TechRepublic Blogs

Saturday, August 10, 2024

अक्षरब्रह्मयोग

 *।। ॐ श्री परमात्मने नमः ।।*

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः


अध्याय आठवा

*"अक्षरब्रह्मयोग"* 


श्लोकसंख्या - २८ 

वक्ते - अर्जुन (२ श्लोक), 

भगवान श्रीकृष्ण (२६ श्लोक)


या अध्यायाचे नाव *अक्षरब्रह्मयोग* आहे. 


*भगवंतांच्या* परा (ज्ञान) व अपरा (विज्ञान) प्रकृतीला जाणणारा मोक्षाचा लाभ करून घेतो असे भगवंतांनी ७ व्या अध्यायात सांगितले. त्याची सांगता करताना (२९ व ३० श्लोक) भगवंतांनी ज्ञानविज्ञानात्मक अशा सहा संज्ञा सांगितल्या. त्या सर्वांना जाणणारा ज्ञाता अंतकाळी परमात्म्यातच मिसळून जातो, असे सांगितले. साहजिकच अर्जुनाला त्या संज्ञांचे रहस्य जाणून घ्यावेसे वाटले. 

'ब्रह्म,अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय हे अर्जुनाने विचारले.'


परमअक्षर अविनाशी परमात्मा हाच ब्रह्म, त्या ब्रह्माचा स्वभाव (प्रत्यगात्मा वा शुद्धात्मा) हेच अध्यात्म,भूतांच्या भावांना निर्माण करणारा शास्त्रविहित यज्ञ-दान- होम यांच्या निमित्ताने जो त्याग तेच कर्म, सृष्टीतील सर्वनाशवंत वस्तू अधिभूत, पुरुष (हिरण्यगर्भ) हाच अधिदैव आणि देहात विष्णुरूपाने असणारा (सृष्टीचक्राचा प्रवर्तक आणि फलदाता) तोच अधियज्ञ होय, असे भगवंतांनी सांगितले. हे जाणून जो अंतकाळी परमात्म्याचे चिंतन करतो, तो त्यालाच प्राप्त होतो. त्या परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप एकाक्षरी ॐकाराचे आहे. 


*केवळ* हे परब्रह्मच अविनाशी आहे. बाकी ब्रह्मलोकापासून कृमिकीटकापर्यंत अवघेच विनाशी आहेत. हे जाणून जो उत्तरायणात देवयान (अर्चिरादि) मार्गाने जातो तो मुक्त होतो.जो दक्षिणायनात पितृयान (धूम्र) मार्गाने जातो तो पुन्हा जन्ममरण बंधनात पडतो. 


जो हे सर्व जाणतो तो वेदाध्ययन, यज्ञ, तप, धन या सर्वांच्या फळांचे उल्लंघन करून परमपद प्राप्त करतो. हे परमपद अक्षर, एकरस, अखण्ड आणि अविनाशी ब्रह्माचे असल्यामुळे या अध्यायाला *'अक्षरब्रह्मयोग'* असे नाव आहे.


श्रीगीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर. 


*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*

No comments:

Post a Comment