*नंदिनी*
आज पुन्हा एकदा आईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.नेहमीपेक्षा जास्त घरात गंभीर वातावरण होते.कारण आज माझा आणि नंदिनी चा दहवीचा रिझल्ट होता.माझी आईला कधीच काळजी वाटत नव्हती!किंबहुना गेली दहा वर्षे माझा रिझल्ट बघायच्या आधी आई नेहमी नंदिनीचा रिझल्ट बघायची.मी पास होणारच ह्याची तिला एकशे दहा टक्के खात्री असायची.काळजी नेहमी प्रमाणेच होती ती नंदिनीची!कारण शाळेत दरवर्षी आईने टिचरला दिलेल्या महागड्या गिफ्टमुळे केवळ नंदिनीला प्रमोट करून वरच्या वर्गात टीचर ढकलून द्यायच्या.परंतु आज रिझल्ट बोर्डाचा होता.इथे टीचरला महागडं गीफ्ट देऊन,मोठी पार्टी देऊन नंदिनीला पास करा सांगायचा चान्सच नव्हता.
खूपदा शाळेत,नात्यात,मित्र परिवारात सगळ्यांना नवल वाटायचे आम्ही दोघे जुळे भावंड असूनही,मी हुशार आणि नंदिनी इतकी ढ कशी? कधीकधी तर लोकांना ती गतीमंदही वाटायची.
तेव्हा आजी मात्र नंदिनीची बाजू घेत, माझ्याकडे पाहून सगळ्यांना उत्तर द्यायची की... "नंदिनीच्याही वाटणीची बुध्दी आणि शक्ती ह्या टोणग्याने हिसकावून घेतलीस बहुतेक!"
आजीचे माझ्यापेक्षा जास्त प्रेम नंदिनीवर असल्यामुळे नंदिनीला कोणी काहीही बोललेल आजीला चालायचं नाही.अशावेळी आईचा नेहमीच ठरलेला डायलॉग असायचा नंदकुमार माझ्यावर गेलाय म्हणुन तो हुशार आहे.आणि नंदिनी तिच्या बापावर गेली म्हणून ती...
तेव्हा आजी जरा रागातच आईच वाक्य तोडायची आणि म्हणायची...
" नंदिनीचा बाप अभ्यासात हुशार नसला तरी तबला वाजवण्यात हुशार होता.उगाच नाही बर्मन दा सारख्या दिग्गज संगीतकाराने चौदा वर्षे त्याला आपल्या जवळ ठेवले होते.तू त्याची तबल्यावरची थाप आणि ड्रम वरील काठीला भुलूनच तर त्याच्याशी लग्न केलेस...
त्यावेळी आई डोळे बंद करून दिर्घ श्वास घेऊन आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची.कारण पप्पांना जाऊन आता सात वर्ष झाली होती.ह्या सात वर्षांत आईने पप्पांच्या पुण्यतिथीला हार घालण्या व्यतिरिक्त कधीच पप्पांची आठवण काढली नव्हती.
तसेही आई सरकारी खात्यात मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे तिला ऑफिसचे सुद्धा भरपूर टेन्शन असायचे म्हणून ती घरातील आजीच्या ह्या टोमण्यांच्या राजकारणात फार पडायची नाही.
एरवी देवाकडे कमालीचे दुर्लक्ष करणाऱ्या आईने आज मात्र सकाळीच उठून घाईघाईत का होईना पण देवाची पुजा केली.पप्पांच्या फोटोवर ताज्या गुलछडीचा हार चढवला.वर्षांनुवर्षे पुजा करणार्यांना न पावलेला देव जणू हिच्या एक दिवसाच्या पुजेला पावणार होता.लॅपटॉप समोर घेऊन लिंक कधी ओपन होईल याची आई वाट बघत होती.आई टेन्शन मध्ये असली की बसल्यावर ती डावा पाय जोरात हलवत बसायची.आजही तो पाय जोरात हलवत होती.तिच्या मनाची चलबिचल पाहून आजी म्हणाली...
"इतकं टेन्शन घेण्या सारखे काही नाही...काय होईल जास्तीत जास्त नापासच ना!"
आईने एक तिक्ष्ण कटाक्ष आजीकडे टाकत म्हंटले...
"नापास!... अहो तिचं वर्ष फुकट जाईल,क्लासची फी फुकट जाईल,वरती नैराश्य जन्मास येईल ते वेगळच."
तेव्हा आजी छद्मी हसत म्हणाली... नैराश्य कोणाला येईल तिला का तुला???
आजीच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा आईचा मुडच नव्हता.ती मानेला हिसका देत पुन्हा पुन्हा लिंक ओपन करायचा प्रयत्न करत होती.
शेवटी मीच धीर करून आईला म्हंटले..
"आई चिल! दुपारी एक वाजता ओपन होईल लिंक.आता केवळ सकाळचे नऊ वाजले आहेत."
माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत,आईने लॅपटाॅप बाजूला सारून नंदिनीला हाक मारली.
नंदिनी मात्र नेहमीप्रमाणे गाडीचे वेगवेगळे जुने पार्ट,बॅटऱ्या जोडून ते दुरुस्त करण्यात गुंग होती.तिला नवीन काहीतरी गाडीत बदल करायचा होता.एक नवीन माॅडेल बनवायचे होते.आई रागातच बेडरूम मध्ये गेली.चहुबाजूने काळीकुट्ट झालेली बेडरूम आणि नंदिनीचा काळा चिकट पेहराव बघून आईचा पारा अजूनच चढला.आईने सगळा राग तिच्यावर क्षणात काढून तिला स्वच्छ आंघोळ करून बाहेर येण्यास सांगितले.
इतक्यात दारावर बेल वाजली.मी घाईघाईत दार उघडले.समोर आत्या उभी होती.आत्याला बघून सगळ्या घरालाच आनंद झाला.आज पोरांचे रिझल्ट म्हणून मुद्दाम आल्याचे सांगून आत्या आजीच्या रूम मध्ये गेली.तेवढ्यात नंदिनी सुध्दा बाहेर आली आणि तिने आत्याला घट्ट मिठी मारली.नंदिनीचे काळे हात नकळत आत्याच्या साडीला लागलेही! पण आत्याने नेहमी प्रमाणे दुर्लक्ष करून,नंदिनीला खाऊ देऊन ती आईशी रिझल्ट वर चर्चा करू लागली.
आईने मात्र सुरवाती पासून नाराजीचा सूर लावला होता.नंदिनीमुळे केवळ आपलं आयुष्य विस्कळीत झालयं ह्याची खंत ती व्यक्त करत होती.आत्या मात्र आईला धीर देत मुलांच्या कलेने घेण्याचा सल्ला देत होती.आत्याने नकळत आईच्या मर्मावर घाव घालत म्हंटले...
" समजा नंदिनी नापास झाली तर काय करणार आहेस तू!?"
आत्याच्या ह्या प्रश्नाने आईच्या दोन दिवसांपासून लागलेल्या चिंतेला जणू बांधच फुटला.ती एकदम रागातच म्हणाली काय करणार? मारून तर टाकता येत नाही.पुढच्या वर्षी पुन्हा परिक्षा द्यायला सांगेन तिला.किंवा घरातील कामवाल्या मावशींना काढून टाकेन आणि नंदिनीला काम करायला लाविन!पण त्याआधी हे सगळे गाडीचे पार्ट भंगारात देऊन टाकेन."
ममाच्या ह्या बोचऱ्या उत्तराने सगळे नाराजच झाले.पण नंदिनी मात्र रडतरडत म्हणाली..
"नाही हं आई! माझ्या कोणत्याही गोष्टी भंगारात द्यायच्या नाहीत.मला ओटोमोबाईल इंजिनिअर व्हायचे आहे."
आईने कपाळावर हात मारत म्हटले...
"आधी दहावी पास व्हा!"
आईच्या अशा बोलण्याने नंदिनी नाराज झाली.पुन्हा जाऊन त्या कळकळ मळकट रंगाच्या गोष्टी एकमेकांना जोडूनच काहीतरी करु लागली.
आत्याशी बोलण्याच्या नादात एक कधी वाजला हे सुद्धा आम्हाला कळले नाही.आईने घाईघाईत पुन्हा लिंक उघडली आणि जी गोष्ट घडून नये तीच घडली! म्हणजे नंदिनी नापास झाली.आईचा पारा एकदम चढला आणि तिने रागातच नंदिनीला हाक मारली.आईचा तोल ढळतोय हे पाहून आजी म्हणाली...
नंदकुमारला किती टक्के मिळाले.तेव्हा आई एकदम भानावर येत माझे मार्क पाहू लागली.मला ब्याण्णव टक्के पाहून आई रडायलाच लागली.नंदिनीच्या रिझल्टचा थोडा वेळ जणू तिला विसर पडला.ती आनंदाने आत्या समोर माझे कौतुक करु लागली.आईचा आनंदाचा सूर पाहून क्षणभर नंदिनीला वाटले नक्की आपण पास झालोय.पण दुसऱ्या क्षणी आईने नेहमीप्रमाणे तिला ओरडायला करायला सुरुवात केली.अर्थात नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टींची सवय होती.त्यामुळे सवयीप्रमाणे ती आजीच्या शेजारी जाऊन तिच्या पदराशी चाळा करत बसली.
आई मात्र प्रचंड नाराज होती.तिला कशी नंदिनीला समज द्यावी हेच कळत नव्हते.एकूण दहा वर्षांच्या अनुभवातून तिला आता पूर्ण कळले होते की नंदिनीचे अभ्यासात अजिबात डोके नाही.
म्हणून ती रागाने म्हणाली....
" बास्स! ह्या पुढे नंदिनी हातात पुस्तक घेणार नाही.मी पुन्हा कधीच तिची फी भरणार नाही.तिने आता घरकाम शिकावे किंवा बापा सारखं एखादे वाद्य शिकावे.अजून दोन चार वर्षांनी मी तिचं लग्नच करून टाकेन."
नंदिनी तरी धीर करून म्हणाली...
"आई मला मोटर मेकॅनिक व्हायचे आहे.मला मशीन दुरुस्त करायला फार आवडते.मला स्वयंपाक नाही करायचा.मला गॅरेज काढायचे आहे.मी एक बॅटरी सुध्दा तयार केली आहे."
आतातर आईचा राग शीगेला पोहचला.
"आधी बुध्दी दुरुस्त करा स्वतःची!मशीनच्या नादी लागली आहे कारटी.अग ही सगळी कामं पुरूषांची असतात हे किती वेळ सांगायच.तू काय गॅरेज मध्ये काम करणार आहेस का?? गॅरेज मध्ये पंक्चर काढत बसणार आहेस का?दिवसरात्र ह्या छोट्या मशीनशवर मेहनत करतेस...ती जर पुस्तकावर केली असती तर आज पास झाली असतीस.मी तुला मोटार दुरूस्तीला विरोध नाही करत ,पण परिक्षेला पास होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे."
तेवढ्यात आत्याने ममाच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.
तेव्हा आई थोडी शांत झालेली पाहून आत्याने मला विचारले...
" मग काय नंदकुमार तू कोणती साइड घेणार!अर्थात तुला IAS ऑफिसर व्हायचे आहे.मग तू काय कला किंवा वाणिज्य शाखा निवडलीस तरी चालेल."
"नाही हं!" आईने रिकामा पाण्याचा ग्लास ओट्यावर ठेऊन बोलायला सुरुवात केली...."नंदकुमार डॉक्टरच होणार.मला स्वतः ला चांगले टक्के पडून, इच्छा असून सुध्दा पैशा अभावी डॉक्टर होता आले नाही.पण माझी ती इच्छा मी नंदकुमारला पूर्ण करायला सांगेन...."
केवळ आईचा हसरा चेहरा पाहून माझी इच्छा नसतानाही मी आईसाठी सायन्सला गेलो.
नंदिनीचा अभ्यासाशी पूर्ण संबंध तुटला.अर्थात त्याच तिला किंचितही वाईट वाटत नव्हते.ती घरकाम करून बाकी दिवसभर मोटारीची नवीन बॅटरी बनवत बसायची.दोन चार वर्षे कशिबशी गेली.आणि जे होऊ नको तेच झाले.मला मेडिकल कॉलेज मध्ये सलग दोन वर्षे प्रवेशच मिळाला नाही.एकतर मार्कही कमी त्यात डोनेशनही द्यायची आईची तयारी नाही.शेवटी डोनेशनची सोय व्हावी म्हणुन ब्लॉक गहाण ठेवावा ही कल्पना आईला सुचली.पण त्याला आजी तयार होईना.सगळी कडून आईची चिडचिड होऊ लागली.मी पुन्हा एकदा माझी IAS ची इच्छा प्रकट केली.परंतु त्यासाठी सुध्दा अभ्यास करावा लागतोच ना मग मेडिकलसाठी का नाही करत ह्यावरून सुध्दा तिचा चिडचिडाट झाला.शेवटी मी माझ्या इच्छांना मुरड घालून आईच्या घर गहाण ठेवण्याच्या निर्णयावर मान्यता दिली.ह्याच नैराश्यातून मला सिगारेटचे व्यसन लागले.
नंदिनीच ना शिक्षण ना नोकरी वर तिच्या त्या बॅटरी आणि स्पेअर पार्टसाठी लागणारे पैसे हा आता वायफळ खर्च आईला वाटू लागला.म्हणून तिने नंदिनीच्या लग्नाचा विचार करायला सुरुवात केली.वीस वर्षांची नंदिनी लग्नाला तयार होते नव्हती.परंतु आजीने सुद्धा आग्रह धरल्याने नंदिनी लग्नास तायार झाली.ना शिक्षण ना नोकरी त्यामुळे तिलाही तसाच कमी शिकलेला पण स्वतःचा छोटेखानी हाॅटेल व्यवसायातील नवरा मिळाला.नंदिनीला पहिल्या पासून अजिबात स्वयंपाकघरात रस वाटत नव्हता.परंतु हाॅटेल व्यवसायातील नवरा असल्याने सकाळ संध्याकाळ ती नुसती चुलीपाशी उभी!हाॅटेल मध्ये होणाऱ्या नुकसानीचे सगळे खापर नेहमी नंदिनीवर फुटले जायचे.आईला मनातील काही सांगावे असे नंदिनीला कधीच वाटले नाही.उलट एक दिवस ती आजीला फोन करून म्हणाली सुध्दा "जर माझ्या जन्मदात्या आईलाच माझ्या भावना कधी कळल्या नाही.तर इतरांना त्या कळवाव्यात अशा मी का अपेक्षा कराव्यात!हळुहळु नंदिनी उदास होत गेली.आणि एके दिवशी तर नैराश्याच्या सगळ्या सीमापार करून तिने चक्क आत्महत्या केली.बावीस वर्षाची पोरं चितेवर पाहून आई एकदम ओरडली ही आत्महत्या नाही.हा खून आहे.पण नंदिनीच्या सासर करांनी उलटे आरोप आईवरच लावले.
अर्थात दुःखाच्या भरात एकमेकावर आरोपप्रत्यारोप झाले.पण ह्यात नुकसान मात्र आमचे झाले.त्या दिवसापासून आईने हसणच सोडून दिले.आधीच तिचा गंभीर स्वभाव तो अधिक गंभीर झाला.आजी मात्र आपल्या मनातील भडास आत्या पुढे काढत म्हणाली.."नंदिनीच्या बाबतीत तिची आईच दोषी आहे.इतक्या अपेक्षा का म्हणून ठेवाव्यात मुलांकडून की ज्याचं मुलांना ओझ व्हावं.??मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगू द्यावं.एका चुकीमुळे दुसरी चुक होत गेली."
आईवर दोषारोप करत आजी डोळ्यातून नुसती टीप गाळत होती.
तेव्हा अचानक आत्याने कडक शब्दात आजीला सुनवायला सुरवात केली..."काय चुकलं वहिनीचे? मुलांकडून अपेक्षा ठेवल्या हे चुकल!?
का मुलांच्या सुखासाठी बारा बारा तास काम केले ते चुकल?
का मुलांच्या सुखासाठी तिने काटकसर हे चुकलं?
वहिनी सुध्दा शिकलेली होती.दादा काय शिकला होता? काय सुख मिळाले तिला ह्या घरात येऊन!?
किती त्रास दिला तिला दादाने!पण तिने फाईट केली दादांशी,तिला तरी कुठे होता माहेरचा आधार.तरी तिने डिव्होर्स ची धमकी दिली दादाला.हातपाय गाळून,डिप्रेशन मध्ये जाऊन वहिनीने आत्महत्या नाही केली.ती प्रत्येक प्रसंगाशी लढली.
तिने प्रत्येक वेळी आपल्या इच्छा समोर ठेवल्या त्यात काय चुकले तिचे?
ती आयुष्यभर तुमच्या मर्जीप्रमाणे जगली हे दिसले नाही तुम्हाला? दादा गेला तेव्हा तीस वर्षाची होती वहिनी.तिची इच्छा होती दुसरं लग्न करायची.पण तिने केलं का? नाही केलं!कारण तुझी इच्छा नव्हती तिनें दुसरं लग्न करावे.
नंदिनीला अभ्यासात रस नव्हता.मोरटमॅकॅनिक व्हायचे होते.पण त्याला वहिनी कधीच नाही म्हणाली नसती जर तिने पास होण्यापुरते तरी गुण मिळवले असते तर! नंदकुमारला त्याच्या मना सारखे शिकता नाही आले म्हणून दारू सिगारेट ओढू लागला.मग वहिनीने तर किती तरी दारू प्यायला पाहिजे होती.तिच्या मनासारखे काहीच घडले नाही ह्या घरात.दरवेळी आईवडील,पालक चुकिचे नसतात नंदकुमार! अनुभवामुळे ते पिचलेले असतात.त्यांनी तुमच्या कडून आशा नाही ठेवायच्या तर कोणाकडून ठेवायच्या.परक्यांकडुन???
आणि तुम्ही मुलांनी पालकांना दोष देत आत्महत्या करायच्या.
मुलांच्या बाबतीत काही चांगलं झालं की लगेच आपण मुलांची हुषारी म्हणतो आणि त्यांच कौतुक करतो. काही वाईट झाले की लगेच आईवडिलांना दोष देतो.अरे म्हणुनच मी माझ्या आयुष्यात मुलबाळ होऊनच दिली नाही.मुलांना जन्म द्यायचा, त्यांच्यासाठी खोडा सारखं झिजायच,त्यांना वाढवायचं,त्यांच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगायचं , त्यांच्या आवडी निवडी प्रमाणे स्वयंपाक करायचा आणि पुढे आयुष्यभर त्यांनी दिलेल्या दोषांचे ओझे वहायचे.मुल म्हणणार तुम्ही कर्तव्य केले.पालक मुलांकडून कर्तव्याची अपेक्षा ठेवणार! कधीकधी त्या पक्षांचं नवल वाटते.पिल्लांना फंख फुटल्यावर लगेच ढकलून देतात फांदीवरून.पिल्लू उडेल का? त्याला लागेल का? नाही उडता आले तर खाली पडेल का? असा कोणताही विचार न करता तो पक्षी दुसऱ्या दिशेने उडूनही जातो.पुढे त्या पिल्लांचे नशिब!
पण असं वागता येत नाही माणसांना!गुरफटतात माणस मोहमायेत.म्हणुनच जे झाले त्यात कोणाचाही दोष नाही.एखाद्याशी नाही पटलं तर उडून जायच घरट्यातून,मदत मागायची कोणाकडे, आईला विश्वासात घ्यायचे, आजीला भावना सांगायच्या,इतर कोणाला तरी दोष देऊन जीव कशाला द्यायचा.
आत्या सुसाट बोलत सुटली होती.तेव्हा आईने पाण्याचा पेला आत्या पुढे धरला.दोघींचे डोळे पाण्याने तुडुंब भरून आले होते.एका स्त्री च्या भावना दुसऱ्या स्त्री ने जाणल्या म्हणून दुःखातही दोघिंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
प्राची गडकरी
No comments:
Post a Comment