चिंतन
श्रीराम,
सद्गुरू सांगतात, प्रतिक्रिया म्हणून आलेला संताप आणि आवश्यकता म्हणून आणलेला संताप ह्यात खूप फरक आहे. काही ठिकाणी संताप आवश्यक असतो. त्याशिवाय काम होणारच नसते. तेव्हा आपण ठरवून बेतशीर (calculated) आणू शकतो. व्यवहारात अनेकदा असे प्रसंग येतात, जिथे क्रोध आणावा लागतो. कारण आपण फार नमते घेऊ लागलो तर व्यवहार बिघडू शकतो. परमार्थात अगदी प्राथमिक स्तरावर असताना व्यवहार बिघडू नये अशी खबरदारी घ्यावी लागते. कारण व्यवहार बिघडला की, चित्त अस्थिर रहाते आणि त्याने परमार्थही बिघडतो. अशावेळी लोकांची फिकीर न करता 'आणलेला क्रोध' वापरून आतली शांती टिकवता येते.
मात्र क्रोध आणलेला असावा, आलेला नसावा. कारण आलेला संताप त्याला पाहिजे तेव्हा जातो आणि आणलेला संताप आपल्याला पाहिजे तेव्हा घालवता येतो. क्रोधाचे अनेक प्रकार दिसून येतात. कोणावरही अन्याय होताना पाहून जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा त्याला सात्विक संताप म्हणतात. या ठिकाणी रागाचे कारण व्यक्तीगत नसून मानवनिष्ठ असते. असा सात्विक संताप चांगलाच नव्हे तर आवश्यक ही मानला जातो. त्यामुळे समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होते असे समजण्यात येते.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment