श्री.गोदवलेकर महाराजांच एक वाक्य आहे वेळ आली की गोष्ट घडायची थांबत नाही.पण तो पर्यंत वाट पाहावी लागते. परमार्थाचे मर्म असे आहे की जे आपल्या वाट्याला आलं आहे ना ते शांतपणे भोगावे. ही ज्याची तयारी आहे ना त्याला जीवन थोडे तरी कळलं.अध्यात्म थोडं तरी कळलं. हे सोपं नाही.
बनारसला पु.श्री.तैलंगस्वामी नावाचे एक सत्पुरुष भैरवनाथाच्या मंदिरात रहायचे. एका मुलीचे वाकडे पाऊल पडले.तीला दिवस राहिले. तिच्या बापाने विचारलं याचा बाप कोण तर त्या मुलीने तैलंगस्वामीचं नाव सांगितले. ते मूल झाल्यावर त्या बापाने ते मूल तैलंगस्वामीना आणून दिले. त्यांनी मग चार लोकांकडून कपडे आणले, त्याला दूध पाजले.
ती मुलगी रोज येऊन मुलाला पाहून जायची. चार महिन्यांनी त्या मुलीने आपल्या बापाला त्या मुलाच्या खऱ्या बापाचे नाव सांगितलं.तो स्वामींकडे आला त्याने क्षमा मागितली आणि ते मूल परत घेतलं. ते म्हणाले " हरकत नाही ". हे फार कठीण आहे. मनासारखं झालं तरी हरकत नाही मनाविरुद्ध झालं तरी हरकत नाही. हे तितक्या समतेने म्हटलं पाहिजे. हे आपल्याला प्रत्येक गोष्टीत शिकता येईल. प्रपंच धड नाही हरकत नाही भगवंताचे स्मरण आहे ना. मग उत्तम .
म्हणून श्री.तुकाराम महाराज म्हणाले "भागा आले ते करितो | तुझे नाम उच्चारितो ||" ही जी दृष्टी आहे पाहण्याची ही दृष्टी येणं हे खरं अध्यात्माचे मर्म आहे.
No comments:
Post a Comment