*उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा, गुजरात*
*वासुदेव आश्रम, वासन*
काल चैत्र प्रतिपदा झाली व नर्मदा परिक्रमा क्षेत्राकडे धाव घेणाऱ्यांची संख्या अचानक कितीतरीपट वाढली.
चैत्र महिन्यात नर्मदेच्या उत्तरवाहिनी परिक्रमेचे महत्त्व आता नव्याने सांगण्याची गरज नाही.
ज्या भाविकांना नर्मदा परिक्रमा करायची आहे, पण नौकरीतून, व्यवसायातून तीन हजार किलोमीटर ची परिक्रमा करायला तीन ते चार महिने वेळ काढू शकत नाहीत. काही असेही भाविक असतात जे शारीरिक अक्षमतेने सलग इतके चालू शकत नाहीत व इतके दिवस घराबाहेर राहू शकत नाहीत. अशा भाविकांसाठी चैत्र महिन्यात होणारी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे एक पर्वणीच असते.
गुजरात च्या बडोद्या जवळ नर्मदा जिल्हा आहे. तिथे गरुडेश्वर जवळ (जिथे दत्तभक्त वासुदेवानंद सरस्वती - टेंब्ये स्वामी महाराज यांची समाधी आहे) रमपूरा या गावापासून पश्चिमवाहिनी असलेली नर्मदामैया उत्तर दिशेकडे वाहायला सुरूवात होते. तिथून दहा किलोमीटर समोर तिलकवाडा या गावापर्यंत ती उत्तर वाहिनी आहे.
स्कंदपुराणात उत्तरवाहिनी नर्मदेचे फार महत्त्व सांगितले आहे. चैत्र महिना म्हणजे नवसंवत्सर. या महिन्यात प्रत्यक्ष देवच याठिकाणी नर्मदा स्नानासाठी येत असतात. अगदी गंगा यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी, गोदावरी आदी तिर्थ नद्याही या उत्तरवाहिनी नर्मदेत स्नानाला येत असतात. त्यामुळे या चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदानदीला परिक्रमा (प्रदक्षिणा) केली की संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात रमपूरा ते तिलकवाडा हा परिसर परिक्रमा करणाऱ्या भाविकांनी गजबजलेला असतो. रमपुरा व तिलकवाडा या दोन ठिकाणी नर्मदा मैय्याचे तट परिवर्तीत करायचे असते. तिथे नावाड्यांची सोय असते. एकूनण २१ किलोमीटर ची ही परिक्रमा आहे.
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा व सध्या वासन या गावी आश्रम करून राहणारे स्वामी विष्णुगिरी, हे नावं एकमेकांचे पुरक आहेत.
पुर्वी तिलकवाडा वासुदेव कुटीर आश्रम येथून स्वामी विष्णुगिरी आपले सेवाकार्य चालवायचे. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमे बद्दल दत्तभक्तांना व भाविक वर्गाला सांगायला स्वामी विष्णुगिरींनी सोशल मिडियाच्या वापरासहीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी प्रवास केलेत. २०१४ मध्ये केवळ ४०० जणांनी ही परिक्रमा केली होती. आता अमावस्यांत चैत्र महिन्यात सत्तर हजारावर लोक या महिन्यात परिक्रमा करून जातात. स्वामी विष्णुगिरी या परिक्रमावासींची राहण्याची व भोजनाची सोय निशुल्क करतात.
गेल्या दोन वर्षांपूर्वी विष्णुगिरी महाराजांनी तिलकवाड्याहून तीन किलोमीटरवर ' वासन' या गावी दिड एकर जागेत वासुदेव आश्रम बांधला आहे. तिथे त्यांनी परिक्रमावासींच्या सोईसाठी मोठे सभागृहही बांधले होते. आणखीही विकासकामं सुरू होते. पण गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने नर्मदेला आलेल्या अतीपुराने बरेच काही वाहून गेले होते. तरीही अगदी तीन चार महिन्यांतच स्वामीजींनी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमावासींची गैरसोय होऊ नये म्हणून भरभरं नवीन व्यवस्था उभारल्यात.
चार महिन्यांत येवढा मोठा आश्रम पुन्हा बांधून कार्यरत झाला???
अनेकांचे डोळे विस्फारले गेले....
पण
ईश्वरेच्छा, म्हणजेच लोक विश्वास व लोक सहभागातून हे सारे सहजच घडले आहे.
