धी संतांच्या विचारांनी शुद्ध आणि शांत करत आहोत. कारण परमार्थात शुद्धतेला अतिशय जास्त महत्व आहे. ज्याप्रमाणे एका शुद्ध तुपात दुसरे शुद्ध तूप सहजपणे मिसळून जाते त्याप्रमाणे शुद्ध जीवचैतन्य, शुद्ध व विमल अशा व्यापक ब्रह्मचैतन्यात सहजपणे विसर्जित होऊ शकते.
मात्र असे न होण्याची मुख्य अडचण जीवचैतन्याच्या बाजूने असते. कारण अनंत जन्मांच्या संस्काराने शुद्ध जीव चैतन्यावर असंख्य चुकीच्या संस्काराचे वासनेचे थर जमा झालेले असतात..
जे सहजासहजी साफ होत नाहीत. त्यावर संत आपल्याला सोपा उपाय सांगतात की, निष्काम कर्माने आणि निष्काम उपासनेने ही साफसफाई होते.
निष्कामतेने असे होते हे आपल्याला पाठ असते, मात्र आचरणात असते का? मग आत्मपरीक्षण करायचे. पंचविषयांचे पंचामृत अर्पण केल्यावर माझे चित्त शुद्ध झाले आहे का? मनात किती जणांबद्दल अजून आकस आहे? अजून किती जणांच्या तक्रारी सद्गुरूंकडे करणे बाकी आहे?
जिथे तक्रार आहे, तिथे राग लोभ मत्सर आहे.. आणि याचाच अर्थ.. तिथे अजिबात श्रद्धा नाहीये आणि जिथे सद्गुरूंवर श्रद्धा नाही, तिथे अजिबात शुद्धता नाहीये.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment