TechRepublic Blogs

Saturday, January 25, 2025

सर्वतोमुखीं



*🌷 लवकरच श्रीमहाराजांचें नांव इंदूरमध्यें सर्वतोमुखीं झालें. त्यावेळचा इंदूरचा राजा (शिवाजीराव होळकर यांचा बाप) विशेष अडचणींत होता, आणि म्हणून तो त्यांच्या दर्शनासाठीं आला. 

श्रीमहाराजांच्या मनांत त्याला भेटायचें नव्हतें म्हणून तो राजवाड्यांतून भेटायला येण्यास निघाला असें कळल्यावर श्रीमहाराज जिजीच्या घरच्या एका कुणबिणीचें लुगडें नेसले आणि तिला जोडीला घेऊन जात्यावर दळायला बसले. राजा आल्यावर इनामदारांनीं त्यांचें स्वागत केलें. 

सर्वजण बसले, आणि मग राजानें विचारलें, 'तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत, त्यांचें दर्शन मला घ्यायचें आहे. ते कुठे आहेत?' 

इनामदारांना श्रीमहाराजांनीं आधींच पढवून ठेवलें होतें त्याप्रमाणें ते बोलले 'सरकार, ते आत्तां घरांत होते, पण त्यांचा कांहीं भरंवसा नसतो, ते केव्हांहि कुठेंहि पळून जातात.

 इतक्यांत ते बाहेर पळून गेले.' राजा बोलला, 'आम्ही त्यांच्या दर्शनासाठीं येऊन गेलों हें त्यांना कळवा.' इनामदार 'जी सरकार' असें म्हणाले व राजा जाण्यास निघाला. त्याच्या वाटेमध्येंच श्रीमहाराज दळत बसले होते आणि मोठमोठ्यानें ओव्या गात होते;

 परंतु त्याच्या किंवा त्याच्या बरोबर आलेल्या कोणाच्याहि लक्षांत आलें नाहीं, आणि म्हणून श्रीमहाराज प्रत्यक्ष घरांत असूनदेखील राजाला त्या दिवशीं दर्शन झालें नाहीं.

 राजा गेल्यावर घरामधली सर्व मंडळी हंसूं लागली व जिजी तर थक्क होऊन गेली. जिजीबाईला त्यावेळी आठनऊ वर्षांची ताई नांवाची एक मुलगी होती.*


*श्रीमहाराज त्यांच्या घरीं राहूं लागल्यापासून दोघांची फार गट्टी जमली, ताईला त्यांचा लळा लागल्यामुळे तिला त्यांच्यावांचून चैन पडत नसे. अहोरात्र ती त्यांच्यापाशीच असायची. एके दिवशीं सकाळीं श्रीमहाराज ताईबरोबर खेळत बसले असतां एक बैरागी त्यांच्या दर्शनासाठीं आला.

 एखाद्या लहान मुलाप्रमाणें श्रीमहाराज त्या मुलीबरोबर खेळत आहेत हे पाहून तो संतापला, आणि तोंडानें कांहीं तरी पुटपुटत परत जाऊं लागला. इतक्यांत श्रीमहाराजांनीं त्याला मोठ्या प्रेमानें हांक मारली, त्याचा फार आदरसत्कार केला, आणि तेथे येण्याचें कारण विचारलें.

 त्यानें स्वतःची हकीकत सांगितली. ती अशी कीं, बरेच वर्षांपूर्वी तो कुटुंबवत्सल होता. पहिल्यापासून योगाची आवड असल्यामुळे संसारांत असूनसुद्धां तो योगसाधन करीत असे. पुढे त्याची बायको वारली. 

कांहीं कालानें त्यानें संसार आपल्या मुलांच्या स्वाधीन केला आणि सर्वसंगपरित्याग करून गुरूच्या शोधार्थ तो हिमालयाकडे गेला. कर्मधर्मसंयोगानें तेथें त्याला एक उत्तम योगी भेटला. 

गुरूजवळ सहा वर्षे अभ्यास केल्यावर गुरूनें त्याला श्रीमहाराजांच्या खाणाखुणा सांगितल्या आणि इंदूरमध्यें त्यांना भेटण्याची आज्ञा केली. पुढचा मार्ग समजावून घ्यावा आणि तसा अभ्यास करावा हाच त्याच्या येण्याचा हेतु होता. 

परंतु तो हिमालयांतून इतका लांब आला, आणि ज्यांना भेटण्यासाठीं आला ते श्रीमहाराज लहान मुलीबरोबर खेळत बसलेले पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलों व आपले श्रम वाया गेले असें त्याला वाटलें, म्हणून तो चिडला, आणि आपल्या गुरूंनीं आपल्याला असल्या माणसाकडे पाठविलें तरी कसें हें त्याला कळेना. तरी आपण मुकाट्यानें परत जावें आणि गुरूला भेटावें म्हणून तो आला तसाच परत निघाला होता.*


*बैराग्याची ही हकीकत ऐकून श्रीमहाराजांनीं त्याचा मोठा गौरव केला आणि त्याला म्हटलें, 'आपण इथें आलांत हे फार बरें झालें.

 मला योगबिग कांहीं येत नाहीं, पण गुरूच्या घरीं मी पडून होतों तेव्हां कांहीं गोष्ट नजरेखालून गेल्या, त्यांतल्या थोड्याशा सहज लक्षांत राहून आठवत आहेत. 

त्यांमध्यें तुम्हांला कांहीं शिकण्यासारखें असलें तर बघा!' असें बोलून त्यांनीं ताईला जवळ बोलावलें, तिच्या पाठीवर कौतुकानें थाप मारली, आणि 'आसन घालून समाधि लाव' असें तिला सांगितलें. 

ताईनं लगेच परकराचा काचा मारला, ती सिद्धासन घालून बसली आणि तिनें डोळे झांकून दोन-तीन मिनिटें झाल्याबरोबर तिची समाधि लागली. 

पंधरा मिनिटांनंतर श्रीमहाराजांनीं तिला 'ताई!' म्हणून हांक मारतांच तिची समाधि उतरली. 'या मुलीला आपण आपले प्रश्न विचारा' असें त्या योग्याला सांगितल्यावर त्यानें तिला ध्यानधारणेसंबंधीं अनेक प्रश्न विचारले, आणि ताईनें त्या सर्वांचीं खडाखड उत्तरें देऊन त्याचें गाडें कुठे अडत होतें तेंहि पण बरोबर सांगितलें. 

हा सगळा प्रकार पाहून तो बैरागी थक्कच झाला, आणि एकदम श्रीमहाराजांच्या पाया पडून त्यांना म्हणाला, "महाराज ! मला आपण क्षमा करा.

 आपल्याजवळच्या लहान मुलीसुद्धां इतका योग जाणतात, मग आपली अवस्था काय असेल! माझें पूर्ण समाधान झालें. मी आनंदानें जातों." श्रीमहाराजांनीं त्याला आठ दिवस आपल्याजवळ ठेवून घेतलें, आपण स्वतः त्याला योगाच्या क्रिया दाखविल्या, आणि नंतर परत गुरूकडे पाठवून दिलें.*



No comments:

Post a Comment