TechRepublic Blogs

Monday, August 12, 2024

सदाचार

 श्रीराम समर्थ


*चिंतामणी येथे १९-४-१९५६ रोजी रामनवमीला दुपारी १:३० चे सुमारास झालेल्या श्रीमहाराजांच्या [वाणी अवतार] प्रवचनातील काही भाग.*


          आपण सर्वजण जन्माला येतो आणि परमात्मा ही आज जन्माला आला आहे असे म्हणतात. पण या दोघांच्या जन्माला येण्यामध्ये फरक आहे. आपल्याला जन्माला यावे लागते - येणे न येणे आपल्या हातात नाही. परमात्मा स्वेच्छेने - स्वखुशीने जन्माला येतो. आपण आपल्या पूर्व कर्माने बांधलेले असतो व प्रारब्ध आपणास जन्म घ्यावयांस लावते. परमात्मा सर्व कर्माच्या पलीकडे आहे म्हणून जन्म घेणें किंवा जन्माला येणे हा भाग दोघांना जरी सारखा असला तरी दोहोंचा जन्म घेण्यात महदंतर आहे.


         हा परमात्म्याचा जन्म दरवर्षी अनेक ठिकाणी साजरा केला जातो. *काही वेळेस, जन्म वर्षातून दोन वेळा साजरा होतो [पंचांगात बदल असेल त्याप्रमाणे] व काही वेळेस निरनिराळ्या वेळी जन्म करण्यात येतो. [चिंतामणीला रामजन्म दुपारी साडेअकराला करण्याची पद्धती आहे*].** याचा अर्थ आपण परमात्म्याला आपल्याला पाहिजे त्यावेळी जन्माला आणू शकतो. याचे कारण तो सदासर्वदा आहेच. 

तो कधी कोणत्याही क्षणाला नव्हता असे म्हणता येत नाही. मग असे विचारावेसे वाटते की *त्या जन्माने आपल्या बाबतीत कार फरक होतो. आपण आपल्यालाच विचारून पाहिले पाहिजे की आपण जन्म साजरा केल्यानंतर पुर्वी होतो त्यापेक्षा काही निराळे झालो की त्यानंतरही होतो तसेच राहिलो आहोत. 

जर आपल्यात काही बदल झाला नसेल तर हा सर्व खटाटोप म्हणजे एक नुसता करमणुकीचा कार्यक्रम झाला.* त्यापेक्षा त्याला अधिक किंमत राहणार नाही. खरे पाहिले असता जन्मानंतर - जन्म केल्याचे फळ म्हणून - आपणात आमूलाग्र फरक पडला पाहिजे. परमात्मा आला असे म्हणतो ते खरोखर आल्याचा विश्वास वा परिणाम दाखवत नाही.

 लहान मूल रस्त्याने एकटे जात असता त्याला आपला बाप दृष्टीस पडला म्हणजे जसा सुरक्षितपणा - जशी निश्चिंतता व निर्भयता वाटते *तशी परमात्मा जन्माला आल्यावर आमची भिती, काळजी, असमाधान, दुःख एकदम नाहीशी झाली पाहिजेत परंतु प्रत्यक्षात पाहिले तर तसे होताना दिसत नाही.* आमच्या या सर्व गोष्टी जवळजवळ आहे तशाच कायम राहतात.


          म्हणून प्रभूच्या जन्माचा खरा अर्थ - रहस्य आम्हाला समजत नाही कारण त्याकरिता लागणारी श्रद्धा आमचे जवळ नाही. आम्हाला परमेश्वराच्या आगमनापासून जर खरा फायदा व्हायचा असेल तर ही श्रद्धाच उपयोगी येईल. ती सदाचार व नामस्मरण ह्यातून निर्माण होते. *सदाचार हा परमार्थाचा पाया आहे पण त्याला अखंड नामस्मरणाची जोड पाहिजे.* परमेश्वर प्राप्ती करता जी अनेक साधने सांगितली आहेत ती सर्व एका नामात आहेत. 


           जन्माला येण्याचे वेळी किंवा आल्याचे वेळी प्रभू विशेष आनंदात आणि देण्याचे भरात असतो आणि आपण काय मागू ते तो आपणास देईल. म्हणून या शुभ प्रसंगी त्याच्याजवळ त्याचे नामाचे प्रेम फक्त मागू आणि ते तो खात्रीने देईल. त्या वाचून दुसरे काही आपण मागू नये. या एका ध्येयाच्या मागे जाण्याचा आपण आज निश्चय करूया आणि मगच आपण केलेल्या जन्मोत्सवाचे खरे सार्थक होईल.


               *********

**[हे १९५६ सालचे चिंतामणी येथील श्रींचे प्रवचन आहे. सध्या तेथे राम जन्म किती वाजता साजरा करतात हे माहित नाही.]

               

संदर्भः *मालाडचे एक जेष्ठ साधक डा वा रा अंतरकर यांच्याकडे असलेल्या वाणीरूप अवतारातील श्रीमहाराजांच्या प्रवचनातून. पान १५-१६*

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

No comments:

Post a Comment