TechRepublic Blogs

Wednesday, January 22, 2025

मोरपिसे मनातली

 मोरपिसे मनातली...

*भिऊ नकोस......*

देवाची पूजा करून तिने त्यांच्यापुढे हात जोडले आणि महाराजांना म्हणाली हसा नुसते तुम्ही हसा फक्त . तिन्हीत्रिकाळ माझी फजिती बघत बसा . थोडीशी नाराज होऊनच ती आज घराबाहेर पडली होती.काही धड होत नाहीय आयुष्यात .एक गोष्ट निस्तरे पर्यंत दुसरे विघ्न समोर उभे ठाकते. सासूबाई गावी पडल्या होत्या पाय घसरून. दोन दिवस नवरा जाऊन आला होता .पण रजा नाही म्हणून आईला शेजाऱ्यांच्या भरवशावर टाकून यावे लागले कारण या परिस्थितीत आईला प्रवास झेपला नसता .

इकडे तिचे आई बाबा ही थकले होते .काय काय म्हणून सावरू मी. तिला रिक्षाही मिळेना . आजपण लेट मार्क लागणार .जाता जाता वाटेत  देऊळ लागले .नेहमी प्रमाणे परत हात जोडले गेले . रस्त्याच्या बाहेरून ही महाराजांची शांत मंदस्मित करणारी मूर्ती दिसली. ती पुन्हा महाराजांवर कावली. काल रात्री मुलाचा अभ्यास घेत बसले , झोपायला उशीर झाला , नवरा रुसून बसला . त्याची समजूत काढता काढता नाकीनऊ झाले . त्याचे ही बरोबर आहे रात्रीचीच तेवढी घटकाभर वेळ असते दोघांना भविष्याची स्वप्ने पहात एकमेकांबरोबर वेळ व्यतीत करायची .मग सकाळी उशिरा जाग आली . त्यातून दूध नासले , गॅसही नेमका आत्ताच संपायचा होता . दुसरा लावून देईपर्यंत मुलाची बस चुकली. नवरा  त्याला सोडायला शाळेत गेला .अरे देवा ! आज त्याला पण उशीर होणार . ती कशीबशी ऑफिस मध्ये पोचली . ऑफिस मध्ये सगळया जणी नटून थटून आल्या होत्या . काय आहे आज ? समोरची तयारी बघताच तिने डोक्यावर हात मारून घेतला. आज ऑफिस मध्ये सत्यनारायणाची पूजा . कसलीच मदत नाही माझी .ती फुरंगटली . मैत्रीण म्हणाली त्यात काय छान रांगोळी काढ . ती रांगोळी काढायला बसली. मन आईबाबांकडे , त्यांच्या आजारपणाकडे , सासूबाईंच्या दुखण्याकडे , मुलाच्या परिक्षेकडे तर रुसलेल्या नवऱ्याकडे लागले होते . हात रांगोळी रेखाटत होते पण तिच्याही नकळत महाराजांची हसरी मूर्ती पूजेपुढे आकार घेत होती .तेच मंद स्मित .सगळे कौतुक करत होते पुन्हा ती रागावली . हसा तुम्ही फक्त हसा .नुसते म्हणता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे . दुपारनंतर तिने मोबाईल हातात घेतला तर तिला कळले की ज्या भागात नवऱ्याचे ऑफिस आहे त्या भागात मोठी आग लागली आणि फायरब्रिगेडच्या गाड्या आग विझवत आहेत. तिच्या नवऱ्याचे ऑफिस तिला स्पष्ट दिसत होते. हातातले सगळे काम सोडून ती धावत निघाली. रिक्षा सिग्नल ला थांबली तो पुन्हा समोर महाराजांचे देऊळ . मंदस्मित करणारी महाराजांची मूर्ती आणि त्याचवेळी तिला नवऱ्याचा फोन आला की उशीर झाल्यामुळे तो आज ऑफिस ला गेलाच नाही , मुलाच्या शाळेच्या बस ला छोटासा अपघात झाला होता व जबाबदार पालक म्हणून तो शाळेच्या मदतीसाठी थांबला होता . त्याच्या ऑफिस जवळ झालेल्या आगीच्या घटनेची त्याला कल्पनाच नव्हती . तिची नजर महाराजांकडे गेली आणि रिक्षा सिग्नल वरून पुढे गेली .ती घरी पोचली . संध्याकाळी महाराजांच्या फोटो ला हार घालताना नवऱ्याचा फोन वाजला , त्याच्या आईचा फोन होता तिचे आईबाबा तिच्या आई कडे आले होते .बाबांचे एक मित्र  त्यांच्या गावात राहतात त्यांच्या घरी महाराजाच्या पादुका आल्या होत्या आणि त्या उत्सवासाठी तिच्या आईबाबांना आग्रहाचे आमंत्रण त्यांच्या मित्राने दिले होते . तिथून ते तिच्या आईला भेटायला आले आणि त्यांना कळले आईच्या पायाचे दुखणे .आणि त्यांनी ठरवले की आई बऱ्या होईपर्यंत ते आनंदाने त्यांची जबाबदारी घेऊन तिथे राहणार होते. क्षणार्धात  सगळ्या घटना तिच्या डोळ्यासमोरून गेल्या . संपलेला गॅस , चुकलेली बस , नवऱ्याला झालेला उशीर , महाराजांच्या पादुकांचे आईच्या गावात येणे 

आणि त्या मंदस्मित करणाऱ्या महाराजांपुढे ती नतमस्तक झाली .फोटोतून जणू ते म्हणत होते *भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.*

मंजू काणे©

No comments:

Post a Comment