TechRepublic Blogs

Saturday, January 4, 2025

अग्रेषित

 अग्रेषित

*शंकरचार्याबद्दल पु.ल.* 


"काश्मीरच्या प्रवासी-मंदिरात आम्ही तळ ठोकला. ह्या टूरिस्ट सेंटरच्या उशालगतच एक उं जरच टेकडी आहे आणि टेकडीवर श्रीशंकराचार्यांचे मंदिर आहे. महिन्यापूर्वीच मी केरळातल्या आद्य श्रीशंकराचार्यांच्या कालडी गावी गेलो होतो. आणि आता भारताच्या उत्तर टोकाला ह्या दक्षिण टोकातल्या महापुरुषाने ज्या डोंगरमाथ्यावर बसून शंकराची उपासना केली ते मंदिर पाहत होतो. कुठे केरळातल्या पेरियार नदीच्या तीरावरचे ते कालडी गाव आणि कुठे काश्मिरातले श्रीनगर! कसल्या दुर्दम्य जिद्दीने भारलेली ही माणसे होती! आम्ही विमानाच्या तीन तासांच्या प्रवासाला वैतागलो होतो आणि हा आठ वर्षांत चतुर्वेदी झालेला आईबापावेगळा नंबुद्री ब्राह्मणाचा पोर मरत्या हिंदुधर्माला संजीवनी देण्यासाठी हजारो मैलांची वाट तुडवत, अरण्ये ओलांडत, पर्वत चढत उतरत कैलासराण्याच्या दर्शनासाठी केरळातून काश्मीरपर्यंत आला होता. काश्मिरात मला सर्वांत जर काही सुंदर वाटले असेल तर ते डोंगरमाथ्यावरचे आद्य श्रीशंकराचार्यांचे मंदिर! गौरीशंकराहूनही जर उंच काही असेल तर ती त्या नंबुद्री ब्राह्मणाची विजिगीषा! अद्वैताची ध्वजा घेऊन हा प्रखर बुद्धिमत्तेचा ब्राह्मण, पेरियार नदीचे ते पवित्र तीर सोडून जो निघाला तो पाखंड्यांना चेपत चेपत थेट काश्मिरापर्यंत आला. ज्ञानदेवांसारखीच काहीशी त्याचीही कथा. पतीनिधनोत्तर काही महिन्यांनी त्याची माता प्रसवली.  गावातली गढूळ तोंडे गलिच्छ बोलली. आठव्या वर्षी वेद म्हणणाऱ्या पोराला डोक्यावर घेऊन नाचावे तिथे त्याला वाळीत टाकला. वास्तविक अशा मुलात किती कडवटपणा यायला हवा! ज्ञानेश्वरात किती कडवटपणा यायला हवा! .... पण शंकराचार्य काय, ज्ञानेश्वर काय-हे धर्मसंस्थापनेचे नर. त्यांनी हिंदुधर्मावर साठलेले शेवाळ दूर करून सनातन आणि निर्मळ विचारांचे पाट देशभर सोडले."


- पु.ल. देशपांडे


(अद्वैत वेदान्ताची पाळेमुळे खोलवर रुजवणाऱ्या, खऱ्या अर्थाने "जगद्गुरु" असलेल्या आदि शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने.)

No comments:

Post a Comment