कालपासून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सुरू झाली व या परिक्रमे बद्दल विचारणा करायला माझे फोन वाजणे सुरू झाले. प्रत्येक फोनवर सतत तिच तिच माहिती देण्या ऐवजी लेख लिहिला तर तो शेअर होत होत ही माहिती नर्मदाभक्तांपर्यंत पोहचेल, म्हणून या लेखाचे प्रयोजन!
मराठी, हिंदी व गुजराती भाषा बोलणारे स्वामी विष्णुगिरी महाराज म्हणजे जिव्हाळ्याची प्रतिमुर्ती. मोठी नर्मदा परिक्रमा वा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासीला याचा अनुभव येत असतो. त्यामुळे कुठलाही संभ्रम मनात न बाळगता आपण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला जाऊ शकता. रेल्वेचे मुख्य स्टेशन बडोदा आहे. तिथून शेअर टॅक्सीने वा बसने वासन या गावी पोहचता येते.
माझा स्वामी विष्णुगिरींशी नित्य संपर्क असतोच. त्यामुळे आश्रमाच्या सोशल मीडिया पोस्टस् सोबतच मला प्रत्यक्ष स्वामीजींकडूनही आश्रमाची एक एक वाटचाल माहिती असते. आपणासाठी ती पुढे देत आहे.
-----------------------------------------------------
यावर्षीची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा पासून सुरू झाली. वासन गावचा *वासुदेव आश्रम* सर्वांच्या व्यवस्थेसाठी जय्यत तयार आहे. वासन हे गाव तिलकवाडा ते गरुडेश्वर मार्गावर तिलकवाड्यापुढे तीन किलोमीटरवर आहे.
आपल्या सर्वांची आश्रमात राहायची व शास्त्रोक्त परिक्रमेची संपूर्ण सोय होईल, पण होणारी गर्दी बघता काही व्यवस्था लक्षात घ्यायला हवी.
१) आपण कितीजणं व कोणत्या दिवशी वासन आश्रमात जाणार, हे स्वामी विष्णुगिरींना अगोदरच कळवावे. यासाठी त्याकाळात सुरू राहणारा फोन नंबर 9913486135 हा आहे.
२) आपल्या दोनचाकी, चारचाकी वा बस या वाहनासाठी निःशुल्क पार्किंगची सोय आश्रमातर्फे आहे.
३) आपली आश्रमात राहण्याची व भोजनप्रसादाची सर्व सोय निःशुल्क आहे.
४) आपल्याला गरज असल्यास आश्रमातर्फे परिक्रमेसाठी मार्गदर्शक व्यक्ती सशुल्क उपलब्ध राहिल. जेष्ठ नागरिकांसाठी सशुल्क वाहन परिक्रमेची सोयही आहे.
५) संकल्प पुजेची व संकल्पपुर्ती पुजेची ब्राह्मणाची दक्षिणा तसेच तट परिवर्तन करतांना नावाड्याचे आर्थिक पारिश्रमिक आपणास द्यावे लागेल. याशिवाय आपणास आणखी कोणताही खर्च लागणार नाही.
६) आश्रमात होणारी गर्दी व तिचे व्यवस्थापन बघता स्वामी विष्णुगिरी आपणास चर्चेसाठी भरपूर वेळ देऊ शकतील अशी अपेक्षा आपण करू नये. स्वामीजी धावपळीत व्यस्त असतांना त्यांच्यासोबत सेल्फीचा अवास्तव आग्रह करू नये.
७) शक्यतोवर मौल्यवान वस्तू, महागडे कॅमेरे वा महागडे मोबाईल फोन सोबत आणूच नये.
८) आश्रमात आपण सेवा कार्यात सहभाग घ्यावा, हे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. पण सर्वचजण सेवेत सहभागी होऊ शकतील असे नाही. त्यामुळे वर्षभरात इतरवेळी आश्रमात सेवेला व साधनेला आपण जाऊन राहू शकता.
९) आश्रमात बांधकाम व इतर सेवाकार्य सुरू आहेच. त्यात आपण आर्थिक देणगी देऊन सहभागी होऊ शकता.
टिप : आश्रमातील नियमांचे तंतोतंत पालन करून आश्रमाचे पावित्र्य जपणे अत्यंत आवश्यक आहे.
आपण वासन आश्रमाशी संपर्क करूनच परिक्रमेला जावे.
किशोर पौनीकर नर्मदापुरकर, नागपूर
फोन : 9850352424
राष्ट्रीय दिनांक : सौर चैत्र २१, शके १९४६.
तिथी : चैत्र शुद्ध द्वितीया शके १९४६
No comments:
Post a Comment