*॥श्रीहरिः॥*
श्रीभगवंत म्हणतात,
सामान्य मनुष्य मात्र मोहमायेमुळे मोहित होतो आणि दुःखाला प्राप्त होतो मात्र जे ज्ञानी, पुण्यशील असतात ते या मोहमायेतून मुक्त होतात आणि माझीच भक्ति करतात.
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः
*येषां त्वन्तगतं पापं*
*जनानां पुण्यकर्मणाम् ।*
*ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता*
*भजन्ते मां दृढव्रताः ॥*
*॥७.२८॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.२८)
*भावार्थ:- ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्म केली आहेत, ज्यांची पापकर्म पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिश्चयाने माझ्या सेवेतच युक्त होतात.*
'ज्या सत्कर्माचरणी लोकांचं (अज्ञानरूपी) पाप संपलं आहे ते द्वन्द्वांच्या मोहातून मुक्त होऊन दृढव्रतानं माझीच भक्ती करतात.'
*मनुष्य* जोपर्यंत श्रवण, सेवा, भक्ती या त्रिकोणामध्ये राहतो, तोपर्यंत कामना आणि वासना त्याच्यावर आरूढ होत नाहीत. तो आपल्या इंद्रियांचा मालक असतो, गुलाम नाही. परंतु या त्रिकोणाच्या बाहेर जाताच इंद्रियं, मायावी आकर्षणं आणि कामना त्याला आपल्या जाळ्यात गुरफटून टाकतात.
त्यामुळे मनुष्यामध्ये कधी द्वेषाचे तर कधी सुडाचे विचार येत राहतात. मात्र यात त्याचा मौल्यवान वेळ वाया जातो. कारण मनुष्याच्या इच्छांना अंतच नसतो, मग ईश्वराची प्राप्ती घडणार कशी?
*मी-माझं, सुख-दुःखं, यश-अपयश, शीत-उष्ण* अशा प्रकारच्या द्वन्द्वंमोहामुळे मोहित होऊन जीव या जगामधे उत्पन्न होतात. त्रिगुणात्मक प्रकृती जीवांना खेळवते. त्यामुळे मी कोण आहे ते जीव जाणत नाहीत.
*परंतु,*
जे पुण्यशील चित्तशुद्धीकारक अशी पुण्यकर्मं करतात त्यांना हा त्रिगुणप्रेरित द्वंद्वमोह मोहित करीत नाही. मोह उत्पन्न करणारं पाप चित्तशुद्धीमुळे नाहीसं होतं.
*पुण्यवान* श्रेष्ठ पुरुषांना परमतत्त्वाचं खरं ज्ञान होतं. दृढज्ञाननिष्ठ झालेले असे फक्त परम ईश्वरालाच भजतात. त्याचीच भक्ती करतात. अशा चित्तशुद्धीसाठी आवश्यक अशी पुण्यकर्मं कोणती असा प्रश्न सामान्य जनांना पडतो.
*जप, तप, व्रत, वैकल्य*
यांनी चित्तशुद्धी होऊ शकते. पण ते करताना आपलं मनच त्यात नसेल आणि ती नुसतीच कृती होत असेल तर चित्तशुद्धी होऊ शकते का याचा विचार केला पाहिजे.
*चित्तशुद्धीसाठी* कर्मकांड करताना देवासाठी जी फळं आणायची ती सडकी फळं! स्वस्तात एका ताटलीत मिळणारी! त्यात कोणताही भाव नाही; विचार नाही. आपण देवासंदर्भात केवढी अक्षम्य गोष्ट करतो आहोत याचंही भान नाही.
*एकीकडे* लोकांना लुटायचं, काळे धंदे करायचे, अधार्मिक कृत्यं करून फसवणूक करायची आणि दुसरीकडे भागवत सप्ताह साजरा करायचा! देव बघत नाही, तो तर आकाशत आहे; त्याला काय कळणार,अशी समज मनुष्याला पापी बनवू शकते. पण अशा पाप्याला काय माहीत,तो हृदयात बसून साऱ्या नोंदी करीत आहे ते!
*एक कवी म्हणतो,*
‘जप करिता झिजले मणि,
कथा ऐकता फुटले कान,
तरी न होई ब्रह्मज्ञान ।'
'दगड पाहता वाही फूल,
तुलसी पाहता तोडी पान,
नदी पाहता करी स्नान,
तरी न होई ब्रह्मज्ञान ।।'
*सामान्य अविचारी भक्तांची अशीच अवस्था असते.*
*मात्र*
*"ज्ञानमार्गी"* आपली विहित कर्मं परमेश्वराला अर्पण करून करतो. तो कोणाचंही कधी वाईट चिंतित नाही. तो आपल्या कामातच देव पाहतो.
मिळालेलं धन, अन्न, वस्त्र या गोष्टी परमेश्वराचा प्रसाद म्हणून तो घेतो. त्याचप्रमाणे परमेश्वर हा सर्व प्राणिमात्रांमध्ये वास करून आहे; तो आणि मी दोन नाही हेही तो जाणून असतो; आणि अशातऱ्हेनं परमेश्वराचं सत्स्वरूप जाणल्यामुळे त्याचं पाप नाहीसं होतं. असा हा पुण्यकर्मी मनुष्य दृढव्रत होतो.
*तो* अन्य देवदेवतांच्या भजनी लागत नाही. तो फक्त परब्रह्माचीच पूजा करतो.संकुचित वृत्ती ही पापाला कारण ठरते.म्हणून आपला दृष्टिकोन विशाल बनवला पाहिजे.स्वत:पुरतं बघण्याची संकुचित वृत्ती जाऊन जेव्हा विश्वाकडे बघण्याची व्यापक दृष्टी येते तेव्हा माणसाचं अज्ञानरूपी पाप नाहीसं होतं.
*विश्वाकडे* बघणं म्हणजे त्या विश्वंभराला जाणून त्याच्या इच्छेनं त्याच्या कर्माशी साधर्म्य राखणारं विश्व-कल्याणाकरता निष्कामकर्म करणं असा याचा व्यापक अर्थ आहे. राष्ट्रउभारणीसाठी निष्काम वृत्तीनं हातभार लावणं हे सुद्धा ईश्वरी कार्य ठरू शकतं.
*थोडक्यात,*
ईश्वराविषयीची समज आणि आपल्या जन्माचा हेतू ध्यानात आल्यानंतर व्यक्तीची चित्तशुद्धी होऊ लागते. हळुहळू ती विकसित होते.
विकसित झाल्यावर चित्तातले विकार आपोआप निघून जातात; आणि विकार गेले की भगवंत प्रतीत व्हायला लागतो.
*सारांश:*
*संकुचित वृत्तीमुळे पाप निर्माण होतं, ते वाढत जातं. पाप नाहीसं करण्याकरता आपण आपला दृष्टिकोन विशाल बनवला पाहिजे. निष्कामतेनं चित्तशुद्धी होते. त्यानंतर ज्ञान होतं. विकास झाला की विकार निघून जातात. विकार नाहीसे झाले की भगवंताची खरी ओळख होत.
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
संपूर्ण भगवद्गीता - सरश्री
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
No comments:
Post a Comment